चित्र-चरित्र

गिरीश घाणेकर
गिरीश घाणेकर
दिग्दर्शक
१६ ऑगस्ट १९४३ --- १९९९

गिरीश गोविंद घाणेकर यांना मराठी चित्रपटसृष्टीतील गोविंद घाणेकर या कल्पक, मेहनती, प्रतिभावान व परोपकारी व्यक्तीच्या पोटी जन्म लाभला. वडिलांच्या स्वभावातला हा सारा वारसा गिरीश यांना लाभला. मुंबई विद्यापीठातून १९६६ साली संख्याशास्त्र विषय घेऊन ते पदवीधर झाले. नंतर त्यांनी भारतीय विद्याभवनातून १९६७ साली विपणनशास्त्राची पदविका आणि १९६८ साली जाहिरातशास्त्राची पदविका मिळवल्या. ते १९६९ साली वडिलांच्या - गोविंद घाणेकरांच्या ‘ट्रायोफिल्म्स’मध्ये रुजू झाले. त्यांनी १९७३ ते १९७४ अशी दोन वर्षे आरसीए टेलिव्हिजन (रेडियो कार्पोरेशन ऑफ अमेरिका)मध्ये कामाचा अनुभव घेतला.
‘निशांत’ (१९७५) व ‘मंथन’ (१९७६) या चित्रपटांचे दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हाताखाली साहाय्यकाचे काम करून गिरीश घाणेकर यांनी दिग्दर्शनाचे धडे घेतले होते.
१९८२ साली गिरीश यांनी ‘जी’ज फिल्म शॉप’ या नावाची स्वत:ची चित्रसंस्था काढली. या संस्थेने व इतर कंपन्यांनी काढलेले बरेच चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. ‘गोष्ट धमाल नाम्याची’, ‘हेच माझे माहेर’, ‘प्रेम करू या खुल्लमखुल्ला’, ‘रंगतसंगत’, ‘राजाने वाजवला बाजा’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘हसण्यासाठी जन्म आपुला’, ‘वाजवा रे वाजवा’ व ‘नवसाचं पोर’ असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. स्वत:ची चित्रसंस्था सुरू करण्याआधीच्या ‘कैवारी’ या चित्रपटाचे ते सूत्रधार होते, तर मातोश्री सुनंदाबाई घाणेकर या निर्मात्या होत्या.
‘गोष्ट धमाल नाम्याची’ या पहिल्याच चित्रपटापासून संकलक अशोक पटवर्धन व संगीतकार अशोक पत्की यांच्याशी त्यांचे विशेष सूर जमले. कमीतकमी वेळात प्रेक्षकांना बरेच काही सांगणे हे जाहिरातपटाचे तत्त्व त्यांनी चित्रपटात वापरले. त्यामुळे त्यांचे सर्व चित्रपट कमालीचे बांधेसूद असून त्यात पाल्हाळ नसे. त्यातील कथानक जरासुद्धा रेंगाळत नसे. उत्तम निर्मितिमूल्य, अभिरुचीसंपन्न कथानक, निर्मळ नर्मविनोद आणि ओघवती मांडणी यामुळे त्यांच्या चित्रपटांना गती असे. त्यांचा मूळ पिंड कलावंताचा. वडिलांबरोबर काम करत त्यांनी आपले कलागुण अधिक विकसित केले व बापसे बेटा सवाई ठरला.
‘हेच माझे माहेर’, ‘प्रेम करू या खुल्लमखुल्ला’ या त्यांच्या चित्रपटांना फाळके पुरस्कार, तर ‘रंगतसंगत’, ‘वाजवा रे वाजवा’ व ‘नवसाचं पोर’ या तिन्ही चित्रपटांना मा.विनायक पुरस्कार मिळाले होते.
‘नवसाचं पोर’ हा गिरीश घाणेकर यांचा शेवटचा चित्रपट ठरला. वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनाने मराठी चित्रपटसृष्टीने एक कल्पक व प्रतिभावान दिग्दर्शक गमावला.
- मधू पोतदार



चित्र-चरित्र