चित्र-चरित्र

राजदत्त
राजदत्त
दिग्दर्शक
२१ जानेवारी १९३२

राजदत्त - सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी चित्रपट माध्यमाचा विलक्षण सर्जनशीलतेने वापर करणारे ‘दिग्दर्शक’ व्यक्तिमत्त्व. या व्यक्तिमत्त्वाने ‘चित्रपट’ दिग्दर्शनाला श्रेष्ठतम मूल्य प्राप्त करून दिले, असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

आपल्याला परिचित असणारे राजदत्त चित्रपटसृष्टीत ‘दत्ताजी’ या नावाने ओळखले जातात. पण त्यांचे पाळण्यातले नाव ‘दत्तात्रेय’. विदर्भातील धामणगाव या लहानशा गावात जन्मलेल्या दत्तात्रेय अंबादास मायाळू उर्ङ्ग राजदत्त यांच्या आईचे नाव प्रभावती. वडील अंबादास मायाळू रेल्वेत नोकरी करत असल्यामुळे लहानग्या दत्ताजींचे शालेय शिक्षण अनेक गावांतून पार पडले. पण मॅट्रिक व त्यानंतरचे बी.कॉम. पदवीपर्यंतचे शिक्षण मात्र वर्ध्यातील जी.एस. महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात असतानाच त्यांनी नाटके, मेळे यांच्यामध्ये आवड म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती, तेव्हा पुढे आपण या क्षेत्रात आपली कारकिदर्र् घडवू, अशी पुसटशी कल्पनाही त्यांना आली नाही.

शालेय जीवनापासूनच ग.त्र्यं. माडखोलकर यांच्यामुळे पत्रकारितेशी जवळून परिचय आलेल्या दत्ताजींनी महाविद्यालयीन शिक्षण संपताच पुण्यातील दैनिक भारतमध्ये नोकरी करण्यास प्रारंभ केला. पत्रकारितेच्या क्षेत्रात जम बसत असतानाच दैनिक भारत बंद पडले. त्यामुळे त्यांनी ‘चांदोबा’ या मद्रासहून लहान मुलांसाठी निघणार्‍या साप्ताहिकात भाषांतरापासून संपादनापर्यंतची सर्व कामे तन्मयतेने केली. ही कामे करत असतानाच महाराष्ट्र मंडळाच्या एका कार्यक्रमात त्यांची राजाभाऊ परांजपे यांच्याशी ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर परिचयात झाल्यावर दत्ताजींनी राजाभाऊ परांजपे यांच्याकडे चित्रीकरण बघण्याची परवानगी मागितली. ही परवानगी मिळताच दिवसा चित्रीकरण पाहून रात्री चांदोबाची कामे करण्याचा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. हा दत्ताजींचा चित्रपटसृष्टीतला पहिला, अप्रत्यक्ष पण केवळ शारीरिक वावर.

चित्रीकरणादरम्यान निर्माण झालेल्या जिव्हाळ्यातून चित्रीकरण संपताच राजाभाऊ व दत्ताजी दोघेही एकत्रच पुण्यात दाखल झाले आणि राजाभाऊंनी ‘जगाच्या पाठीवर’(१९६०) या चित्रपटात साहाय्यक दिग्दर्शक म्हणून दत्ताजींना संधी दिली.

स्वभावात मुळातच असणार्‍या चिकित्सक वृत्तीने दत्ताजींनी या क्षेत्राकडे पाहण्यास सुरुवात केली व त्यातील सूक्ष्मातिसूक्ष्म बारकावे हेरले व ते आत्मसात केले. हे बारकावे आत्मसात करताना त्यांनी केवळ अंधानुकरण न करता ‘दिग्दर्शन’ या क्षेत्राविषयी स्वत:च स्वत:ची दृष्टी घडवली. तसेच चांगले दिग्दर्शन करण्यासाठी कोणत्या गोष्टी करणे गरजेचे असते व कोणत्या गोष्टी केल्या तर दिग्दर्शनातल्या त्रुटी टाळता येतील, याचा त्यांनी या क्षेत्रात येण्यापूर्वीच साकल्याने विचार व अभ्यास केला. या अभ्यासातून निर्माण झालेली दिग्दर्शकीय तत्त्वे त्यांनी आपल्या सबंध कारकिर्दीत सातत्याने पाळली. म्हणूनच स्वत: दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला नाही व जेव्हा अभिनय केला तेव्हा दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनाला महत्त्व देऊन दिग्दर्शन क्षेत्राचा व पर्यायाने दिग्दर्शकाच्या दृष्टीचा मान ठेवला. यातूनच त्यांची प्रत्येक क्षेत्राकडे अलिप्तपणे पाहण्याची दृष्टी, प्रत्येक क्षेत्राचा मूलभूत विचार हा सहजपणे तरीही हेतुपुरस्सर केलेल्या कृतीतून अधोरेखित होतो. ‘दुसर्‍या जगातली’ (२०१२) या चित्रपटात त्यांनी ङ्गक्त अभिनय केला.

‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटानंतर राजदत्त यांनी ‘सुवासिनी’ (१९६१), ‘पाठलाग’ (१९६४) इ. चित्रपटांचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. याच दरम्यान दत्ताजी यांनी राजाभाऊ यांच्या नावातील ‘राज’ व स्वत:च्या नावातील ‘दत्त’ निवडले व ते ‘राजदत्त’ झाले. येथूनच त्यांचे दिग्दर्शक या पदामागचे ‘साहाय्यक’ हे अभिदान गेले व ते पूर्ण दिग्दर्शक झाले. त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट म्हणजे ‘मधुचंद्र’ (१९६७). प्रभाकर ताम्हाणे यांच्या ‘अल्ला जाने क्या होगा आगे’ या हास्यरसावर बेतलेल्या कथेचा वापर करायचे ठरवल्यावर गंभीर प्रवृत्तीच्या राजदत्त यांना अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागले, पण त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी मधुसूदन कालेलकर यांच्याकडून पटकथा लिहून घेतली. काशिनाथ घाणेकर, उमा, राजा परांजपे, नाना पळशीकर या कलाकारांना घेतले व दिग्दर्शन केले. आश्‍चर्य म्हणजे हा चित्रपट यशस्वी ठरला. या चित्रपटाचे वैशिष्ट्य त्यातील कोपरखळ्यांनी भरलेल्या विनोदात व दिग्दर्शनाच्या मांडणीत दडलेले आहे.

जयप्रभा स्टुडिओत भालजींनी राजदत्त यांना ‘घरची राणी’ (१९६८) या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी बोलावले. ग्रामीण परिसरात घडणार्‍या या कथेमध्ये सुलोचना व अनुपमा यांनी काम केले. या चित्रपटाला राज्य शासनाचे पहिले पारितोषिक मिळाले आणि त्यांच्या दिग्दर्शकाच्या भूमिकेला खर्‍या अर्थाने प्रारंभ झाला. या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळेच त्यांना आचार्य अत्रे यांना भेटण्याची संधी मिळाली व पुढे त्याचे मैत्रीत रूपांतर झाले. येथेच त्यांची सोपानदेव चौधरी, रणजित देसाई यांसारख्या दिग्गजांशीही ओळख झाली.

दत्ताजींनी ‘भोळी भाबडी’ (१९७३), ‘वर्‍हाडी आणि वाजंत्री’ (१९७३), ‘या सुखांनो या’ (१९७५) या चित्रपटांचेही यशस्वी दिग्दर्शन केले. पण १९७९ साली त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘अपराध’ त्यातील मांडणीमुळे लोकप्रिय ठरला आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा राज्य शासनाचा पहिला पुरस्कार पटकावला. आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी कळत-नकळतपणे अपराध करण्याच्या मानवाच्या मूलभूत प्रवृत्तीवर हा चित्रपट भाष्य करतो. अभिनेत्रींना त्यांच्या साचेबद्ध अभिनयातून बाहेर काढण्याचे व त्या साचेबद्ध अभिनयाच्या परस्परविरोधी वळण देण्याचे कामही राजदत्त यांनी हेतुत: केलेले दिसते. त्यामुळेच उमा या ग्रामीण धर्तीच्या चित्रपटांमध्ये ग्रामीण स्त्रीचा अभिनय करणार्‍या अभिनेत्रीला ‘मधुचंद्र’मधून शहरी केले, तर सोज्ज्वळ, सात्त्विक भूमिका करणार्‍या सीमा देव यांना ‘अपराध’ या चित्रपटात खलप्रवृत्तीची भूमिका दिली. बदलाची व त्यातून नावीन्यपूर्ण कल्पना साकारण्याची ही दिग्दर्शकीय पद्धत चित्रपटसृष्टीत अभावानेच आढळते. तसेच रूढ कथानकांच्या निवडीपेक्षा नावीन्यपूर्ण कथेची निवड दिग्दर्शनासाठी करून, त्यातून नवी कल्पना मांडण्याची प्रतिभा दिग्दर्शक म्हणून राजदत्त यांच्याकडे आहेच. त्याच बरोबरीने आपल्या आजूबाजूच्या बाह्य वास्तवातच दिग्दर्शनासाठीची सूत्रे दडलेली असतात आणि निरीक्षणाद्वारे ती आपल्याला आकळतात याचे भानही दिग्दर्शक या नात्याने त्यांच्याकडे आहे, याचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे.

चित्रपट हे प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे, हे लक्षात घेऊनच राजदत्त चित्रपटाचे दिग्दर्शन करत असल्यामुळे त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘देवकीनंदन गोपाला’ (१९७७) या चित्रपटात अंधश्रद्धामय दृष्टिकोन आढळत नाही. या चित्रपटात गाडगेबाबांना लौकिकार्थाने मिळालेले ‘संतत्व’ राजदत्त यांनी दाखवायचे टाळून जाणीवपूर्वक ‘माणुसकी जपणारा व अंधश्रद्धेवर प्रहार करणारा समाजसुधारक’ असे गाडगेबाबांचे व्यक्तिचित्र रेखाटलेले आहे. त्यामुळे आपसूकच गाडगेबाबांच्या विचारसरणीला व कामाला योग्य तो न्याय चित्रपटाच्या माध्यमातून राजदत्त यांनी दिला, हे म्हणणे आक्षेपार्ह ठरणार नाही. या चित्रपटानंतर राजदत्त यांनी १९७९ मध्ये ‘अष्टविनायक’सारखा चित्रपट प्रेक्षकांना दिला. यात त्यांंनी माणसाची आस्तिकता-नास्तिकता यांवर प्रकाश टाकून माणसाच्या आयुष्यातील ‘श्रद्धेचे’ महत्त्व अधोरेखित केलेले आहे. श्रद्धा हा माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग असते व त्यामुळेच जगण्याची ऊर्मी माणसाला मिळत असते, याचे भान या चित्रपटाने व्यक्त केले आहे. १९८२ सालच्या ‘शापित’सारख्या चित्रपटातून वेठबिगार ‘बिजली’ आपल्यावर झालेल्या अन्यायाने पेटून उठते व एकंदर व्यवस्थेविरूद्धचा आपला एकांगी लढा स्वीकारते, त्यात यशस्वी होते, असे चित्रण आलेले आहे. बिजली या व्यक्तिरेखेचा अंतर्गत व बाह्य पातळीवरचा संघर्ष मधू कांबीकर यांच्या अभिनयातून व या अभिनयाला मिळालेल्या दिग्दर्शकीय सूचनांमधून सूक्ष्मातिसूक्ष्म पातळीवर अभिव्यक्त होतो. या सर्व घटकांच्या एकजिनसीपणातूनच हा चित्रपट सर्वांगाने उत्कृष्ट ठरतो व राष्ट्रपती पदक प्राप्त करून जातो, हे विशेष उल्लेखनीय आहे.

सामाजिक बांधिलकी जपणे हा राजदत्त यांच्या दिग्दर्शनाचा गाभा आहे. सामाजिक प्रवृत्तीवर प्रहार करण्यासाठी ते चित्रपट माध्यमाचा यथोचित वापर करतात, त्यामुळेच २१ व्या शतकातही हुंडा पद्धती आपल्याकडे कालबाह्य ठरत नाही या भानातून त्यांनी ‘हेच माझे माहेर’ (१९८३) हा चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली, पण दिग्दर्शक या नात्याने त्यांनी ‘तरुणांनी हा चित्रपट पाहिला तरच समाजातील अपप्रवृत्तींना आळा बसेल’ अशी दूरदर्शी भूमिका मांडून चित्रपट संमत करून घेतला. हा चित्रपट राज्य शासनाच्या पुरस्कारासाठी नामांकित झाला. कथानकाला आवश्यक असणारी मांडणी व चित्रपटासारख्या अवास्तव जगात वास्तवता निर्माण करण्याच्या ध्यास राजदत्त यांनी दिग्दर्शक या नात्याने बाळगला. ‘सर्जा’ या ऐतिहासिक धाटणीच्या चित्रपटातील दृश्य नायकाला सरळसोट कडा डमी न वापरता चढायला लावून त्यांनी चित्रित केलेला आहे. अजिंक्य देवसारख्या नवख्या अभिनेत्यानेही दिग्दर्शकाची केलेली अपेक्षापूर्ती निश्‍चितच वाखाणण्याजोगी आहे. या चित्रपटालाही राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार मिळाला.

राजदत्त यांनी दूरदर्शनवरील मालिकांचेही यशस्वी दिग्दर्शन केलेले आहे, त्यात ‘गोट्या’, ‘मर्मबंध’, ‘मन वढाय वढाय’, ‘एक कहाणी’ इत्यादी मालिकांची नावे घ्यावी लागतील. तसेच त्यांनी ‘राजगड’, ‘दुर्गाबाई भागवत’ व ‘डॉ. हेडगेवार’ यांच्या जीवनावर आधारित माहितीपट बनवले. अपंग कल्याणकारी संस्थेसाठी त्यांनी ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी या संस्थेला भेट दिल्याबद्दल आणि संस्थेचा उद्देश व्यक्त करण्यासाठी असे एकूण ३ माहितीपट तयार केले. चांदोबात कामाला असतानाच त्यांचा संस्कारभारतीशी संपर्क आला. या विचारधारेच्या प्रभावाने त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. कोणतेही काम करताना झोकून देऊन सातत्याने करायचे, या भावनेने त्यांनी संस्कारभारतीचे कामही अविरतपणे चालू ठेवले. नुसते कामच केले नाही, तर सलग १० वर्षे त्यांनी संस्कार भारतीचे अध्यक्षस्थानही यशस्वीपणे भूषवले.

राजदत्त यांचे ११ चित्रपट राज्य शासनाचे प्रथम पुरस्कारप्राप्त ठरले, तर ३ चित्रपट द्वितीय पुरस्कारप्राप्त ठरले. या व्यतिरिक्त त्यांना स्वरतीर्थ, गदिमा, जनकवी पी. सावळाराम, झी मराठी वाहिनी व झी चोवीस तास जीवनगौरव, रामडवरी आदी पुरस्कारही मिळाले आहेत. राजदत्त यांना पत्नी दया यांची साथ लाभली तर, मोठी मुलगी श्रद्धा दूरदर्शनवर काम करत असून लहान मुलगी भक्ती मालिकांची व चित्रपटांची संकलक म्हणून काम करत आहेत.

राहण्या-वागण्या-बोलण्यातील साधेपणा, समाजात घडणार्‍या व सामान्य माणूस म्हणून दुखवणार्‍या, तरी तारतम्य भावाने विचार करायला लावणार्‍या घटना सूक्ष्म निरीक्षणांद्वारे शोधणे, त्या घटनांना अभिव्यक्त करतील अशा कथानकांचा शोध घेणे, आपल्या दिग्दर्शीय दृष्टिकोनातून त्या लालित्यपूर्ण पण सामाजिक आशय संप्रेषित करणार्‍या बनवणे व त्या प्रेक्षकांसमोर ठेवणे अशी अनेक पातळीवरची कसरत राजदत्त यांनी आपल्या कारकिर्दीत सातत्याने व यशस्वीपणे केलेली आहे.

- डॉ. अर्चना कुडतरकर

राजदत्त ह्यांच्या कारकीर्दीवर 'सह्याद्री' वाहिनीने 'पाच दशके सृजनाची' ह्या महितीपटाची निर्मिती केली आहे.

- मंदार जोशी



चित्र-चरित्र