चित्र-चरित्र

अंकुश चौधरी
अंकुश चौधरी
अभिनेता
३१ जानेवारी १९७३

अंकुश चौधरी यांचे नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीवर आहे. त्याचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे वडील पांडुरंग धोंडीबा चौधरी गिरणीमध्ये नोकरी करीत होते. आई माधुरी या ‘बॉम्बे पोर्ट ट्रस्ट’मध्ये परिचारिकेचे काम करीत होत्या. परळच्या आर.एम. भट शाळेत अंकुश चौधरी यांचे शालेय शिक्षण झाले. महर्षी दयानंद महाविद्यालयातून १२वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले.

महाविद्यालयीन दिवसांपासूनच अंकुश यांना चित्रपट क्षेत्राचे आकर्षण होते. १९८५ साली ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमातून लोकनृत्य करण्याची प्रथम संधी त्यांना मिळाली. लोकधारा कार्यक्रमामुळे अंकुश चौधरी यांची केदार शिंदे, संतोष पवार, भरत जाधव यांच्याशी ओळख झाली व हे सर्व जण लहान-सहान कार्यक्रम करू लागले. त्यानंतर अंकुश चौधरी यांनी भरत जाधव व केदार शिंदे यांच्या समवेत ‘बापाचा बाप’ व ‘आभास की भास’ या एकांकिकामधून अभिनय केला होता. पुढे त्यांनी केदार शिंदे यांच्या ‘ऑल दि बेस्ट’ या नाटकात आंधळ्यांची भूमिका यथोचितपणे साकारली. हे नाटक यशस्वी झाले. पुण्या-मुंबईत त्यांनी अभिनय केलेल्या ‘ऑल दि बेस्ट’चे ८२५ यशस्वी प्रयोग झाले. याच काळात ‘बेधुंद मनाच्या लहरी’ या दूरदर्शनवरील मालिकेमध्ये ते काम करत होते.

१९९४ च्या आसपास ‘सुना येती घरा’ हा अंकुश चौधरी यांनी अभिनय केलेला पहिला चित्रपट. नंतरच्या काळात ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘मातीच्या चुली’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘आयला रे’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. नंतर महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘जिस देश मे गंगा रहता है’ या हिंदी चित्रपटातूनही त्यांनी काम केले.

‘अगं बाई अरेच्चा’ आणि ‘जत्रा’ या चित्रपटांसाठी दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याबरोबर त्यांनी सहदिग्दर्शक म्हणून अनुभव घेत अभिनयाबरोबरच चित्रपटातल्या इतर गोष्टीही समजावून घेतल्या. नंतरच्या काळात अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सुकन्या कुलकर्णी, सुजाता जोशी, अमृता खानविलकर अशा अनुभवी आणि आघाडीच्या कलाकारांना घेऊन अंकुश चौधरी यांनी ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाचे ‘प्रभात’मध्ये सलग २१ खेळ हाऊसफुल्ल झाले. मराठी चित्रपटसृष्टीत खूप वर्षानंतर हा योग जुळून आला होता. यानंतर ‘झकास’ व ‘नो एंट्री’ या चित्रपटांचेही दिग्दर्शन त्यांनी केले. ‘झकास’ या चित्रपटाला उत्तम विनोदी चित्रपट म्हणून त्या वर्षीचे पारितोषिकही मिळाले. तर ‘गैर’, ‘अशाच एका बेटावर’, ‘चेकमेट’, ‘रिंगा रिंगा’, ‘सावरखेड एक गाव’, ‘इश्श’ अशा अनेक चित्रपटातून अंकुश चौधरी यांनी लक्षणीय भूमिका साकारल्या. त्यांना आजपर्यंत तीन वेळा ‘स्टाईल आयकॉन ऍवॉर्ड’ मिळाले आहे. २०१३ मध्ये ‘संशय कल्लोळ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, तर ‘दुनियादारी’ या चित्रपटातील डी.एस.पी.ची भूमिका अंकुश चौधरी यांनी आपल्या आंगिक अभिनयाने समृद्ध केली. ‘ती सध्या काय करते’, ‘दगडी चाळ’, ‘गुरू’, ‘देवा’ हे त्यांचे अलीकडचे उल्लेखनीय चित्रपट.

-मंदार जोशीचित्र-चरित्र