ताज्या घडामोडी

अतिथी कट्टा

खारी बिस्कीट म्हणताहेत, ‘आम्ही खूप धमाल केलीय!’
-----------
संजय जाधव दिग्दर्शित खारी बिस्कीट चित्रपट येत्या २० तारखेला प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटामधील खारीची व्यक्तिरेखा साकारलीय ती वेदश्री खाडिलकर हिने आणि बिस्कीट साकारलाय तो आदर्श कदमनं.

झटपट रिव्हियू

पळशीची पीटी


नाशिकच्या आदिवासी भागातून आलेली 'सावरपाडा एक्स्प्रेस' कविता राऊत किंवा सातारा जिल्ह्यातील माणसारख्या दुष्काळी भागातून आलेली 'सातारा एक्स्प्रेस' ललिता बाबर, यांच्यासारखं भाग्य महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातील प्रत्येकच कविता-ललिताला नाही लाभत! याचा अर्थ कविता किंवा ललिताचा संघर्ष कमी होता असं नाही, पण त्यांच्यातलं धाव-चापल्य ओळखून त्यांना वेळीच संधी उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्ती आणि परिस्थितीही त्यांच्यासोबत होती. अन्यथा महाराष्ट्राच्या कडेकपाऱ्यांत हरणाच्या वेगाने धावणाऱ्या अनेक कविता-ललिता आहेत... पण गरिबीने, दारिद्र्याने त्यांचे पाय जखडून टाकलेत. गुरं-मेंढरं वळणाऱ्या क्वचित काही गावखेड्यातल्या कविता-ललिता स्पर्धेच्या धावपट्ट्यांवरुन धावत असतीलही, पण कितीजणींचं राज्य व राष्ट्रीय पातळीवरील धावपटू बनण्याचं स्वप्न पूर्ण होत असेल? 'पळशीची पीटी' चित्रपटातील भागीही (किरण ढाणे) असंच स्वप्न पाहत असते. शिक्षा म्हणूनसुद्धा मैदानात धावण्याची हौस असलेल्या भागीला शाळेत पळशीगावची पी.टी. उषा असंच म्हणत असत. डोंगरदऱ्यातील धनगरवाड्यावरुन गावातील शाळेत रोज धावत येणाऱ्या भागीचं हेच धाव-चापल्य बिडकरसर (राहुल बेलापूरकर) ओळखतात. तसंही जिल्हा पातळीवरील धावण्याच्या स्पर्धेत अनवाणी धावूनही पहिल्या येणाऱ्या भागीची ते जोरदार तयारी करून घेतात आणि भागी राज्य स्पर्धेत पहिली तर येतेच, पण कमी वेळेत धावण्याचा राष्ट्रीय विक्रमही नोंदवते. साहजिकच तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होते, मात्र त्याच वेळी तिचं लग्न ठरतं आणि... पुढे भागीच्या आयुष्यात मेडल्स येतात की मेंढरं वळण्याची काठी, ते कळण्यासाठी प्रत्यक्ष सिनेमाच पाहावा लागेल. ग्रामीण भागातील मुलांची गुणवत्ता आणि त्यांच्या समोरील आव्हानं अधोरेखित करणाऱ्या, या सिनेमाचा विषय नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र सिनेमा म्हणून तो उभा करण्यात, लेखक-दिग्दर्शक-निर्माता सगळेच कमी पडलेत. एखाद्या माहितीपटासारखा हा सिनेमा झाला आहे, त्यामुळे तो ठसठशीतपणे उभा राहत नाही. छायाचित्रण, संगीत या बाजूही सिनेमाला उचलून धरण्यात फारशा यशस्वी ठरत नाहीत. सगळ्याच कलाकारांनी आपापल्या भूमिकांना न्याय देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. पण मुळातच घडणारे प्रसंग कमी असल्यामुळे ही पात्रं जोरकसपणे उभी राहत नाहीत. ग्रामीण भागातील काही मंडळींनी एकत्र येऊन केलेला हा चांगल्या विषयावरचा साधा-सोपा सिनेमा आहे. मात्र सिनेमा म्हटल्यावर तो भाबडेपणाने करून चालत नाही! निर्मिती संस्था : ग्रीन ट्री प्रॉडक्शन कथा आणि दिग्दर्शक : धोंडिबा बाळू कारंडे पटकथा : तेजपाल वाघ, महेशकुमार मुंजाळे संवाद : तेजपाल वाघ कलाकार - किरण ढाणे, राहुल बेलापूरकर, धोंडिबा कारंडे, शिवानी घाटगे, तेजपाल वाघ, विद्या सावळे, राजू सहस्रबुद्धे, संजय डुबल, दीक्षा सोनवणे, नीलिमा कामाने, ज्ञानेश्वर माने, राहुल मगदुम

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

संदीप पेंढारकर


खुप खुप सुंदर माहिती ..मराठी चित्रपट कलावंत आणि निर्माते,दिग्दर्शक यांचा जीवन प्रवास सहजपणे उलगडून दाखवीत असतात ...मनःपूर्वक शुभेच्छा
संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया