चित्र-चरित्र

सतीश राजवाडे
सतीश राजवाडे
दिग्दर्शक, अभिनेता
९ जानेवारी १९७३

टीव्ही मालिका आणि दिग्दर्शक या दोन्ही माध्यमामधील एक यशस्वी, चतुरस्त्र दिग्दर्शक अशी सतीश राजवाडे यांची ओळख आहे. सतीश राजवाडे यांना लहानपणी अभिनयाची फारशी आवड नव्हती. किंबहुना खोड्या करण्यातच त्यांचा अधिक वेळ जायचा. म्हणून त्यांच्या आईने त्यांना एका अभिनयाच्या कार्यशाळेत दाखल केले. तिथून त्यांना या क्षेत्राची आवड लागली. या क्षेत्रामध्ये करियर करण्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयात प्रवेश घेतला. इथले कलाक्षेत्र त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवले. येथील कामगिरीवरच त्यांना ‘ऑल दि बेस्ट’ हे नाटक मिळालं. या नाटकाने इतिहास घडवला. पुढे त्यांनी काही काळ प्रख्यात दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केले. या काळात त्यांनी ‘संशोधन’, ‘हजार चौरासी की मॉं’, ‘निदान’, ‘वास्तव’ आदी चित्रपटांमधून काम केलं. सतीशना वास्तविक व्हायचं होतं कॅमेरामन. परंतु, कालांतरानं त्यांना संकलनाची आवड लागली. या आवडीपायी त्यांनी काही काळ ‘बी.आर. चोप्रा स्टुडिओज’मध्ये संकलनाचं फुकट काम केलं. याच काळात त्यांनी ‘ना जाने क्यूं’ हा म्युझिक अल्बम केला. तो यशस्वी ठरल्यामुळेच त्यांना ‘मृगजळ’ हा चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाच्या वाट्याला मोठं कौतुक आलं. मात्र यानंतर राजवाडे यांनी टीव्ही माध्यमासाठी अधिक काम केलं. ‘असंभव’, ‘अग्निहोत्र’, ‘रुद्रम’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘बदाम राणी गुलाम चोर’, ‘दुनियादारी’, ‘किनारा’, ‘रेशीमगाठी’ आदी मालिका केल्या. ‘ती सध्या काय करते’, ‘पोपट’, ‘गैर’, ‘आपला माणूस’, ‘मुंबई पुणे मुंबई’ (३ भाग) हे राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेले काही उत्तम चित्रपट. ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकातही त्यांनी अभिनय केला.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र