चित्र-चरित्र

विष्णुपंत पागनीस
विष्णुपंत पागनीस
अभिनेता, गायक
१५ नोव्हेंबर १८९२ --- ३ ऑक्टोबर १९४३

विष्णुपंत पागनीस हे नाव समोर आले की प्रथम डोळ्यासमोर येतो तो ‘संत तुकाराम’ हा चित्रपट. प्रभातच्या या चित्रपटाने भारतीय भूमीवरच नव्हे, तर विदेशी जगतातदेखील लौकिक मिळवला होता. त्यांनी संत तुकारामांची भूमिका केवळ अविस्मरणीयच केली होती असे नाही, तर ते उर्वरित आयुष्यातदेखील तुकारामच होऊन गेले. अशा आख्यायिका सांगितल्या जातात की, संत तुकारामाचे फोटो म्हणून विष्णुपंत पागनीसांचेच फोटो प्रचलित झालेले आहेत.

विष्णुपंत पागनीस यांचा जन्म कोल्हापुरात झाला होता. वयाच्या दहाव्या वर्षी विष्णुपंत पागनीस यांनी जनूभाऊ निंबकरांच्या नाटकात स्त्री-भूमिका केली होती. जनूभाऊंची स्वदेशी हितचिंतक नाटक मंडळी त्या काळी खूप लोकप्रिय होती. ‘शारदा आणि शकुंतला’ या नाटकातदेखील त्यांनी भूमिका केली होती.

नाटकामधील भूमिकांच्या या पार्श्वभूमीमुळेच चित्रपटाच्या माध्यमात ते यशस्वी पदार्पण करू शकले. ‘पूना रेडेड’ (१९२४) आणि ‘सुरेखा हरण’ (१९२१) हे त्यांच्या भूमिका असलेले सुरुवातीचे चित्रपट होते. ‘संत तुकाराम’ १९३६ मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर फार थोडा काळ ते चित्रपटसृष्टीत रमले. ‘संत तुलसीदास’ (१९३९) मधील त्यांची भूमिका आणि त्यातील ‘वन चले राम रघुराय’ या गाण्यामुळे ते लोकप्रिय झाले. त्या काळात नट गायक असणे ही काळाची गरज होती. पागनीस स्वत: उत्तम गायक नट होते. त्यांनी गायलेला ‘आधी बीज एकले’... हा अभंग आजही लोकप्रिय आहे. ‘संत तुलसीदास’मधील ‘मेरे मनकी बगिया भूली’ हे वासंती या नटीसोबतचे गाणे आणि ‘भारत की एक सन्मारी की’ हे ‘रामराज्य’ मधील गाणेही पागनीसांचे गाणे म्हणून नोंद घेण्याजोगे आहे. ‘नरसी भगत’ (१९४०), ‘महात्मा विदुर’ (१९४३), ‘भक्तराज’ (१९४३) व ‘रामराज्य’ (१९४३) हे त्यांचे गाजलेले इतर चित्रपट होत.

विष्णुपंत पागनीस यांच्या आवाजातील ‘वंदे मातरम्’ या बंकीमचंद्राच्या गीताची ध्वनिमुद्रिकादेखील लोकप्रिय झाली होती. वर उल्लेखलेले काही चित्रपट हिंदीदेखील होते आणि ज्ञानदत्त यांनी त्यांचे संगीत केले होते, ही एक महत्त्वपूर्ण बाब. असे म्हटले जाते की, तुकारामाच्या झपाटलेपणानेच पागनीसांनी उर्वरित आयुष्य काढले. पण असे असूनही, त्यानंतर १९४३पर्यंत त्यांनी ५-६ चित्रपट केले होते. त्यांचे निधन नेमके कुठे झाले याबद्दल प्रवाद आहेत, पण एका दाव्यानुसार, पंढरपुरीच त्यांचे निधन झाले. आपल्या एका भूमिकेमुळे आणि एका गाण्यामुळे पागनीस जनमानसात अजरामर झाले.

- जयंत राळेरासकर
संदर्भ - १) यादव योगेश, ‘हिंदी ङ्गिल्म सिंगर्स’, प्रकाशक - योगेश यादव, बडोदा; १९८७.



चित्र-चरित्र