चित्र-चरित्र

दीनानाथ मंगेशकर
दीनानाथ मंगेशकर
गायक
२९ डिसेंबर १९०० --- २४ एप्रिल १९४२

मा.दीनानाथांच्या पूर्वजांचे मूळ आडनाव नवाथे, वतनी नाव देसाई, अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू. त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गाणं मिळवले. त्या काळात सुमारे पाच हजार दुर्मिळ रागरागिण्यांचा, चिजांचा संग्रह त्यांच्याकडे होता.

त्यांचे गायन म्हणजे चमत्कृती आणि माधुर्य यांचा मिलाफ होता. अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. १९१४ मध्ये बालगंधर्वांनी स्वत:ची गंधर्व नाटक मंडळी सुरू केल्यावर किर्लोस्कर नाटक मंडळींत दीनानाथांचा प्रवेश झाला. १९१५ मध्ये ‘ताजेवफा’ या हिंदी नाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांनी केली. तेथे मा.दीनानाथ चार वर्षे होते. १९१८ मध्ये त्यांनी एका ध्येयवादी, नावीन्याची आवड असलेली साहित्यप्रेमी अशा ‘बलवंत संगीत मंडळी’ नावाच्या नाटक कंपनीची स्थापना केली. ‘भावबंधन’ या नाटकातील लतिका, ‘पुण्यप्रभाव’मधील कालिंदी, ‘उग्रमंगल’मधील पद्मावती, ‘रणदुंदुभी’ मधील तेजस्विनी, ‘राजसंन्यास’मधील शिवांगी या भूमिका दीनानाथांनी आपल्या गायनाभिनयाने विशेष गाजविल्या. ‘उग्रमंगल’ नाटकात ‘छोडो छोडो बिहारी’ या ठुमरीवर ते नृत्य करीत. हा ठुमरी नाच हे त्या काळी रंगभूमीवरचे फार मोठे आकर्षण ठरले होते. ‘मानापमान’मध्ये धैर्यधर, ‘ब्रह्मकुमारी’मध्ये तपोधन इ. पुरुष भूमिकाही केल्या. दीनानाथांच्या ’बलवंत संगीत मंडळी’ने महाराष्ट्रभर फिरत राहून नाट्य संगीत गावोगाव पोचविले, आफ्रिकेचा दौरा आखला आणि हिंदी नाटकांची गुजराती रूपे करून बसविली. नाट्यगीतांप्रमाणे शास्त्रोक्त संगीतही मा.दीनानाथ उत्तम प्रकारे, स्वतःच्या स्वतंत्र व कल्पक वळणाने गात असत. त्यांनी नाट्यसंगीतात पंजाबी ढंग प्रथम आणला, असे मानले जाते. त्यांनी मैफली गाजवल्या, संगीत समारोहांत स्वतःचे स्थान सिद्ध केले. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून निराळे. सुंदर गाणे रसिकांना ऐकवले. मा.रामकृष्णबुवा वझे ह्यांचे ते गंडाबंद शागीर्द होत; तथापि इतर अनेकांची गायकी आत्मसात करून त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली घडवली. श्रीमत् शंकराचार्यांनी दीनानाथांना ‘संगीत रत्न’ म्हणून गौरवले. सारंगीवादन, कथ्थक नृत्य, संस्कृत साहित्य, शिकार हे त्यांचे आवडते छंद होते.

१९३४ मध्ये ’बलवंत पिक्चर कॉर्पोरेशन’ काढून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘कृष्णार्जुन युद्ध’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यात त्यांनी अर्जुनाची भूमिका केली. त्यांची ‘सुहास्य तुझे मनासि मोही’ यासारखी या चित्रपटातील गाणी अतिशय लोकप्रिय झाली. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर, आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकर ही मा.दीनानाथ व त्यांच्या द्वितीय पत्नी श्रीमती (ऊर्फ माई) यांची अपत्ये होत. या सर्वांच्या गळ्यात ‘दीनानाथांचा सूर’ आहे. मा.दीनानाथांना श्री.कृ. कोल्हटकरांनी मास्टर ही उपाधी बहाल केली, आणि तेव्हापासून ते मास्टर दीनानाथ मंगेशकर झाले. मा.दीनानाथ मंगेशकर हे एक उत्तम ज्योतिषी होते. १९२२ साली इंदूर असताना त्यांना ज्योतिषविद्येचा पहिला पाठ शंकरशास्त्री घाटपांडे या तेथील प्रसिद्ध ज्योतिषीबुवांकडून मिळाला होता. दीनानाथांनी ‘ज्योतिष आणि संगीत’ या विषयावरील ग्रंथ लिहायला घेतला होता.

गायनाचा व ग्रहांचा शास्त्रशुद्ध संबंध कसा आहे, कोणता ग्रह कोणत्या स्वराचा स्वामी, त्याचप्रमाणे राग-रागिण्यांचे रंग, वर्णने, स्वरांच्या रंगांवरून त्यांचा निसर्गातील-सूर्यकिरणांतील रंगांशी, वेळेशी कसा संबंध लागतो आणि म्हणून अमूक वेळेला अमूक राग गाणे’ ही कल्पना कशी सिद्ध होते, यांवर त्या ग्रंथात माहिती असणार होती. सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे राग-स्वर कसे तेच आहेत वगैरे छाननी त्यांनी या ग्रंथात केली होती. दुर्दैवाने ते लिखाण छापून प्रसिद्ध होण्यापूर्वीच गहाळ झाले. प्रसिद्ध क्रिकेटपटू सी. के. नायडू हे मास्टर दीनानाथांचे खास मित्र. मास्टर दीनानाथ हे सी. के. नायडू यांची क्रिकेटची मॅच बघायला यायचे, तर नायडू हे मास्टर दीनानाथांची नाटके पाहायला येत.



चित्र-चरित्र