चित्र-चरित्र

स्वप्निल जोशी
स्वप्निल जोशी
अभिनेता
१८ ऑक्टोबर १९७७

मराठी-हिंदी चित्रपट, रंगभूमी, दूरचित्रवाहिनीवरील एक अत्यंत प्रतिभाशाली आणि हरहुन्नरी अभिनेता म्हणून स्वप्निल जोशीचं नाव घ्यावं लागेल. गेल्या तीन दशकांपासून तो अव्याहतपणे काम करीत आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ‌विख्यात दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या ‘कृष्णा’ मालिकेमुळे तो घरोघरी पोचला. या मालिकेमुळे त्याला अभूतपूर्व अशी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर काही काळ विश्रांती घेऊन त्यानं ‘टीनएज’ काळात हिंदी मालिकांकडे आपला मोर्चा वळवला. ‘कॅंपस’, ‘हद कर दी आपने’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘देस में निकला होगा चॉंद’, ‘अमानत’ या त्याच्या काही लोकप्रिय मालिका. अनेक कॉमेडी शोजचेही त्यानं यशस्वी सूत्रसंचालन केले. ‘गुलाम-ए-मुस्तफा’ या १९९७मधील चित्रपटाद्वारे त्यानं हिंदी चित्रपटामधील आपली इनिंग सुरू केली. एकाचवेळी मराठी चित्रपट तसेच मालिकांमध्ये तो चमकत राहिला. ‘मानिनी’, ‘चेकमेट’, ‘आम्ही सातपुते’, ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘मितवा’, ‘वेलकम जिंदगी’, ‘मंगलाष्टक वन्समोअर’, ‘तू ही रे’, ‘लाल इश्क’, ‘फुगे’, ‌‘भिकारी’ हे त्याचे उल्लेखनीय चित्रपट. ‘दुनियादारी’ आणि ‘मुंबई पुणे मुंबई’ या दोन चित्रपटांनी त्याला मोठी लोकप्रियता मिळवून देत रोमॅंटिक हीरो म्हणून त्याची इमेज प्रस्थापित केली. २०१७ मध्ये त्यानं ‘तुला कळणार नाही’ या मराठी चित्रपटाची निर्मितीदेखील केली.

मुंबई पुणे मुंबई (२०१८), रणांगण (२०१८), मोगरा फुलला (२०१९) या चित्रपटांमधूनही त्यानं आपल्या अभिनयाची चमक दाखवली. २०२० मध्ये स्वप्नीलनं ‘समांतर’द्वारे वेब सीरिज क्षेत्रात प्रवेश केला आणि तिथंही त्याला मोठं यश मिळालं.

मंदार जोशीचित्र-चरित्र