सुरेश वाडकर यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली, तसेच ‘पतियाळा’ घराण्याची तालीम घेतली. त्यांनी पार्श्वनाथ डिग्रजकर यांच्याकडूनही प्राथमिक गायनाचे शिक्षण व सदाशिव पवार यांच्याकडून तबल्याचे प्राथमिक शिक्षण घेतले. १९७६ साली ‘सूर-सिंगार’ नावाच्या संगीत स्पर्धेत सुरेश वाडकरांनी भाग घेतला. त्यामधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार जयदेव इत्यादी नामवंत परीक्षक होते. सुरेश वाडकर या स्पर्धेत विजेते ठरले. १९७६ नंतर सुरेश वाडकर यांनी चित्रपटांमध्ये गायला सुरुवात केली होती. त्यानंतर जयदेवांनी चाली बांधलेल्या ‘गमन’ या हिंदी चित्रपटातील ‘सीनेमें जलन है’ गाणे वाडकर यांना गायला मिळाले. ‘मेघा रे मेघा रे’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’, ‘ए जिंदगी’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडली आहे. ‘प्रेमरोग’, ‘सदमा’ या चित्रपटातील त्यांची गाणी खूपच गाजली. सुरेश वाडकर यांनी प्रामुख्याने १९९०च्या दशकातील मराठी व अनेक हिंदी चित्रपटांमधून पार्श्वगायन केले आहे. याखेरीज त्यांनी काही भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी चित्रपटांतूनही आणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर यांनी ‘आजीवासन गुरुकुलम’ नावाची संस्था सुरू केली. संगीत स्पर्धांमध्ये सुरेश वाडकर अनेकदा परीक्षक असतात. सुरेश वाडकर यांना त्यांच्या संगीतसेवेसाठी सुमारे ११ पुरस्कार मिळाले आहेत.
२०२० मध्ये सुरेश वाडकर यांना केंद्र सरकारतर्फे 'पद्मश्री' या पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात आले.
- संजीव वेलणकर, पुणे