चित्र-चरित्र

सी. रामचंद्र
सी. रामचंद्र
संगीत दिग्दर्शक
१२ जानेवारी १९१८ --- ५ जानेवारी १९८२

चित्रपट निर्माते जयंत देसाई यांनी रामचंद्र ऊर्फ अण्णा चितळकरांना ‘सी रामचंद्र’ हे नाव दिले. सी. रामचंद्र हे नागपूरच्या शंकरराव सप्रे यांचा गुणी शिष्य व पं. विनायकबुवा पटवर्धनांचे विद्यार्थी होते. त्यांनी मास्टर कृष्णरावांच्या गायकीचा एकलव्यासारखा अभ्यास केला होता. .रामचंद्र चितळकरांना खरे तर नट व्हायचे होते. अभिनयाचे वेड घेऊन ते मुंबईत आले होते आणि नाईलाजाने सहकलाकार म्हणून स्थिरावले होते. तेही काम मिळेनासे झाल्यावर ते थेट चित्रपट निर्माते सोहराब मोदीना भेटले. पडेल ते काम करायची त्यांनी तयारी दाखवली, तेव्हा मोदींनी चितळकरांना मीरसाहेब नावाच्या त्याकाळच्या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाकडे पाठवले. मीरसाहेबांना स्वरलिपी येत नव्हती आणि गाताही येत नव्हते. त्यामुळे सुचलेली चाल लिहून ठेवता येत नव्हती आणि गायकांना गाऊनही दाखवता येत नव्हती. या दोन्ही गोष्टी चितळकरांना येत होत्या. त्यामुळे मीरसाहेब आपल्या नवीन साहाय्यकावर खुश झाले.

मीरसाहेबांकडे असताना चितळकरांची ओळख पाश्चात्त्य वाद्यांवर हिंदुस्थानी संगीत वाजवून दाखवणार्‍या ‘हूगन’ नावाच्या संगीत कलाकाराशी झाली. त्यांच्या संगतीने चितळकरांनी मुंबईच्या मोठमोठ्या हॉटेलांतून इंग्लिश वादकांचे वादन ऐकले. पश्चिमी संगीतातली उडती लय देशी गाण्यांना देता आली तर ती गाणी खूप लोकप्रिय होतील, ह्याचा अंदाज अण्णांना त्यावेळी आला. दिग्दर्शक मास्टर भगवान आबाजी पालव ऊर्फ भगवानदादा त्या काळात गल्लाभरू चित्रपट देणारे यशस्वी दिग्दर्शक समजले जात. भगवान अनेकदा मीरसाहेबांमुळे खोळंबत असत. असेच एकदा मद्रास ला एक काम अडकल्याने मीरसाहेब भगवानना म्हणाले, 'आपण राम चितळकरला-अण्णांना बोलावून घेऊ. अण्णा ती सगळी कामे पटकन करतील...' नंतर अण्णा मद्रासला गेले आणि पटापट स्वरलिपी-लिखाण करून त्यांनी अडकलेले काम पुढे नेले. भगवानदादांना चितळकर खूप आवडले आणि त्या दोघांची मैत्री झाली.

आझाद, अनारकली, अमर दीप, अलबेला (१९५१), आंचल (१९६०), इन्सानियत (१९५५), झमेला (१९५३), डाक बंगला (१९४७), नवरंग, शहनाई (१९४७) हे सी. रामचंद्र यांचे काही उल्लेखनीय हिंदी चित्रपट. ‘चूल आणि मूल’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘संत निवृत्ती ज्ञानदेव’, ‘धनंजय’, ‘धर्मपत्नी’, ‘घरकुल’ आदी मराठी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले होते.

सी. रामचंद्र याचे संगीत असलेली काही प्रसिद्ध गाणी (कंसात चित्रपटाचे नाव आणि गायक)
आधा है चंद्रमा (नवरंग; आशा भोसले, महेंद्र कपूर) (राग - मालकंस)
ईना मीना डिका (आशा-१९५७; किशोर कुमार)
उमर हुई तुमसे मिले (बहू रानी; हेमंत कुमार, लता मंगेशकर)
कितना हसीन है मौसम (आझाद; लता मंगेशकर, सी. रामचंद्र) (राग - दरबारी कानडा)
जाग दर्द-ए-इश्क जाग (अनारकली; हेमंत कुमार, लता मंगेशकर) (राग - बागेश्री)
जिंदगी प्यार की दो घडी होती हैं (अनारकली; हेमंत कुमार)
तू छुपी है कहाँ (नवरंग; आशा भोसले, मन्ना डे) (राग - मालकंस)
दिल की दुनिया बसा के साँवरियाँ (अमरदीप, लता मंगेशकर)
भोली सूरत दिल के खोटे (अलबेला-१९५१; लता मंगेशकर, सी. रामचंद्र)
मोहब्बत ऐसी धडकन है की (अनारकली; लता मंगेशकर)
ये माटी सभी की कहानी (नवरंग; महेंद्र कपूर)
शाम ढले खिडकी तले (अलबेला-१९५१; लता मंगेशकर, सी. रामचंद्र)
शोला जो भडके (अलबेला-१९५१; लता मंगेशकर, सी. रामचंद्र)

-मंदार जोशी



चित्र-चरित्र