‘थिएटर अॅकॅडमी’ सारख्या संस्थेची नाटकं आणि काही चित्रपट-टीव्ही मालिकांत छोट्या भूमिकांत दिसणारे परेश मोकाशी ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ या नाटकामुळे खऱ्या अर्थाने प्रकाशात आले ते लेखक- दिग्दर्शक म्हणून. परेश मोकाशी यांचे गाव रायगडमधलं चौक. पणजोबा पोस्टमास्टर होते. जन्म पुण्याचा असला तरी सगळं शिक्षण लोणावळ्याच्या पुरंदरे हायस्कूलमध्ये झालं. परेश मोकाशी यांचे वडील पत्रकार होते. पुण्यात ‘केसरी’, ‘ब्लिट्झ’ वगैरेमध्ये ते काम करायचे. मोकाशी यांनी सातवीत असताना पहिलं नाटक केलं आणि तेही हिंदी, ‘नही नही कभी नही’. पुढील शिक्षण मॉडर्न कॉलेजमध्ये पुण्यात. कॉलेजमध्ये असतानाचा ‘थिएटर अॅकॅडमी’ मध्ये जाण्यास मोकाशी यांनी सुरुवात केली. त्याचा मोकाशी यांना खूप उपयोग झालाय. २००१ मधील ‘मुक्काम पोस्ट बोबिंलवाडी’ या नाटकानंतर ‘लग्नकल्लोळ’, ‘मेकअप’, ‘मंगळावरचे मुंडके’, ‘समुद्र’ अशी व्यावसायिक-प्रायोगिक नाटकं करता करता मोकाशींनी थेट ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ रुपेरी पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य उचललं. या पहिल्याच चित्रपटाने त्यांना ऑस्करच्या दारापर्यंत नेलं.
साधी-सोपी तरीही वैचित्र्यपूर्ण हाताळणी ही शैली बनलेल्या परेश यांचा ‘एलिझाबेथ एकादशी’ आणि ‘चि. व चि. सौ. कां.’ हे चित्रपटही विशेष उल्लेखनीय ठरले. मोकाशी यांनी २०२३ मध्ये दिग्दर्शित केलेल्या 'वाळवी' या चित्रपटाचे खूप कौतुक झाले.
- मंदार जोशी