चित्र-चरित्र

कवी संजीव
कवी संजीव
१२ एप्रिल १९१४ --- २८ फेब्रुवारी १९९५

सोलापुराजवळील 'वांगी' या गावी कवी संजीव यांचा जन्म झाला. अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया', "असा कसा खट्याळ तुझा कान्हा', "खुलविते मेंदी, चाळ माझ्या पायात', "सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया रे, वेड्या बहिणीची ही वेडी माया', ही त्यांची चित्रपट गीते गाजली १९५५ मध्ये पडद्यावर आलेल्या "भाऊबीज' या त्या काळात गाजलेल्या, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या चित्रपटातली ही गीतं होती. इतकी वर्षं उलटल्यावरही मराठी गानरसिकांना त्या गाण्यांच्या माधुर्याचा शब्दसुगंध मोहवतो आहे. या गीतांचे गीतकार कवी "संजीव' म्हणजेच कृष्ण गंगाधर दीक्षित व्यवसायाने छायाचित्रकार व मूर्तिकार होते. त्यांचे शालेय शिक्षण सोलापुरात झाले. पुढे कलाशिक्षणाकरता त्यांनी मुंबईच्या 'बाँबे स्कूल ऑफ आर्ट' या संस्थेत प्रवेश घेतला. तेथून १९३९ साली ते जी.डी. आर्ट पदविका परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी काही काळ सोलापूर महानगरपालिकेच्या मुलींच्या शाळेत कलाशिक्षकाची नोकरी केली. तात्यासाहेब श्रोत्रिय यांच्या संपर्कात संजीवांना काव्यशास्त्राची, वृत्तछंदांची गोडी लागली. सुरुवातीच्या काळात गणेशोत्सवाच्या मेळ्यांकरता त्यांनी पुष्कळ गाणी लिहिली. संजीव यांनी मनोरंजनाद्वारे देशाभिमान जागृत करण्यासाठी अनेक रचना कागदावर साकारल्या. त्यांची गीते ठिकठिकाणी आयोजित केलेल्या मेळ्यांमधून सादर होत असत. साहित्य हा त्यांचा स्थायीभाव होता. लौकिक प्रपंचापेक्षा ते साहित्य प्रपंचात अधिक रमले. १९४२ मधल्या ‘चले जाव’ चळवळीत कवी संजीव यांनी स्वातंत्र्याचा प्रचार करणारी राष्ट्रभक्तीपर गीतेही लिहिली. छायाचित्रे शिल्पकला, संगीत, कविता या क्षेत्रात त्यांचा मुक्त संचार सुरू होता. ते श्रीगणेशाची मूर्ती मोहक तयार करत. सोलापुरातल्या स्वातंत्र्यवीरांची शिल्पे घडवली ती त्यांनीच. "भाऊबीज' चित्रपट पडद्यावर आल्यानंतर कवी संजीव यांचे नाव मराठी मुलुखात घरोघर झाले. ग. दि. माडगूळकर, पी. सावळाराम, शांता शेळके, त्या काळातील ख्यातनाम लोकप्रिय गीतकार असतानाही, कवी संजीव यांच्या गीतांचा सुगंध दरवळला. प्रतिभावंत गीतकार असा त्यांचा लौकिक झाला. पण ते "कवी' आहेत याचा मात्र साहित्य विश्वातल्या काव्य रसिकांना विसर पडला. "आयुष्य सर्व गेले, मी राहिलो रिकामा कुणी कृष्ण द्वार केले, मी राहिलो सुदामा तरीही जिवंत आम्ही, नित अमृतात न्हातो कविता घरात माझी, आनंद कंद आम्हा' अशा भावना व्यक्त करणाऱ्या कवी संजीव यांनी आपल्या एका कवितेत, जिथे थांबावे लागते तिथे दीपमाळ होऊन थांबावे किमान तेवढे तरी नशिबात असावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या साहित्याची दखल घेऊन 'गझल गुलाब' या संग्रहास महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कासर देण्यात आला. संजीवांचे 'माझा राजबन्सी राणा कोणी धुंडून पहाना' हे गाणे मेहबूबजान या ख्यातनाम गायिकेने १९३० - ३२च्या सुमाराला गायले व ते लोकप्रिय झाले. त्यांचे एकूण बारा कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांचा दिलरुबा (१९३५) हा पहिला कवितासंग्रह. संजीवा यांनी वेगवेगळ्या प्रकारची कविता लिहिल्या, त्यात गझलगुलाब (१९८०), रंगबहार (१९८३), देवाचिये व्दारी (१९८६) असे गझल, शायरी आणि अभंग हे प्रकार आहेतच, शिवाय त्यांनी चित्रपट गीते व लावण्याही लिहिल्या. त्यांनी 'सासर माहेर' (१९५६), 'भाऊबीज' ( १९५७), 'चाळ माझ्या पायात' ( १९५७), 'पाटलाची सून' (१९६७) या चित्रपटांच्या कथा त्यां८नी लिहिल्याव. या चित्रपटांशिवाय सुख आले माझ्या द्वारी, सौभाग्यकांक्षिणी, हात लावीन तिथं सोनं, मराठा तितका मेळवावा, थोरातांची कमळा, वाट चुकलेले नवरे, रंगपंचमी, सुधारलेल्या बायका, जन्मठेप, ठकास महाठक अशा अनेक चित्रपटांची गाणी त्यांच्या लेखणीतून साकार झाली. 'कवळ्या पानाला केशरी चुना', 'अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया ', 'चाळ माझ्या पायात, पाय माझे तालात' अशी शृंगाररसयुक्त गीते आणि 'सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती', 'अखेरचा हा तुला दंडवत', 'आवाज मुरलीचा आला' अशी भावोत्कट गीते ते सारख्याच सहजपणे लिहीत. - संजीव वेलणकर, पुणे.



चित्र-चरित्र