राजाराम दत्तात्रेय ठाकूर यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. नवयुग ङ्गिल्म कंपनीत र.शं. जुन्नरकर यांच्या हाताखाली संकलक म्हणून राजा ठाकूर काम पाहू लागले. जुन्नरकर नवयुग सोडून गेल्यावर राजा ठाकूर यांनी नवयुगच्या ‘क्या तराना’, ‘पन्ना’, ‘शिकायत’ या तीन चित्रपटांचे स्वतंत्रपणे संकलन केले. त्यानंतर ठाकूर यांनी राजा परांजपे यांंना ‘बलिदान’ (१९४८) या चित्रपटासाठी दिग्दर्शन साहाय्य केले व संकलनही केले. पुढे राजा परांजपे यांच्या गाजलेल्या ‘जिवाचा सखा’, ‘लाखाची गोष्ट’, ‘पेडगावचे शहाणे’ या चित्रपटांचे संकलनही राजा ठाकूर यांनीच केले. राजा परांजपे व ग.दि. माडगूळकर यांनी पुण्यात ‘नवचित्र’ ही चित्रपट संस्था स्थापन केली. ‘बोलविता धनी’ (१९५२) हा त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. त्यानंतर त्यांनी ‘रेशमाच्या गाठी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला.
राजा ठाकूर यांनी १९५४ च्या सुमारास स्वत:ची चित्रपटसंस्था स्थापन केली. त्यांनी १९५५ मध्ये ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ या चित्रपटाची निर्मिती केली. प्रेक्षक व समीक्षक, दोघांच्याही पसंतीला उतरलेल्या या चित्रपटासाठी राजा ठाकूर यांना राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटासाठीचा ‘रजतकमल’ हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतरच्या ‘उतावळा नारद’ मध्ये ठाकूर यांनी हिंदीतील प्रख्यात विनोदी नट भगवान याला मराठीत प्रथमच संधी दिली. चिमणराव व गुंड्याभाऊ या चि.वि. जोशींच्या मानसपुत्रांवर आधारित विनोदी चित्रपट ‘घरचं झालं थोडं’ (१९५७) याची निर्मिती केली. यात दामूअण्णा मालवणकर व विष्णुपंत जोग यांच्या भूमिका होत्या. त्यांचा ‘रंगल्या रात्री अशा’ हा चित्रपट १९६२ मध्ये प्रदर्शित झाला. अत्यंत यशस्वी ठरलेल्या या चित्रपटातून जगदीश खेबुडकर यांचे गीतकार म्हणून चित्रपटसृष्टीत आगमन झाले. या चित्रपटालाही ‘रजतकमल’ या पुरस्काराने गौरवले. ‘गजगौरी’ हा प्रभात ङ्गिल्मचा शेवटचा चित्रपट राजाभाऊंनी दिग्दर्शित केला होता. यानंतर त्यांनी ‘राजमान्य राजश्री’, ‘पुत्र व्हावा ऐसा’, ‘पाहू रे किती वाट’, ‘एकटी’, ‘मुंबईचा जावई’ यासारखे मराठी चित्रपट रसिकांना दिले. त्यातील १९६८ मध्ये आलेल्या ‘एकटी’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावर ‘रजतकमल’ देऊन सन्मानित करण्यात आले.
ठाकूर यांनी हिंदीतील सुप्रसिद्ध संगीतकार सी.रामचंद्र यांना ‘धनंजय’ या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत संधी दिली. त्यांनतर त्यांनी ‘बिरबल माय ब्रदर’ या इंग्रजी चित्रपटाची निर्मिती केली. तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करून १९७५ मध्ये ‘जख्मी’ या यशस्वी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा चित्रपट मुंबईत ४० आठवडे एकाच चित्रपटगृहात चालला. यानंतर ‘रईसजादा’ या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यानच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.
- द. भा. सामंत