चित्र-चरित्र

नंदेश उमप
नंदेश उमप
पार्श्वगायक
२० डिसेंबर १९७५

विख्यात शाहीर विठ्ठल उमप हे नंदेशचे वडील. शाहिरांकडूनच नंदेशला कलेचा वारसा मिळाला. अगदी वयाच्या सातव्या वर्षापासून त्यानं वडिलांबरोबर अनेक कार्यक्रम केले. विठ्ठल उमप यांच्यासारखाच रांगडा आवाज नंदेशला लाभला. चांगला गायक बनण्यासाठी त्यानं शास्त्रीय संगीत तसेच उर्दूचंही शिक्षण घेतलं. नंदेश नुसता गायक नाही, तर तो चांगला संहिता लेखक, संगीत संयोजक, नृत्य दिग्दर्शक आहे. चित्रपटांमधील पार्श्वगायनाखेरीज त्यानं ‘मी मराठी’ आणि ‘जांभूळ आख्यान’ या आपल्या कार्यक्रमांचे शेकडो प्रयोग आतापर्यंत केले आहेत. नरेंद्र चंचलची ‘बेशक मंदीर मस्जीद तोडो’, ‘यारा हो यारा’ ही गाणे तो ऑर्केस्ट्रामधून म्हणत असे. आदेष बांदेकर यांच्या ‘मंथन’ कार्यक्रमामधून नंदेशला गायनाची संधी मिळाली आणि तिचं त्यानं सोनं केलं. वामन केंद्रे यांच्या ‘रणांगण’ नाटकात त्यानं साकारलेली गारद्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. ‘गंगूबाई नॉन मॅट्रिक’ या मालिकेच्या शीर्षक गीतामुळे नंदेश मालिका आणि चित्रपट क्षेत्रातील पार्श्वगायनात आला. ‘मोल’, ‘मुंबई टाईम’, ‘तो आणि मी एक ऋणानुबंध’, ‘गणवेश’, ‘चिरंजीव’, ‘लोकमान्य एक युगपुरुष’, ‘देऊळबंद’, ‘भाकर’ हे त्याचे काही महत्त्वाचे चित्रपट.

- मंदार जोशीचित्र-चरित्र