चित्र-चरित्र

दत्ता गोर्ले
दत्ता गोर्ले
छायाचित्रकार, दिग्दर्शक
१५ ऑक्टोबर १९९७

दत्ता गणपत गोर्ले पुण्यात सोमवार पेठेतील सुप्रसिद्ध नागेश्वर मंदिराजवळ राहत. इंग्रजी चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते. तेथील रंगकामाचे व पॉलिशकामाचे ते तरबेज कारागीर होते. लहानपणी दत्ता नागेश्वर मंडळातर्फे हुतुतू खेळत. लहान वयातच त्यांना छायाचित्रणाबद्दल ओढ आणि आकर्षण निर्माण झाले. त्यासाठी धडपड करीत ते शंकरशेठ रोडवरच्या ‘नवयुग स्टुडिओ’त जात. पण दोन वेळा त्यांना दारातूनच धक्के खाऊन परत यावे लागले.

स्टुडिओत शिरकाव करायला मिळत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांना वाटले की थिएटरवर काम करावे, तिथे कुणी ना कुणी सिनेमावाले भेटतील, मग त्यांच्या ओळखीने स्टुडिओत शिरता येईल; म्हणून त्यांनी अपोलो थिएटरमध्ये १९३८ ते १९४४ अशी सहा वर्षे डोअरकीपरची नोकरी केली. तिथे स्टोअर रूममधून फिल्म चालवायलाही ते शिकले.

एकदा अपोलो थिएटरमध्येच दत्ता गोर्ले यांची ‘माणिकराव स्टुडियो’चे बाळासाहेब पाठक यांच्याशी ओळख झाली. दत्ता गोर्ले यांनी सांगितले, ‘‘मला फोटोग्राफी शिकायची आहे. तुम्ही मला नवयुग स्टुडिओत प्रवेश मिळवून द्या!’’ त्यांच्या ओळखीने दत्ता गोर्ले ‘नवयुग’ स्टुडिओत थेट कॅमेरा डिपार्टमेंटच्या बाळासाहेब ढवळे यांच्या हाताखाली काम करू लागले. सुरुवातीला ते बिनपगारी कामगार होते. त्यांची मेहनत आणि शिकण्याची हौस लक्षात घेऊन तिथलेच दुसरे एक कॅमेरामन बाळ बापट यांनी ‘गरिबांचे राज्य’ या चित्रपटाच्या वेळी त्यांना आपल्याकडे बोलवून घेतले. त्या वेळी त्यांना तीस रुपये पगार होता. त्या वेळी त्यांना कॅमेरा हाताळायला मिळाला व प्रत्यक्ष चित्रीकरण शिकायला मिळाले. बापट यांना गुरुस्थानी मानून त्यांच्याकडून छायाचित्रणाचे धडे गिरवले. दुय्यम साहाय्यक पदावरून लवकरच त्यांनी बाळ बापटांचा प्रमुख साहाय्यक होण्यापर्यंत मजल मारली.

लवकरच ‘नवयुग स्टुडिओ’ बंद पडला, पण त्या जागी ‘सिंको स्टुडिओ’ सुरू झाला आणि या स्टुडिओतर्फे सुरू होणार्‍या पहिल्याच चित्रपटाच्या छायाचित्रणासाठी दत्ता गोर्ले यांचे नाव पुढे आले. चित्रपटाचे नाव होते - ‘गंगेत घोडं न्हालं’ (१९५३).

दत्ता गोर्ले खूश झाले. पण राजा परांजपे यांना त्यांचे नाव मान्य नव्हते. दत्तांनी त्यांना ‘माझं काम बघा आणि मग काय ते ठरवा’ असे आत्मविश्वासपूर्वक सांगितले.

राजा परांजपे हसले व ‘ठीक आहे’ म्हणून चित्रीकरणाला सुरुवात झाली. पहिल्याच चित्रीकरणाची ‘निगेटिव्ह’ पाहून राजा गोसावींनी त्यांना जवळ बोलावून त्यांचे कौतुक केले. राजाभाऊंच्या त्यानंतरच्या अनेक चित्रपटाचे छायाचित्रकार दत्ता गोर्लेच होते. १९५५ ते १९९५ या चाळीस वर्षात दत्ता गोर्ले यांनी ४७ चित्रपटांचे (त्यात दोन हिंदी) छायाचित्रण केले. त्यांनी राजा परांजपे यांच्याशिवाय राजा ठाकूर, दत्ता धर्माधिकारी, राजा नेने, अनंत माने, दिनकर द. पाटील, राजदत्त, मुरलीधर कापडी अशा अनेक यशस्वी दिग्दर्शकांबरोबर काम केले.

काही लघुपट व अनुबोधपटही त्यांनी चित्रित केले. त्यात ‘एसटी’, ‘शेगावचे गजानन महाराज’, ‘अवतार मेहेरबाबा’ असे अनेक अनुबोधपट होते. ‘सून माझी लक्ष्मी’ (१९८१) व ‘जुगलबंदी’ (१९८४) या दोन मराठी चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. त्यांच्या चार चित्रपटांना छायाचित्रणाचे पारितोषिक मिळाले.
- मधू पोतदार



चित्र-चरित्र