चित्र-चरित्र

अनंत माने
अनंत माने
दिग्दर्शक, पटकथालेखक, संकलक
२२ सप्टेंबर १९१५ --- २२ सप्टेंबर १९९५

अनंत माने यांचा जन्म कोल्हापूरला झाला. त्यांचे चुलते ज्ञानोबा माने (पैलवान) कोल्हापुरातल्या प्रभात स्टुडिओत नट म्हणून काम करत होते. त्यांच्याबरोबर अनंत माने यांचीही स्टुडिओत ये-जा असे. स्टुडिओतल्या वातावरणाने ते चित्रपटसृष्टीकडे आकर्षित झाले आणि त्यामुळे शालेय शिक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. त्यातूनच एक दिवस त्यांनी शाळा सोडली आणि १ जून १९३० पासून प्रभात स्टुडिओच्या रसायन खात्यात नोकरी धरली. सुरुवातीचे एक वर्ष पाच महिने त्यांनी बिनपगारी काम केले आणि नंतर त्यांना दहा रुपये पगार मिळू लागला.

प्रभात स्टुडिओतल्या नोकरीत संकलन, कला, छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, जमावदृश्यामध्ये सहभाग अशा सगळ्या प्रकारच्या कामाने, निरीक्षणाने त्यांच्या मनात चित्रपटविषयक तांत्रिक व कलात्मक जाणिवांचे अंकुर फुटू लागले. प्रभातमधले त्या काळातील दिग्दर्शक व्ही. शांताराम यांचे दिग्दर्शनातले कसब, कॅमेर्‍यातून अँगल पाहून शॉट लावणे, कलाकारांना अभिनयातले बारकावे, प्रसंग समजावून सांगणे हे सगळे अनंत मानेंना खूप जवळून पाहता, अनुभवता आले. व्ही. शांताराम यांची संकलनातील हुकमत आणि बारकावे पाहून अनंत माने प्रभावित झाले. या काळात व्ही. शांताराम यांनी ‘अयोध्येचा राजा’, ‘अग्निकंकण’, ‘मायामच्छिंद्र’ यांसारखे चित्रपट बनवले होते. व्ही. शांताराम आणि प्रभात यांनी मिळून ‘सैरंध्री’ हा भारतातला पहिला रंगीत बोलपट बनवला आणि योगायोगाने मानेंना या चित्रपटात ‘विष्णू’ची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. अभिनेता होण्याच्या हेतूने मानेंनी चित्रपट व्यवसायात शिरकाव केला होता, पण त्या सुरुवातीच्या काळात त्यांना फिल्म धुण्याचे काम मिळाले होते.

पुढे काही तांत्रिक अडचणींमुळे प्रभात स्टुडिओचे पुण्यात स्थलांतर झाले. पुण्याच्या या स्टुडिओत अद्ययावत यंत्रे, प्रत्येक विभागाची स्वतंत्र इमारत, आधुनिक वातानुकूलित स्वयंचलित प्रयोगशाळा, सुसज्ज संकलन विभाग अशा सर्व सोयीसुविधा होत्या. अनंत मानेही पुण्याच्या प्रभात स्टुडिओत आले आणि जिथे दिग्दर्शनाचा श्रीगणेशा करता येतो, अशा संकलन विभागात त्यांनी काम सुरू केले आणि चित्रपटाच्या तांत्रिक अंगांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या कामातल्या प्रगतीने व्ही. शांताराम यांच्या विश्‍वासाला ते पात्र ठरले आणि संकलक हा दिग्दर्शनाचाही दिग्दर्शक असतो, हा विचार मनात ठेवून १९३३ साली प्रभातच्या संकलन विभागात त्यांनी काम सुरू केले. त्यांनी ‘अमृतमंथन’, ‘चंद्रसेना’, ‘अमृतसेना’, ‘धर्मात्मा’ अशा प्रभातने निर्मिती केलेल्या अनेक चित्रपटांचे संकलन केले. पुढे प्रभातने ‘माणूस’ (१९३८), ‘संत तुकाराम’ (१९३९), ‘शेजारी’ (१९४०), ‘संत ज्ञानेश्‍वर’ (१९४१) असे एकापेक्षा एक सरस चित्रपट काढले. दरम्यान प्रभातच्या भागीदारांमधले मतभेद विकोपाला गेले आणि त्यामुळे १९४२ साली व्ही. शांताराम यांनी प्रभात सोडली. याच वेळी १९४३ मध्ये प्रभातशी मानेंचा करारही संपला आणि त्यांनी दिग्दर्शक राजा नेने यांच्याबरोबर संकलनाचे काम सुरू केले. राजा नेनेंबरोबर १९४५ साली त्यांनी ‘तारामती’ (नायिका - शोभना समर्थ), ‘फिर भी अपना है’ (नायिका - नलिनी जयवंत), ‘बच्चेका खेल’ (नायिका - मीना कुमारी) हे चित्रपट केले. राजा नेनेंबरोबर काम करत असतानाच ‘ललत’ या संगीत रागदारीवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून काम करू लागले.

१९४६ साली पुण्याच्या डेक्कन स्टुडिओचे मालक जोबनपुत्र यांनी नेने यांना चित्रपट बनवण्यास सांगितले. त्या वेळी शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट करायचे ठरले. अनंत माने या चित्रपटाच्या पटकथेच्या चर्चेतही भाग घेऊ लागले. त्यांनी ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटाचे संपूर्ण दिग्दर्शन केले, पण ‘सहदिग्दर्शक’ म्हणून त्यांचे नाव नोंदले गेले. मात्र याच चित्रपटापासून त्यांनी पटकथेच्या क्षेत्रातही प्रवेश केला. या चित्रपटात नेने आणि रंजना देशपांडे यांच्या भूमिका होत्या. या कामासाठी बाबूराव पेंढारकर यांनीही अनंत मानेंची पाठ थोपटली. पुढचा चित्रपट होता ‘केतकीच्या बनात’. अभिनेते सूर्यकांत या चित्रपटाद्वारे नायक म्हणून पडद्यावर प्रथमच दिसले. पुढे १९४६ ते १९४८ हा काळ अनंत मानेंसाठी अत्यंत अस्थिर काळ ठरला. मात्र १९५० साली कोल्हापूरच्या प्रभाकरपंत कोरगावकर यांनी अर्थसाहाय्य केल्याने दादा धर्माधिकारी, अनंत माने मंडळींनी ‘आल्हाद चित्र’ ही संस्था स्थापन केली. आल्हाद चित्रचा पहिला चित्रपट होता ‘बाळा जो जो रे...’ या चित्रपटासाठी वि.वि. बोकील यांची कथा आणि ग.दि. माडगूळकर यांची पटकथा, संवाद, गीते होती. सूर्यकांत आणि सुलोचना यांच्या भूमिका आणि संगीत दिग्दर्शक होते वसंत पवार. या चित्रपटाने रौप्यमहोत्सव साजरा केला. पुढे ‘स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी’, ‘चिमणी पाखरं’ (हिंदी - ‘नन्हे-मुन्ने’) या चित्रपटांनीही रौप्यमहोत्सव साजरे केले. त्यामुळे १९५२ साली आल्हाद चित्र यशाच्या शिखरावर होते.

१९५३ साली आल्हाद चित्रसंस्था बंद पडली. नंतर अनंत मानेंनी ‘चेतन चित्र’ नावाची स्वत:ची संस्था स्थापन केली आणि ‘पायदळी पडलेली फुले’ (१९५६) हा पहिला चित्रपट काढला. सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेने ‘चाकोरीबाहेरचा’ म्हणावा असा हा चित्रपट साफ कोसळला. नंतर ‘झाकली मूठ’ (१९५६), ‘साता जन्माचा सोबती’ (१९५७), ‘दोन घडीचा डाव’ (१९५७), ‘पैशांचा पाऊस‘ (१९५८) हे आणखी काही चित्रपट काढले. १९५७ साली त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘धाकटी जाऊ’ या चित्रपटाला केंद्र शासनाचे प्रादेशिक भाषेतले पहिले पारितोषिक मिळाले. त्यानंतर अनंत मानेंच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीतला महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘सांगत्ये ऐका’. या चित्रपटाने एकाच चित्रपटगृहात १३१ आठवडे चालण्याचा विक्रम केला. गो.ग. पारखी यांची कथा, व्यंकटेश माडगूळकरांचे संवाद, ग.दि. माडगूळकरांची गाणी आणि सुलोचना, चंद्रकांत, सूर्यकांत, दादा साळवी, हंसा वाडकर आणि जयश्री गडकर यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट अनेक अडचणींवर मात करत तीन महिन्यांत पूर्ण झाला. अनंत मानेंच्या चित्रपट कारकिर्दीत या चित्रपटाने प्रथमच रौप्यमहोत्सव साजरा केला. ‘सांगत्ये ऐका’ या चित्रपटाने त्यांना आर्थिक आणि लौकिक यश दिले. १९६० साली ‘अवघाची संसार’ नंतर अनंत मानेंना ‘शाहीर परशुराम’ (१९६१) आणि ‘मानिनी’ (१९६२) या चित्रपटांसाठी केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक प्राप्त झाले. ‘रंगपंचमी’ (१९६२), ‘माझा होशील का’ (१९६४), ‘सवाल माझा ऐका’ (१९६५), ‘केला इशारा जाता जाता’ (१९६५), ‘एक गाव बारा भानगडी’ (१९६८), ‘पाहुणी’ (१९७४), ‘सुशीला’ (१९७८), ‘कलावंतीण’ (१९७७), ‘लक्ष्मी’ (१९७६), ‘हळदीकुंकू’ (१९७९), ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ (१९८४), ‘गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं’ (१९८६) असे जवळपास ५८ चित्रपट अनंत मानेंनी दिग्दर्शित केले. ‘अबोली’, ‘दोन घडीचा डाव’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘नार निर्मिते नरा’, ‘केला इशारा जाता जाता’ यासह १४ चित्रपटांच्या कथा आणि तितक्याच पटकथाही त्यांनी लिहिल्या.

अनंत मानेंनी आपल्या चित्रपटातून अनेक उत्तम कलाकारांना प्रथम संधी दिली. चित्रपट महामंडळाचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले. कोल्हापूरला ‘चित्रनगरी’ उभी राहण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. ग.दि. माडगूळकर, पु.भा. भावे, य.गो. जोशी, पं. महादेवशास्त्री जोशी, रणजित देसाई, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील या सगळ्या साहित्यिकांच्या सहवासात त्यांनी अनेक चित्रपटांची कामेही केली. व्ही. शांताराम यांना ते गुरू मानायचे. स्वतः यशस्वी दिग्दर्शक झाल्यावरही ‘पिंजरा’ (१९७२)मध्ये व्ही. शांताराम यांचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांचे निधन झाले.

-स्नेहा अवसरीकर
संदर्भ १) माने अनंत, ‘अनंत आठवणी’, इंद्रायणी साहित्य प्रकाशन; १९८७.



चित्र-चरित्र