चित्र-चरित्र

भालजी पेंढारकर
भालजी पेंढारकर
अभिनेता, पटकथाकार, निर्माता, दिग्दर्शक
३ मे १८९८ --- २६ नोव्हेंबर १९९४

साठ वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत राहून स्वतःचे एक विशिष्ट स्थान निर्माण करणारे अवलिया म्हणजे भालजी पेंढारकर. अभिनेता, कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतलेखक, निर्माता, दिग्दर्शक आणि स्टुडिओ मालक अशा विविध प्रकारे त्यांनी चित्रपटसृष्टीसाठी योगदान दिले.

भालजी ऊर्फ भालचंद्र गोपाळ पेंढारकर यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. वडील गोपाळराव कोल्हापूर येथे नामांकित डॉक्टर होते. अभ्यासापेक्षा मौजमजा करण्यातच भालचंद्रांचे बालपण जास्त गेल्यामुळे त्यांनी जेमतेम सहावीपर्यंतच शिक्षण घेतले आणि शाळा सोडली. शाळा सोडण्याच्या कारणावरून त्यांना घरही सोडावे लागले. ते थेट पुण्याला आले आणि लो. टिळकांच्या ‘केसरी’ या वृत्तपत्रात नोकरी करू लागले. काही काळ तिथे नोकरी केल्यावर ते १९२० मध्ये परत कोल्हापूरला आले व ‘मराठा लाईफ इन्फंट्री’मध्ये कामाला राहिले.

तेथील नोकरी सुटल्यावर भालजी पेंढारकर पुणे येथील एका थिएटरमध्ये मूकपटांची स्फुटे लिहिण्याचे काम करू लागले. लेखनकलेचा अशा प्रकारे श्रीगणेशा झाल्यावर त्यांनी ‘असुरी लालसा’ हे नाटक लिहिले. पुढे ‘क्रांतिकारक’ व ‘भवितव्यता’, ‘संगीत कायदेभंग’, ‘राष्ट्रसंसार’ आणि ‘अजिंक्यतारा’ अशी एकूण सहा नाटके त्यांनी लिहिली.

यानंतर कोल्हापूर येथे भालजींना बाबूराव पेंटर यांनी आपल्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’साठी ‘मार्कंडेय’ या पौराणिक चित्रपटाचे कथानक लिहिण्याची संधी दिली. या वेळी त्यांचा दादासाहेब तोरणे आणि बाबूराव पै यांच्याशी परिचय झाला. ‘मार्कंडेय’चे चित्रीकरण सुरू असताना कंपनीला आग लागली व चित्रित झालेला भाग आगीत जळून गेल्यामुळे बाबूराव पेंटर यांनी या चित्रपटाचे काम बंद केले, त्यामुळे नाराज झालेले भालजी पेंढारकर तोरणे व पै यांच्यासह कंपनीतून बाहेर पडले. त्यांनी ‘पृथ्वीवल्लभ’ (१९२४) या चित्रपटाची योजना आखली. त्या चित्रपटासाठी भालजींनी रंगभूषा, अभिनय याबरोबर पटकथेचीही जबाबदारी स्वीकारली.

चित्रपटलेखनासोबतच भालजींनी दिग्दर्शक होण्याचाही ध्यास घेतला. त्यांनी १९२५ साली ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यानंतर ‘वंदे मातरम्’ हा चित्रपट केला, पण सेन्सॉरने तो असंमत करून त्यातील दृश्य कापून प्रदर्शित करण्यास परवानगी दिली. अखेरीस तो १९२७ साली प्रदर्शित झाला आणि साफ कोसळला. त्यानंतर भालजींनी ‘प्रभात फिल्म कंपनी’साठी ‘उदयकाल’, ‘जुलूम’, ‘बजरबट्टू’ आणि ‘खुनी खंजर’ या मूकपटांच्या कथा लिहिल्या.

या वेळेपर्यंत बोलपटांचा जमाना आला होता; त्यामुळे भालजींनी दादासाहेब तोरणे यांच्या ‘श्यामसुंदर’ (१९३२) या चित्रपटासाठी लेखन, दिग्दर्शन केले आणि त्यात अभिनयही केला. यातील गाणीही भालजींनीच लिहिली होती. हा चित्रपट हिंदी आणि बंगाली भाषेतही तयार झाला. श्रीकृष्णाच्या बाललीलांवर आधारित असलेला हा चित्रपट मुंबईत २५ आठवड्यांपेक्षाही जास्त चालला. भारतीय बोलपटांच्या इतिहासात ‘रौप्यमहोत्सवी’ ठरलेला हा पहिला बोलपट.

यानंतर भालजींनी ‘आकाशवाणी’, ‘पार्थकुमार’, ‘कालियामर्दन’, ‘सावित्री’, ‘राजा गोपीचंद’, ‘गोरखनाथ’, ‘महारथी कर्ण’ हे पौराणिक चित्रपट तयार केले. तसेच ‘कान्होपात्रा’, ‘वाल्मिकी’, ‘भक्त दामाजी’ हे संतपटही केले. ‘स्वराज्याच्या सीमेवर’, ‘नेताजी पालकर’, ‘बहिर्जी नाईक’, ‘जय भवानी’, ‘स्वराज्याचा शिलेदार’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘महाराणी येसूबाई’, ‘पावनखिंड’, ‘नायकिणीचा सज्जा’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘बालशिवाजी’, ‘गनिमी कावा’ हे ऐतिहासिक चित्रपट केले. ‘सूनबाई’, ‘सासुरवास’, ‘मीठभाकर’, ‘मी दारू सोडली’, ‘माय बहिणी’, ‘येरे माझ्या मागल्या’, ‘आकाशगंगा’, ‘साधी माणसं’, ‘तांबडी माती’ वगैरे सामाजिक चित्रपटही केले. यातले काही हिंदी, तर काही मराठी भाषेत होते. ‘महारथी कर्ण’, ‘वाल्मिकी’, ‘स्वर्णभूमी’, ‘जीना सीखो’ हे फक्त हिंदीत होते, तर बाकीचे सर्व फक्त मराठी भाषेतच होते.

दादासाहेब तोरणे हे भालजींना ‘भालबा’ म्हणत, तर इतर लोक त्यांना ‘बाबा’ या आदरयुक्त नावाने ओळखत. बाबांनी आजन्म चित्रपट व्यवसाय केला असला, तरी या व्यवसायाला आपल्या ध्येय धोरणांच्या मर्यादा घालूनच त्यांनी तो केला. निव्वळ कलात्मक अथवा गल्लाभरू चित्रपट करणे त्यांच्या स्वभावाला कधीच मानवले नाही. देशप्रेम, स्वधर्माभिमान, ईश्‍वरनिष्ठा, संयम, सदाचार, सद्भिरुची या गुणांची जोपासना करून त्यांनी चित्रपटांसाठी कथा लिहिल्या आणि त्याच उद्दिष्टांनी चित्रपट निर्मिले व दिग्दर्शित केले. ग्रामीण भाषेला चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी चिरंजीव केले. त्यांनी लिहिलेले खटकेबाज संवाद हे त्यांच्या चित्रपटांचे खास आकर्षण असायचे आणि म्हणूनच त्यांच्या चित्रपटांच्या अखेरीस ‘भालजी पेंढारकर बोलपट’ असा मजकूर वाचायला मिळायचा.

भालजी पेंढारकर यांनी चित्रपटसृष्टीस अनेक नामवंत कलाकार व तंत्रज्ञ दिले. शाहू मोडक, शांता आपटे, शांता हुबळीकर, दादा कोंडके यांनी सर्वप्रथम पडदा पाहिला तो भालजींमुळेच. शिवाय मा. विठ्ठल, बी. नांद्रेकर, रत्नमाला, राजा परांजपे, जयशंकर दानवे, चित्तरंजन कोल्हटकर, रमेश देव, अनुपमा, चंद्रकांत, सूर्यकांत, सुलोचना यांचा अभिनय फुलला तो भालजींच्याच चित्रपटांमधून. सी. बालाजी व हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारखे संगीतकार भालजींनीच चित्रपटसृष्टीला मिळवून दिले, तर गानसम्राज्ञी लता मंगेशकरांनी ‘आनंदघन’ या नावाने भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटांना स्वरसाज चढवला. ‘वाल्मिकी’ या चित्रपटात राज कपूर यांना भालजींमुळे अभिनय करण्याची संधी मिळाली. ज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर भालजींसमोर आदराने मान झुकवीत, तर दक्षिणेकडील बी.एन. रेड्डी, पुल्लय्या यांच्यासारखे दिग्गज दिग्दर्शक भालजींना गुरुस्थानी मानत. जन्म, लहानपण व शिक्षण कोल्हापूर येथे झाले असल्याने भालजींनी कोल्हापूर हीच आपली कर्मभूमी मानली आणि १९४३ साली ‘कोल्हापूर सिनेटोन’ विकत घेऊन तिचे ‘जयप्रभा सिनेटोन’ असे नामाभिधान करून ‘प्रभाकर पिक्चर्स’ व अन्य संस्थांतर्फे कोल्हापूर येथेच चित्रपट काढले. १९४८ साली म. गांधी हत्येनंतर उसळलेल्या दंगलीत त्यांचा स्टुडिओ जाळण्यात आला; त्यामुळे भालजींचे अपरिमित नुकसान झाले, पण तरीही न डगमगता त्यांनी हरप्रयत्नांनी स्टुडिओ पुन्हा उभारून तेथेच चित्रनिर्मिती सुरू केली. त्यासाठी काढलेले कर्ज फेडता न आल्याने स्टुडिओचा लिलाव झाला व तो स्टुडिओ लता मंगेशकर यांनी विकत घेतला. स्वतः घडवलेल्या स्टुडिओची मालकी गेली, पण स्टुडिओवर भालजींचीच हुकमत शेवटपर्यंत राहिली. त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट ‘गनिमी कावा’ (१९८१) हा होता, तर त्यांचा कथा-संवाद आणि निर्मिती असलेला अखेरचा चित्रपट ‘शाब्बास सूनबाई’ १९८६ साली पडद्यावर आला.

१९६० साली महाराष्ट्र सरकारने मराठी चित्रपटासाठी पुरस्कार सुरू केले, पण त्या वेळीही भालजींनी आपले चित्रपट पुरस्कारार्थ पाठवण्यास नकार दिला. अखेरीस ‘साधी माणसं’ हा चित्रपट त्यांच्या आप्तस्वकीयांनी व स्नेह्यांनी पुरस्कारासाठी पाठवण्याची त्यांना भीड घातली. त्यांनीही सार्‍यांची विनंती मानली व त्या चित्रपटास महाराष्ट्र शासनाची नऊ पारितोषिके प्राप्त झाली. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संवाद या विभागांमध्ये भालजींना पारितोषिके मिळालेली होती. त्यानंतर सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट या विभागात ‘तांबडी माती’ या चित्रपटाला राष्ट्रपती पारितोषिके मिळालेली होती. याखेरीज १९९१ साली ‘चित्रभूषण’ व ‘जीवनगौरव पुरस्कार’ही त्यांना प्राप्त झालेले होते. १९९४ साली त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या ग.दि. माडगूळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणार्‍या ‘ग.दि.मा.’ पुरस्कारानेही त्यांना गौरवले होते. १९९२ साली त्यांना चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च ‘दादासाहेब फाळके पारितोषिक’ तत्कालीन माहिती व नभोवाणी मंत्री अजीत पांजा यांनी कोल्हापूर येथे जाऊन दिले होते.

बाबा हे अत्यंत साधे व्यक्तिमत्त्व होते. कधीकधी सूटबूट या वेषात फिरणारे बाबा महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने हातमागचे कपडे वापरू लागले व त्यानंतर त्यांनी पांढरा शर्ट आणि अर्धी चड्डी हाच आपला वेश कायम ठेवला. त्यांची विचारधारा हिंदुत्ववादी होती; यामुळेच ते वि. दा. सावरकर, डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्याकडे ओढले गेले. डॉ. हेडगेवार यांनी त्यांची कोल्हापूरच्या संघसंचालकपदी निवड केली. करवीर हिंदूसभेचेही ते सर्वाधिकारी होते. स्वतः कट्टर हिंदुत्ववादी असूनही अनेक गांधीवादी, साम्यवादी, समाजवादी पुढार्‍यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते, पण ‘गांधीहत्येचा कट जयप्रभा सिनेटोनमध्येच शिजला’, असा संशय घेऊन तत्कालीन सरकारने त्यांना अटक करून तुरुंगवास भोगायला लावला. त्या वेळी ते स्थितप्रज्ञ राहिले. कुणाबद्दलही मनात आकस न ठेवता त्यांनी आपले काम पूर्वीच्याच उत्साहाने आणि जिद्दीने सुरू ठेवले. बाबांची परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा होती. भगवान श्रीकृष्ण व छत्रपती शिवाजी महाराज ही त्यांची आराध्यदैवते. त्यांच्या चिंतन, मनन व पूजनाद्वारे बाबांना जीवनाचा मंत्र मिळाला. कार्याची दिशा व प्रेरणा मिळाली. अशा अवतारी पुरुषांच्या चरित्रांतून आणि चारित्र्यातूनच त्यांच्या जीवनात देव, देश आणि धर्म यावरील अढळ निष्ठांचा उदय झाला. या निष्ठांच्या प्रचारासाठीच त्यांनी आपली वाणी, लेखणी वाहून घेतली आणि चित्रपट निर्मिती केली. याच प्रेरणेतून त्यांनी १९५२ साली शिवरायाचा जन्म ते राज्याभिषेक दर्शवणारा ‘छत्रपती शिवाजी’ हा चित्रपट सादर केला. त्याचप्रमाणे १९६५ साली साधा, सरळ, आशयघन हा ‘साधी माणसं’ सामाजिक चित्रपट केला.

वयाच्या ९७व्या वर्षी कोल्हापूर येथे भालजी पेंढारकर यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूपूर्वी एक वर्ष त्यांचे ‘साधा माणूस’ नावाने आत्मवृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यांना दादासाहेब फाळके पारितोषिक प्रदान करण्याचा समारंभ होता, त्या वेळी ‘भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रां’साठी भारत सरकारने पाच लाख रुपयांची देणगी दिली.

(मजकूर लेखन सौजन्य : विवेक मासिक, आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण, शिल्पकार चरित्रकोश) मंदार जोशीचित्र-चरित्र