चित्र-चरित्र

यशवंत भालकर
यशवंत भालकर
दिग्दर्शक
१७ एप्रिल १९५७ --- १९ डिसेंबर २०१८

यशवंत भालकर यांचा जन्म कोल्हापूरचा. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांच्या ‘तांबडी माती' आणि शाहिर कोंडके यांच्या ‘सोंगाड्या'मध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं होतं. १९८१ मध्ये ‘डाळिंबी’ चित्रपटापासून त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरू केलं ते पुढील १४ वर्षे सुरूच होतं. १९९७ ला स्वतंत्रपणे दिग्दर्शन केलेल्या ‘पैज लग्नाची’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे विक्रमी १४ राज्य पुरस्कार मिळाले होते. 'घे भरारी’ या दुसऱ्या आशयघन चित्रपटाला चित्रपती व्ही. शांताराम पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तर, 'राजा पंढरीचा’ या भक्तीपटाला ३ राज्य पुरस्कार मिळाले होते. 'राजमाता जिजाऊ’ हा ऐतिहासिक कथानकावर आधारलेला चित्रपट लंडनमध्येही प्रदर्शित करण्यात आला होता. यशवंत भालकर यांनी तब्बल १३ मराठी चित्रपटांचे तर ६ माहितीपटांचे दिग्दर्शन केले होते. यात ‘घे भरारी’, ‘नाथा पुरे आता’, ‘पैज लग्नाची’, ‘लेक लाडकी’ या गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. सलग दोन वर्षं ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष होते. चित्रपटसृष्टीच्या परिघापलीकडे जाऊन भालकर यांनी बरेच सामाजिक कार्यदेखील केले होते. जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओ वाचवण्यासाठी त्यांनी लढा दिला होता. ‘लामणदिवा’, ‘पडद्यामागचा सिनेमा’ आणि ‘मला भेटलेली मोठी माणसं’ अशी पुस्तकंही त्यांनी लिहिली होती.

- संजीव वेलणकर, पुणे



चित्र-चरित्र