चित्र-चरित्र

कौशल इनामदार
कौशल इनामदार
संगीतकार
२ ऑक्टोबर १९७१

कौशल श्रीकृष्ण इनामदार यांचा जन्म पुण्यात झाला. कौशल हे पाचगणीतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे विद्यार्थी. ते महाविद्यालयात असताना त्यांना चेतन दातार हे मित्र गुरुरूपात भेटले. त्यांच्यामुळे कौशल नाट्यक्षेत्रात आले. त्यांनी नाट्यलेखनाची व अभिनयाची बक्षिसे पटकावली. हिंदीच्या प्रभावामुळे कौशल गझलच्या प्रेमात पडले. गुलाम अली व जगजित सिंग यांच्या गझलांच्या चालीवर ते गीते लिहू लागले.

लहानपणी ते संगीतकार कमलाकर भागवत यांच्याकडे संगीत शिकले होते. त्यांना पुढे सत्यशील देशपांडे यांचा सहवास लाभला. त्यांच्यावर नाटक, संगीत या कलांचा परिणाम होत राहिला. या क्षेत्रात असतानाच त्यांच्यातला संगीतकार जन्माला आला. कौशल यांनी १९९३ साली रुपारेल महाविद्यालयात माजी विद्यार्थी म्हणून कुसुमाग्रजांची ‘जा जरा पूर्वेकडे’ ही कविता सादर केली. ती वेगळी व अर्थपूर्ण चाल ऐकून ज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांनी कौशल यांना संगीतक्षेत्रात जाण्याचा सल्ला दिला. आधीच्या पिढीतील कवींच्या उत्तम रचना नव्या पिढीला ज्ञात व्हाव्या, या हेतूने कौशल यांनी बोरकर, मर्ढेकर, अनिल अशा बर्‍याच कवींच्या कवितांना वेगवेगळ्या चाली लावून १९९५ साली ‘अमृताचा वसा’ हा कार्यक्रम केला. त्याचे शंभर प्रयोग झाले व ते लोकप्रियही झाले. या कार्यक्रमामुळे ‘संगीतकार’ म्हणून कौशल यांना स्वत:ची नवी ओळख निर्माण करता आली. ‘आपल्याला संगीत जमते’, इतकेच नव्हे तर ते करण्यात आनंद मिळतो, हे ध्यानात आल्यानंतर कौशल इनामदार यांनी ‘शुभ्रकळ्या मूठभर’ हा कार्यक्रम केला. अनेक ‘साहित्यिक मूल्ये’ असणार्‍या कार्यक्रमांबरोबरच त्यांनी ‘मिस इंडिया’सारख्या कार्यक्रमाला दिलेले संगीतही यशस्वी ठरले. या विविधतेमुळे ‘प्रयोगशील संगीतकार’ म्हणून ते नावारूपाला आले. दूरदर्शनच्या ‘दौलत’, ‘झेप’, ‘भटकंती’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तितलिया’ अशा जवळजवळ वीस मालिकांना, तसेच काही लघुपटांनाही त्यांनी संगीत दिले. संगीतकाराप्रमाणेच ते उत्तम गायकही आहेत. संगीताची सर्व माध्यमे हाताळल्यामुळे ‘विचारवंत संगीतकार’ असा कौशल इनामदार यांचा लौकिक झाला आहे.

ठाणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कौशल इनामदार यांनी कविवर्य सुरेश भट यांचे ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे मायमराठीचे स्तवनगीत चाल लावून समूहाकडून गाऊन घेऊन सादर केले. ते इतके गाजले की अभिनेता अमिताभ बच्चन यांनीही कौशल इनामदार यांचे कौतुक केले. ‘कृष्णाकाठची मीरा’ (२००२) हा त्यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट. त्यांनी सुमारे १० चित्रपटांना संगीत दिले. त्यांच्या ‘बालगंधर्व’ या चित्रपटाच्या संगीताने नव्या पिढीला ‘गंधर्वयुगात’ नेण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. ‘अजिंठा’ हा त्यांचा आणखी एक उल्लेखनीय चित्रपट.

- मधू पोतदार



चित्र-चरित्र