चित्र-चरित्र

गणेश आचार्य
गणेश आचार्य
नृत्यदिग्दर्शक
१४ जून १९७१

सिनेमाच्या पार्टीजमध्ये कधीमधी दिसणारा, एक ऐसपैस शरिरयष्टीचा, रंगीबेरंगी डिझाईनर कपडे घालणारा आणि सतत हसत राहणारा गणेश आचार्य अनेकांनी पाहिला असेल; आणि त्याच्या वेगळेपणामुळे तो आपोआप लक्षातही राहिला असेल. नृत्यदिग्दर्शकाकडे असावी अशी शास्त्रीय नृत्याची साधना त्याच्याकडे नाही. फारसा सुंदर चेहराही नाही, आणि खूप अमोघ अशी भाषाही नाही. तरीदेखील गणेशने नाचवला नाही असा एकही प्रतिथयश कलाकार आज हिंदी चित्रपटसृष्टीत सापडणार नाही. काल परवा आलेल्या रणवीर सिंग-अनुष्का शर्मापासून ते थेट अमिताभ-हेमामालिनीपर्यंत सगळे दिग्गज गणेशच्या तालावर नाचले आहेत आणि नाचत आहेत. गणेश आचार्यने बसवलेल्या सुपरहिट नृत्यांची केवळ वानगीदाखल म्हणून काही उदाहरणं द्यायची झाल्यास गोविंदा-डेव्हिड धवन जोडीच्या भाराभार चित्रपटांबरोबर 'चायनागेट'च्या 'छम्मा छम्मा' पासून ते ‘ओमकारा’च्या 'बिडी जलैले' पर्यंत लांबच लांब यादी तयार होईल. 'चिकनी चमेली' आणि 'बॉडीगार्ड' चे शीर्षकगीतही गणेश आचार्याची आहेत. १९९२ मध्ये गणेश आचार्य यांनी चित्रपटक्षेत्रातील नृत्य दिग्दर्शनाचा सुरवात करून आजवर सव्वाशे चित्रपटांना नृत्य दिग्दर्शन केले आहे. खूप तांत्रिक बाबींमध्ये न फसता गाण्याचा आणि चित्रपटाचा विषय अभ्यासून आणि त्यातली भावना समजून घेऊन सेटवर तेव्हाच्या तेव्हाच स्फुरलेल्या स्टेप्स देत गाणं बसवायचं, हे त्याचं सोपं सूत्र! गणेशाच्या आयुष्याचा नाच मात्र असा सोपा नक्कीच नव्हता. मुंबईच्या चाळीमध्ये राहून गणपती उत्सवातल्या स्पर्धांमध्ये नृत्यसाधना करणारा दक्षीण भारतीय वडील आणि महाराष्ट्रीयन आई, एक मोठी बहीण आणि लहान भाऊ असलेला हा मुलगा. वडील गोपीकृष्ण हेदेखील डान्सरच होते. मुंबईत ओळख बनवण्यात, आपल्या मुलांना काहीही कमी पडू नये यासाठी खस्ता खाण्यातच त्यांचं जीवन गेलं. गणेश आठ वर्षांचा असेल तेव्हाच पितृछत्र हरवलं. मात्र वडिलांनी दिलेला नृत्याचा वसा बरोबर होता. मोठ्या बहिणीकडून घरच्या घरी नृत्याचे धडे घेतले. वयाच्या १३व्या वर्षी चार मित्रांना घेऊन एक डान्स ग्रुप तयार केला आणि व्यायसायिक नृत्यक्षेत्रातील वाटचाल सुरू झाली. वडिलांची ओळख आणि स्वतःची उत्सुकता यांच्या बळावर प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक कमाल यांच्याकडे शिकण्याची संधी मिळाली. कमाल हे नाव १९८०च्या दशकात जवळपास प्रत्येकच व्यावसायिक चित्रपटाच्या श्रेयनामावलीत असायचंच. मसाला चित्रपटाचे हे दिवस होते. सामान्यातला सामान्य दर्शक काय पसंत करतो याची जाण गणेशला याच दरम्यान आली. शास्त्रीय नृत्याच्या जुजबी शिक्षणाबरोबरच पाश्चात्य नृत्याचंही प्रशिक्षण त्यानं याच दरम्यान मिळवलं. मात्र या सगळ्यांची भेळ करून बनवलेली एक खास बॉलीवुड डान्सची शैली असते, आणि तीच आपले लोक पसंत करतात हेदेखील त्याला उमगलं. या काळात कमाल यांच्या सहायकांपैकी सर्वात जास्त लक्षवेधी जर कुणी असेल तर तो म्हणजे गणेशच! कारण त्याचं अवाढव्य शरीर आणि तरीही त्याच्याकडे असलेला कमालीचा लवचिकपणा! गोविंदाने नेमकं हेच हेरलं. त्याने स्वतः गणेशला बोलावून घेतलं. ओळख निघाली. मग मैत्री झाली. नव्या संधीनी दारे उघडली. कोरिओग्राफर म्हणून त्याचा पहिला चित्रपट आला तो १९९२ मध्ये - आयेशा झुल्काचा 'अनाम'. पण तो फारसा चालला नाही. मग कमालजींच्या देहावसानापर्यंत मात्र गणेशने स्वतःच्या नावाने काम घेतलं नाही. गुरूजींच्या मृत्यूनंतर साईन केलेला गोविंदाचा 'कुली नंबर वन' म्हणजे गणेशच्या धडाकेबाज कारकिर्दीचा श्रीगणेशा म्हणता येईल. आजवर एकमेकांकडे पाहून नाचणा-या हिरो-हिरोईन्सला गणेशने कॅमे-याकडे पाहून नाचायला लावलं. हा नवा प्रयोग होता. गोविंदा आणि करिश्मा कपूर या जोडीच्या मदतीने हा सुपरहिट ठरला. मग त्याने मागे वळून पाहिलंच नाही. अगदी मेजरसाब मध्ये अमिताभ बच्चन यांना 'सोणा सोणा' शिकवण्यापासून ते 'बादशहा' मध्ये शाहरूखकडून 'बादशाह ओ बादशाह' नाचवून घेण्यापर्यंत त्याने प्रत्येक हिरो आणि हिरोईनला नाच शिकवला. नृत्यदिग्दर्शक म्हणून आपला जम बसवल्यावर गणेशने चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल टाकलं. त्याला पहिला चित्रपट आला तो 'स्वामी तिन्ही जगाचा भिकारी' हा मराठी चित्रपट. 'ए फिल्म कोरिओग्राफ बाय गणेश आचार्य' असे पंचलाईनमध्ये लिहून त्याने आपली नृत्यदिग्दर्शक हीच ओळख आपल्याला जपायची आहे हे दाखवून दिलं. आपल्या आवडत्या सहका-याबरोबर - गोविंदाबरोबर त्याने 'मनी है तो हनी है' हा तद्दन मसाला चित्रपटही काढून पाहिला, पण यात काही यश आले नाही.

(- संजीव वेलणकर, पुणे)

'सुपर ३०', 'लुका छुपी', 'कृतांत', 'सिंबा', 'पटाखा', 'संजू', 'बत्ती गुल मीटर चालू', 'पद्मावत', 'बागी २' हे गणेश आचार्य यांचे अलीकडचे काही महत्त्वाचे चित्रपट.

- मंदार जोशीचित्र-चरित्र