चित्र-चरित्र

वसंत पवार
वसंत पवार
संगीतकार
१९२७ --- ६ ऑगस्ट १९६५

वसंत शंकर पवार यांचे घराणे मूळचे धार (मध्य प्रदेश) येथील होते. पण भाऊबंदकीला व संस्थानी राजकारणाला वैतागून त्यांचे वडील कोल्हापूरला आले. तेथेच वसंत यांचा जन्म झाला. वसंत यांचे वडील शंकर हे स्वत: उत्तम संगीतकार होते. त्यांना अनेक वाद्ये वाजवता येत व नवयुग फिल्म कंपनीमध्ये ते प्रमुख वादक व संयोजक म्हणून काम करत. ‘आपला मुलगा उत्तम सतारवादक व्हावा’ या ईर्षेतून त्यांनी वसंत यांना शिकवण्यासाठी धारवाडचे सुप्रसिद्ध सताररत्न रहिमतखां यांना कोल्हापूरला बोलावून घेतले आणि १९३४ साली रु. २२००/-चे मानधन देऊन वसंत यांचे गंडाबंधन केले. त्यांच्या हाताखाली वसंत तयार होत होते. त्यांची ग्रहणशक्ती मूळचीच उत्तम असल्याने सतारवादनात ते लवकरच तरबेज झाला. पण विधिलिखित वेगळेच होते. पुण्याला सहज म्हणून मित्रांना भेटायला ‘नवयुग’ स्टुडिओत गेलेल्या वसंत यांचा एका संगीतकाराने अपमान केला आणि या घटनेमुळे दुखावलेल्या वसंत यांच्या मनात संगीतकार व्हायची ईर्षा निर्माण झाली. त्या महत्त्वाकांक्षेपोटी त्यांनी सतारवादन सोडून मुंबईला प्रस्थान केले. तेथे त्यांनी अनेक देशी-विदेशी वाद्ये शिकून त्यावर हुकमत मिळवली. त्यांनी मुंबईला ‘रणजित स्टुडिओ’त वर्षभर उमेदवारी केली. ‘रणजित स्टुडिओ’च्या ‘तानसेन’ (कुंदनलाल सैगल) या चित्रपटामधील सर्व गाण्यातील सतार वसंत पवार यांचीच आहे. ‘रणजित स्टुडिओ’चे संगीत दिग्दर्शक खेमचंद प्रकाश त्यांच्या सतारवादनावर खूश होते.
वसंत पवार १९४४ साली पुण्यात आले. कारण पुण्यात त्या वेळी ‘प्रभात’, ‘डेक्कन’, ‘शालिमार’, ‘नवयुग’ अशा अनेक स्टुडिओत वादकांची आवश्यकता होती. या सर्व चित्रसंस्थांमध्ये १९४४ ते १९४९ या काळात त्यांनी अनेक वाद्ये वाजवली. १९४५ साली ‘गोकुळ’ या चित्रपटाला सुधीर फडके संगीत देत होते. त्यांच्याकडे सतारवादक म्हणून आलेले वसंत पवार पुढे त्यांचे साहाय्यक झाले. १९४८ साली बाबूजींनी त्यांचा ‘जयभीम’ हा हिंदी चित्रपट वसंत पवार यांना संगीत दिग्दर्शनासाठी दिला. त्यानंतर शंकर पवार यांच्या ‘बलिदान’ या चित्रपटालाही त्यांनी संगीताचा हातभार लावला. पण त्यांची खरी वाटचाल सुरू झाली ती १९५० सालच्या ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटापासून. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. मराठी चित्रपटात अस्सल पेशवाई थाटाची, मर्दानी, रंगेल अक्कडबाज आणि झोकदार लावणी वसंतरावांनीच आणली.
वसंतराव हरहुन्नरी कलावंत होते. ते उत्तम जादूगार होते. लहानपणापासून अनेक मोठमोठ्या हिंदी-मराठी साहित्यिकांत (चित्रपट कथालेखकांत) वावरल्यामुळे मूळच्याच हुशार आणि उत्तम ग्रहणशक्ती असलेल्या वसंतरावांना केवळ व्यासंगातून बहुश्रुतता, विद्वत्ता, चतुरस्र बुद्धिमत्ता प्राप्त झाली होती. एकपाठी स्मरणशक्ती असल्यामुळे जुनी गाणी, लावण्या, भजने, शेरोशायरी त्यांच्या ओठावर असत. अनेक नव्या-जुन्या कवींच्या, शायरांच्या रचना त्यांनी मुखोद्गत केल्या होत्या. खाजगी बैठकीत आपल्या स्वच्छ व सुंदर वाणीने ते सार्‍यांना मंत्रमुग्ध करीत. ‘मैफलीचा चांद’ म्हणून पु.ल. देशपांडे वसंतरावांचा उल्लेख करीत.
वसंतरावांनी ५० मराठी व ८ हिंदी चित्रपटांना, तसेच चार नाटकांना संगीत दिले. ‘सांगत्ये ऐका’ (१९५९) व ‘मानिनी’ (१९६२) या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीताचा ‘फाळके गौरव चिन्ह’ पुरस्कार, तर ‘रंगल्या रात्री अशा’ (१९६४) व ‘सवाल माझा ऐका’ (१९६५) या चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार मिळाला. केवळ व्यसनाच्या अतिरेकामुळे, वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी हा गुणी संगीतकार मराठी रसिकांना सोडून गेला.
- मधू पोतदार



चित्र-चरित्र