चित्र-चरित्र

गजेंद्र अहिरे
गजेंद्र अहिरे
दिग्दर्शक
१६ फेब्रुवारी १९६९

सामाजिक आशयाच्या चित्रपटांना आपल्या संयत संवादलेखनातून आणि संवेदनशील, प्रभावी दिग्दर्शकीय दृष्टिकोनातून उतरवणारा एक यशस्वी आणि स्वतंत्र दृष्टीचा दिग्दर्शक म्हणून गजेंद्र अहिरे यांना खास शैलीतील चित्रपटांसाठी ओळखले जाते.

कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, गीतलेखन अशा चित्रपटाच्या सर्व अंगांची अचूक जाण असलेले गजेंद्र अहिरे यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवेशाची दारे महाविद्यालयीन काळातच खुली झाली. मुंबई परिसरातच त्यांचा जन्म झाला आणि तेथेच त्यांचे बालपण गेले. मुंबईतील भांडूप परिसरातील कुमारी कस्तुर विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी रुईया महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच महाविद्यालयातील नाटकांमध्ये ते सहभाग घेत असत. याशिवाय ठाण्यातील कलासरगम, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या बाह्यविद्यार्थ्यांसाठी असलेल्या ‘झँग’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांचा ‘नाटका’शी जवळून परिचय झाला. या नाटकांमधूनच त्यांना पटकथा, संवाद लेखनाचे तंत्र हळूहळू अवगत झाले. याच काळात कामगार कल्याण केंद्र आणि एम.एस.ई.बी. या संस्थांतील नाटकांच्या निमित्ताने निरनिराळे विषय आणि त्याची मांडणी यासंदर्भात त्यांचा स्वतंत्र विचार सुरू झाला.

‘कृष्णाकाठची मीरा’ हा गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला. त्यानंतर २००३ साली ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ हा स्त्रियांच्या समस्या मांडणारा सामाजिक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. या चित्रपटाची कथा आणि संवाद स्वतः गजेंद्र अहिरे यांनी लिहिले होते. या चित्रपटाला केवळ लोकप्रियता लाभली नाही, तर राज्यशासनाचे १२ पुरस्कारही मिळाले. त्यापैकी वैयक्तिक पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट गीतलेखन आदींचे पुरस्कार गजेंद्र अहिरे यांना मिळाले. या चित्रपटामध्ये रवींद्र मंकणी, मधुरा वेलणकर, वृंदा गजेंद्र अशा अनुभवी कलाकारांचा सहभाग होता. या यशस्वी पदार्पणानंतर ‘पांढर’ (२००४), ‘सरीवर सरी’ (२००५), ‘सैल’ (२००६) या चित्रपटांच्या दिग्दर्शनासह संवादलेखनाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. ‘पांढर’ या चित्रपटाला त्या वर्षीचा राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला.

२००६ साली आलेल्या ‘शेवरी’ या चित्रपटाची निर्मिती नीना कुलकर्णी यांनी केली होती. गजेंद्र अहिरे यांच्या कथेवर आधारित आणि दिग्दर्शित चित्रपटात शिवाजी साटम, नीना कुलकर्णी यांच्या प्रगल्भ अभिनयाने चित्रपटाला प्रेक्षकांची दाद मिळाली. ‘दिवसेंदिवस’ (२००६), ‘खंडोबाच्या नावानं’ (२००७), ‘मायबाप’ (२००७) या चित्रपटांनंतर २००८ साली दिग्दर्शित केलेला ‘वासुदेव बळवंत फडके’ हा अजिंक्य देव यांची मध्यवर्ती भूमिका असलेला चित्रपट लक्षणीय ठरला. २००९ साली ‘त्या रात्री पाऊस होता’ या चित्रपटात सयाजी शिंदे, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, सुबोध भावे असे अभिनयकुशल कलाकार होते. राजकारणी व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे, त्याच्या विकृत मनसुब्यांमुळे उद्ध्वस्त झालेल्या एका कुटुंबाची कथा आणि त्यांचे संवादलेखन गजेंद्र अहिरे यांनी केले होते.

‘हॅलो जयहिंद’ या मराठी चित्रपटासाठी इलया राजा या दाक्षिणात्य, ज्येष्ठ संगीतकाराबरोबर गजेंद्र अहिरे यांनी प्रथमच एकत्र काम केले. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच गीतलेखनही गजेंद्र अहिरे यांनी केले. मराठी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी प्रथमच इलया राजा यांच्याकडे होती. यानंतरही एका मराठी चित्रपटासाठी गजेंद्र अहिरे आणि इलया राजा यांनी एकत्र काम केले आहे. सामाजिक चित्रपटाच्या माध्यमातून विशिष्ट अशा समस्या, त्यातून माणसांच्या नातेसंबंधातील गुंता आणि तरलता प्रभावीपणे चित्रपटातून मांडणारा निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून गजेंद्र अहिरे यांना ओळखले जाते. नवनव्या कथांसह नव्या कल्पना घेऊन येणारे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. १९९५ साली त्यांनी अभिनेत्री आणि सहकलाकार ‘वृंदा’ यांच्याबरोबर विवाह केला. ‘अनवट’, ‘शासन’, ‘नीळकंठ मास्तर’, ‘स्वामी पब्लिक लि.’, ‘पोस्टकार्ड’, ‘अनुमती’ हे त्यांचे अलीकडचे काही उल्लेखनीय चित्रपट

२०२२ मध्ये अहिरे यांनी 'डिअर मौली' आणि 'विद्यापीठ' हे दोन चित्रपट दिग्दर्शित केले. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांचे 'स्टोरी टेलर' हे पुस्तक प्रकाशित झालं आहे

- नेहा वैशंपायन



चित्र-चरित्र