चित्र-चरित्र

अरविंद गोखले
अरविंद गोखले
साहित्यिक, कथाकार
१९ फेब्रुवारी १९१९ --- १९९२

जन्मशताब्दी
कथाव्रती अरविंद गोखले
कथेचंच लागीर झालेल्याची जन्मशताब्दी
साहित्यिक म्हणून कथाकार गोखले जितके मोठे होते, त्याहूनही मोठा होता, तो त्यांच्यातील दिलदार माणूस ! कथेवरचं त्यांचं प्रेम इतकं बलवत्तर होतं की, समकालीन प्रतिभावंत कथाकारांना प्रतिस्पर्धी न मानता वामनराव चोरघडे, ना. सी. फडके, व्यंकटेश माडगूळकर, दि. बा. मोकाशी, सदानंद रेगे यांच्या निवडक कथांची संपादने त्यांनी केली. 'कथाकार' मधून प्रमुख बारा भारतीय भाषांतील कथा लेखकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या कथांचा परिचय मराठी वाचकांना गोखल्यांनी करून दिला.

ज्याची अलौकिक प्रतिभा आपल्या वाचनाला प्रतिभेचे धुमारे सतत फुटवते आणि आपल्याला जगण्याचे बळ देते, असा साहित्यिक मृत्यूच्या धाब्यामुळे शरीराने आपल्यातून निघून गेला, तरी तो संपून जातो का ? छे ! त्याच्या चाहत्यांच्या मनात तो कायमचाच कोरून राहिलेला असतो...

तो कसा, याची प्रचिती गेले वर्षभर मी घेत आहे कथाकार अरविंद गोखले हा साहित्यिक एवं गुण विशिष्ट ठरावा ! त्याचे एक कारण म्हणजे, या साहित्यिकाने आयुष्यभर कथा एके कथा या एकाच वाड्मय प्रकारचा घेतलेला ध्यास ! प्रत्येक साहित्यिकाला कधी ना कधी कादंबरी काव्यादी अन्य कुठल्या ना कुठल्या वाड्मयप्रकारावर आपली लेखणी चालवायचा मोह हा होतोच. पण वयाच्या सतराव्या वर्षी स. प. महाविद्यालयाच्या 'परशुरामिय' नियतकालिकात 'हेअर कटिंग सलून' ही पहिली कथा प्रकाशित झाल्यापासून २४ ऑक्टोबर १९९२ ला एशियाडमधील दुर्दैवी अपघातामुळे ७३ व्या वर्षी मृत्यू येईपर्यंत, पन्नास वर्षांहून अधिक काळ एखाद्या व्रतस्थ तपस्व्याप्रमाणे गोखल्यांनी केवळ कथालेखन केले. नुकतेच निवर्तलेले जेष्ठ कथाकार शांताराम (प्रा. के. ज. पुरोहित) यांनी 'कथारमण', श्री. पु. भगवंतांनी 'कथंहोत्री', डॉ. यशवंत पथकांनी 'कठोपासक' अशी विशेषणे त्यामुळे कथाव्रती गोखल्यांना लावली होती....

मराठीतल्या या पहिल्या सुवर्णमहोत्सवी कथाकाराच्या श्रेयमालिकेत अनेक मनाचे मोती आहेत ! १९४५ साली मराठी नवकथेचा वेध घ्यायला सरसावलेल्या 'सत्यकथा' मासिकात, गोखल्यांची 'कोकराची कथा' ही, एका भगोड्या सैनिकाच्या भावनिक उलथापालथीचा मनोज्ञ वेध घेणारी कथा प्रकाशित झाली आणि श्री. पु. प्रा. रा. भि. जोशी प्रभृती मान्यवर समीक्षकांनी 'मराठी नवकथेचे बिनीचे शिलेदार' म्हणून गोखल्यानं गौरविले. १९४४ साली प्रकाशित झालेल्या 'नजराणा' या पहिल्या कथासंग्रहापासून ते अखेरच्या १९९२ च्या ‘कथाष्टक' पर्यंतच्या कथासंग्रहातून त्यांच्या सुमारे पावणेसहाशे कथा संग्रहित झाल्या आहेत. त्यात लघुकथा, लघुत्तम कथा, दुर्गकथा, साखळी कथाबंध अशा विविध रचनातंत्र प्रकारांतून, समृद्ध जीवनानुभवाचे गोळीबंद दर्शन घडवण्याचे आपले सामर्थ्य गोखले प्रकट करीत राहिले. मंजुळा, नर, कमळण, रिक्ता, माहेर, कातरवेळ, आभा सावंत, वेडी बाभूळ, अविधवा, मिलन, जागरण, कवडसा, शुभा, मिथिला, यात्रा, मुक्ता, विघ्नहर्ती यांसारख्या मराठी कथेचा मानदंड ठरलेल्या असंख्य सरस कथा त्यांनी लिहिल्या.

हल्ली भारतीय साहित्यिकांसाठी बुकर वगैरे अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके उपलब्ध झाली आहेत ! पण मराठी कथेला पहिला आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवून देण्याचे श्रेयही अरविंद गोखल्यांकडेच जाते ! लंडनच्या 'एनकाऊंटर' मासिकाने १९५९ साली आफ्रिकी - अरबी - आशियाई कथाकारांसाठी जाहीर केलेल्या कथास्पर्धेत, गोखल्यांची 'गंधवार्ता' ही कथा डॉ. इआन रिसाईड यांनी अनुवादून पाठवली होती. ग्रॅ हम ग्रीन व स्टीफन स्पेन्डर यांसारख्या नामवंतांनी त्या स्पर्धेचे परीक्षण करून गोखल्यांच्या त्या 'गंधवार्ता'ला अव्वल क्रमांकाचे पारितोषिक दिले होते ! दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, 'साहित्यात, विपुलता व गुणवत्ता यांचे प्रमाण नेहमी व्यस्तच आसते, हा जो समज आहे; तो समज विपुल कथा लिहूनही आपली गुणवत्ता राखलेल्या गोखल्यांनी खोटा पडला आहे !

हा चमत्कार घडला कारण, गोखल्यांनी कथा केवळ लिहिली नाही ते कथा जगले ! कथा लिहिता - लिहिता ते जगले आणि त्या नवनिर्माणाच्या तंद्रीत धुंदीने जगताना ते कथा लिहीत राहिले ! कथालेखन हीच त्यांची जीवनदृष्टी होती. 'अग्निहोत्र' या आपल्या लेखनाची वाटचाल सांगणाऱ्या ग्रंथात त्यांनी लिहूनच ठेवलंय, शब्दांशी नाते जडल्यावर वयात येताच मी लघुकथेशी गंधर्वविवाह केला. कथालेखन हे मला श्वासोच्छ्वासासारखे आवश्यक व सहज आहे. ‘टू मी इट्स ए वे ऑफ लाईफ’ ! म्हणजे, कथालेखन हाच त्यांच्या लेखणीचा धर्म होता. माणसाच्या मनोव्यापारांचा वेधच ते आपल्या कथालेखनातून घेत राहिले. मुख्य म्हणजे, सदाशिवपेठी गोखल्यांचे हे कथाविश्व केवळ पांढरपेशा उच्चवर्णियांपुरतेच सीमित राहिलेले नाही. निरनिराळ्या जाती धर्मांच्या व्यवसायांतील, भिन्नभिन्न परिस्थितीतल्या असंख्य नानाविध व्यक्तींच्या अगदी वेश्यांच्याही मानसिकतेचा शोध त्यांची कथा कुठल्याही शैलीतंत्रात बंदिस्त न होता घेत राहते. .

मुख्य म्हणजे, गोखल्यांची कथा स्त्री दुःखप्रमाणे अमानवी जीवनानुभवांनाही तितक्याच समर्थपणे सामोरी जाते. 'माहेर’ या कथेत भितीवरल्या एका वेलीचे काव्यात्म चित्रण गोखले करतात. 'के' या कथेत ते कोकिळेचा भावमधुर प्रणय चितारतात. 'पारु’ या कथेत ते आपल्या रेडकूनच्या आठवणींनी आक्रंदणाऱ्या म्हशीचे चित्रण करतात ! त्यांच्यातल्या उन्मुक्त, स्वछंदी कथाकाराची प्रतिभा कुठल्याही विषयांची मर्यादा मानत नसल्याने या अमानवी विषय सृष्टीतही ती समरसतेने रममाण होताना दिसते !

आशयघनतेमुळे देश - धर्म - जात - काळ यांच्या सीमारेश गोखल्यांची कथा ओलांडते. त्यामुळेच 'अविधवा' सारख्या त्यांच्या अनेक कथांचे अनुवाद केवळ हिंदी, गुजराती, उडिया, राजस्थानी, कोकणी, काश्मिरी, डोंगरी, मणिपुरी, कन्नड, मल्याळम आदी भारतीय भाषांतच नव्हे, तर इंग्रजी, जर्मन, रशियन आदी विदेशी भाषांतही झालेत.

साहित्यिक म्हणून कथाकार गोखले जितके मोठे होते, त्याहूनही मोठा होता, तो त्यांच्यातील दिलदार माणूस ! कथेवरचं त्यांचं प्रेम इतकं बलवत्तर होत कि, समकालीन प्रतिभावंत कथाकाराना प्रतिस्पर्धी न मानता, वामनराव चोरघडे, ना. सी. फडके, व्यंकटेश माडगूळकर, दि. बा. मोकाशी, सदानंद रेगे यांच्या निवडक कथांची संपादने त्यांनी केली. 'कथाकार' मधून प्रमुख बारा भारतीय भाषांतील कथा लेखकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या कथांचा प्रतिच्या मराठी वाचकांना गोखल्यांनी करून दिला. साहित्य अकादमीची 'एमिरिट्स स्कॉलरशिप' त्यांना १९८४ - ८५ मध्ये मिळाली तर, पाकिस्तान - बांगला देशाचे दौरे करून तिथल्या साहित्यिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या शब्दचित्रांसह त्यांच्या उत्कृष्ट उर्दू कथांचे अनुवाद त्यांनी मराठीत केले. उत्कृष्ट अमेरिकन कथाही त्यांनी मराठीत अनुवादिल्या. आज आपण ज्या धर्मांधता असहिष्णुता आदी दुर्गुणांच्या भिंती स्वतःभोवती कुरवाळत जगत आहोत त्या पार्श्ववभूमीवर गोखल्यांचे हे निरपेक्ष कथाप्रेम एक जपण्याजोगी बाब वाटते ! पुन्हा पुन्हा अधोरेखित करावे असे हे त्यांचे अमोल कार्य आहे.

आपल्या मराठी साहित्यिकांच्या पराकोटीची गटबाजी आढळते. समकालीन साहित्यिकाला प्रतिस्पर्धी मानून, त्याचे साहित्यगुण दुर्लक्षून त्याला वाळीत टाकणे हा प्रकार सर्रास घडताना आढळतो. अशा गटबाजीपासून अलिप्त राहून आपले निर्भेळ कथाप्रेम जोपासताना गोखले सदैव विनयाने सांगत राहायचे, तुम्ही केवळ आम्हा चौघांनाच नवकथेचे बिनीचे शिलेदार म्हणून का गौरवता ? दि. बा. मोकाशी, के. ज. पुरोहित, सदानंद रेगे हे देखील लक्षणीय कथा लिहिताहेत की !

केवळ कथेचेच लागीर (बाधा ) झालेल्या गोखल्यानां प्रसिद्धी, मानसन्मान, साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कशा कशाचा म्हणून मोह नव्हता ! पु. भा. भावे, गंगाधर गाडगीळ, ग. दि. माडगूळकर हे त्यांचे तिन्ही मित्र साहित्य संमेलनाध्यक्ष झाले ; पण यांना कधी त्या पदाचा लोभ मुळी कसा तो वाटलाचं नाही ! त्या संदर्भात राजाभाऊ बेहेरे यांनी गोखल्यानां एकदा छेडले तेंव्हा त्यांनी पुढील आठवण निव्याजपणे सांगितली होती. माडगूळकर बंधूंचा आणि माझा अगदी घनिष्ट संबंध होता. अण्णा (गदिमा) साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. तेंव्हा त्यांचा अभिनंदन करण्यासाठी मी 'पंचवटी'वर गेलो होतो. ते खूप आनंदी होते. पण मला पाहताच ते एकदम काहीसे अंतर्मुख झाले. अभिनंदनाचे पुढे केलेले माझे हात आपल्या हातात घट्ट धरून सदगदितपणे मला ते म्हणाले, 'अरे अरविंदा, माझं कसलं अभिनंदन करतोस ? माझ्यापेक्षा आणि व्यंकटेशपेक्षा तू खरा सिनियर ऑथर ! खरं तर आमच्या आधी हा मान तुला मिळायला हवा होता ! तुझ्या नावाची श्रेष्ठता कुणी कुणाला सांगायला हवी का ?'

अण्णांच्या मोठ्या मनाचे ते प्रामाणिक बोल बेहेऱ्यांनी कृतज्ञतापूर्वक सांगणाऱ्या गोखल्यांच्या नशिबी मात्र, नंतरच्या समीक्षकांकडून ही उदारमनस्कता आली नाही ! त्यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूनंतर सर्व साहित्यविश्व जरून हळहळले. मान्यवरांचे शोक लेख झापून आले. पण नंतर सर्व चिडीचूप ! पुण्याच्या प्रा. संस्कृती आवलगावकर व नागपूरच्या छाया नाईक या दोन मराठीच्या प्राध्यापिकांनी कथाकार गोखले या विषयावर प्रबंध लिहून पी. एच. डी. मिळवली. पण गटबाजीग्रस्त समीक्षकांनी गोखले नावाबाबत तोंडात मिठाची गुळणी धरली ती कायमचीच ! महाराष्ट्र सरकारलाही गोखले जन्मशताब्दीचे विस्मरण झाले ....

पण आधी म्हंटले आहे. त्याप्रमाणे सच्चे रसिक आपल्या आवडत्या साहित्यिकाला कधीच कसे विसरत नसतात, याचा प्रत्यय १९ फेब्रुवारी २०१८ ला गोखल्यांची जन्मशताब्दी वर्ष सुरु झाल्यापासून येत आहे ! अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठातून कृषी पत्रिकारितेची पदवी संपादन केलेल्या गोखल्यांच्या माझ्याशी लेकीचे नाते जोडून, मला पत्रकारितेतील बातमीदारीची तेंव्हा अजिबात न रुळलेली वाट चोखाळण्याचा सल्ला देऊन उचित मार्गदर्शन केले, म्हणूनच आजची नामवंत पत्रकार, मराठीतील आद्य महिला वार्ताहर, 'चित्रपश्चिमा'कार म्हणून माझी जडणघडण झाली. ते ऋण स्मरुन जन्मशताब्दीनिमित्त २७ फेब्रुवारीला 'कथाव्रती अरविंद गोखले' या माझ्या ग्रंथाचे प्रकाशन डॉ. नागनाथ कोत्तापले यांच्या हस्ते समारंभपूर्वक केले, तर गोखल्यांच्या चाहत्यांनी ग्रंथ संग्रहालयाचे गावस्कर सभागृह ओसंडून गेलेले होते. सोहळ्याच्या त्या दोन तासात ग्रंथालीने विक्रीसाठी आणलेल्या सर्व नव्वद प्रतींची हातोहात विक्री झाली होती आणि पाच महिन्यात पुस्तकाची पहिली आवृत्ती संपूनही गेली ! त्या सोहळ्यानंतर ठाण्यापासून उरणपर्यंत ठिकठिकाणी नगर वाचनालये, अगदी एशियाटिक सोसायटीच्या दरबार हॉलमध्येही गोखल्यांचे चाहते जन्मशताब्दी स्वयंस्फूर्तपणे साजरी करत आहे. जन्मशताब्दी साजरी होते ती अशी...

--- नीला वसंत उपाध्ये



चित्र-चरित्र