चित्र-चरित्र

रत्नाकर मतकरी
रत्नाकर मतकरी
लेखक
१७ नोव्हेंबर १९३८ --- १७ मे २०२०

रत्नाकर मतकरी गेली अनेक वर्षे अविरत लेखन करणारे नाटककार, दिग्दर्शक, निर्माते, बालनाट्य चळवळीचे अध्वर्यू, साहित्यिक, स्तंभलेखक, चित्रकार, चित्रपट व मालिका लेखक, एकपात्री कथाकथनकार अशा विविधांगी भूमिका लीलया निभावणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. प्राथमिक शिक्षण रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये तर माध्यमिक शिक्षण राममोहन इंग्लिश स्कूल मध्ये झालं. १९५४ साली एस. एस. सी. तर एल्फिन्स्टन कॉलेजमधून १९५८ साली बी. ए. पदवी मिळविली. १९७८ पर्यंत त्यांनी बँक ऑफ इंडियात नोकरी केली आणि त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःला नाट्यक्षेत्राला वाहून घेतलं. मतकरी यांनी १९५५ साली वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी रेडिओसाठी ‘वेडी माणसे’ ही श्रृतिका लिहून त्यांनी लेखनास प्रारंभ केला. विजय तेंडुलकर आणि मतकरी हे तसे समकालीन. साधारणत: एकाच वेळी त्यांनी नाट्यलेखनास सुरुवात केली. मतकरींनी नाट्यलेखनात अनेक ‘प्रयोग’ केले. बालनाट्यापासून प्रायोगिक, व्यावसायिक अशी सर्व प्रकारची नाटके त्यांनी लिहिली. ‘माझं काय चुकलं?’ ‘लोककथा ७८’, ‘आरण्यक’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचे हवे’, ‘बकासुर’ आदी नाटकांतून त्यांच्या चतुरस्र शैलीचा वानवळा मिळतो. त्यांनी ‘बालनाट्य’ आणि ‘सूत्रधार’ या संस्था स्थापन करून त्याद्वारे निर्मिती व दिग्दर्शनही केले. आजवर ३५ हून अधिक नाटके त्यांच्या नावावर आहेत. चाय-खोका बालनाट्य चळवळीद्वारे त्यांनी बालनाटय़े सर्वदूर पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. मराठी गूढकथा आणि रत्नाकर मतकरी असे समीकरण जुळले त्याला आता कैक वर्षे उलटून गेली आहेत. ‘गूढकथा लिहणे ही त्यांची आणखी एक ओळख. मतकरी यांचा एक वाचकवर्ग आहेच. शिवाय त्यांच्या गूढकथांचा असा एक वाचक वर्ग तयार झाला आहे. आपल्या गूढकथांवर ‘गहिरे पाणी’ या मालिकेचीही त्यांनी निर्मिती केली. भयकथेमध्ये भयाला, तर गूढकथे मध्ये कथेला महत्त्व आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोन, मानवी संबंध, सामाजिक प्रश्न अशा वेगवेगळ्या पातळीवर गूढकथेच्या माध्यमातून आशय अभिव्यक्त करता येतो. गूढकथा आकृतीबंधाच्या या शक्यताच समीक्षकांच्या ध्यानात आल्या नाहीत. त्यामुळे गूढकथेचे महत्त्व मराठी साहित्याला समजलेच नाही, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार रत्नाकर मतकरी यांना आहे. इन्व्हेस्टमेंट’ या आपल्या कथेवरील चित्रपटाचे लेखन, निर्मिती व दिग्दर्शनही त्यांनी केले. सामाजिक जाणिवेच्या चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाला. पु. ल. देशपांडे यांच्यावरील चित्रपटाचे संवाद त्यांनी लिहिले होते. रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट, रंगभूमी, एकपात्री कार्यक्रम, चित्रकारिता, सामाजिक चळवळी असा चौफेर संचार त्यांनी आयुष्यभर केला. या प्रत्येक क्षेत्रात काहीतरी वेगळे करण्याचा नेहमीच त्यांचा प्रयत्न राहिला. - संजीव वेलणकर



चित्र-चरित्र