चित्र-चरित्र

कमलाकर तोरणे
कमलाकर तोरणे
निर्माते, दिग्दर्शक
१२ नोव्हेंबर १९२५ --- ९ एप्रिल १९९०

कमलाकर विष्णू तोरणे यांचा जन्म बेळगाव येथे झाला. पण त्यांचे मूळ घराणे कोकणातील वेंगुर्ला येथील. लहानपणी डॉक्टर व्हायचे ठरवलेले असल्यामुळे त्यांनी बी.एस्सी.ची पदवी मिळवली. परंतु चित्रपट व कला यांवर प्रेम असल्यामुळे त्यांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. भालजी पेंढारकर हे त्यांचे गुरू. ‘महारथी कर्ण’ या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता. ‘हिरवा चुडा’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट.

१९६६ मध्ये कमलाकर तोरणे यांनी पद्मा चव्हाण या अभिनेत्रीसोबत विवाह केला. १९७५ मध्ये त्यांनी ‘प्रेम चित्र’ नावाची स्वत:ची संस्था स्थापन केली. चित्रपट निर्माता व दिग्दर्शक म्हणून त्यांनी ‘आम्ही जातो आमच्या गावा’ हा पहिला चित्रपट काढला. या संस्थेमार्ङ्गत त्यांनी रवींद्र महाजनी, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, रुही बेर्डे यांसारख्या कलाकारांना चित्रपटात काम करण्याची संधी दिली.

‘थोरली जाऊ’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘भैरू पैलवान की जय’, ‘आई पाहिजे’, ‘आम्ही दोघे राजा राणी’, ‘आराम हराम आहे’, ‘लाखात अशी देखणी’ हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले.कौटुंबिक कथानक, भावस्पर्शी प्रसंगी, उत्तम संगीत आणि कलाकारांकडून दर्जेदार अभिनय काढून घेणारे दिग्दर्शक अशी त्यांची ओळख होती.

तोरणे यांच्या ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ (१९६८), ‘थोरली जाऊ’ (१९८२) या चित्रपटांना उत्कृष्ट चित्रपटांचे पुरस्कार लाभले. तसेच ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ आणि ‘भैरू पैलवान की जय’ या चित्रपटांसाठी १९७६ आणि १९७७ अशी लागोपाठ दोन वर्षे महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. दूरदर्शनची पहिली मालिका ‘नस्ती आङ्गत’ ही कमलाकर तोरणे यांनी काढलेली होती. हिंदीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत असताना अचानक मेंदूत रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला.

- जयश्री बोकील



चित्र-चरित्र