चित्र-चरित्र

संदीप खरे
संदीप खरे
कवी, गीतकार
१३ मे १९७३

युवा पिढीतील लोकप्रिय गीतकार-कवी म्हणून संदीप खरे सर्वपरिचित आहेत. आपल्या रचनांवर तरुण पिढीला हजारोंच्या संख्येने झुलवण्याचे सामर्थ्य संदीप यांच्या गीतांना व कवितांना लाभले आहे. सोपी पण अर्थवाही, तसेच आजच्या पिढीच्या थेट परिचयाची भाषा आणि अभिव्यक्ती हे संदीप खरे यांच्या गीतांचे वैशिष्ट्य आहे.

संदीप खरे यांचा जन्म पुण्यात झाला. अभियांत्रिकी पदविकाधारक असलेल्या संदीप खरे यांनी महाविद्यालयीन दिवसांपासूनच आपल्या वेगळ्या कवितांनी लक्ष वेधून घेतले. मुद्रण हक्क म्हणून काम केल्यावर ‘चकवा’ या चित्रपटातून संदीप यांनी चित्रपट क्षेत्रात गीतकार म्हणून पदार्पण केले. ‘आनंदीआनंद’, ‘निशाणी डावा अंगठा’, ‘हाय काय नाय काय’, ‘जमीन’, ‘हापूस’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘कालचक्र’, ‘जावईबापू झिंदाबाद’, ‘जनगणमन’, ‘मोरया’, ‘बदाम राणी गुलाम चोर’ असे २५ चित्रपट संदीप खरे यांच्या गीतांनी सजले आहेत. संगीतकार सलील कुलकर्णी यांच्यासोबत त्याची जोडी सर्वाधिक यशस्वी ठरली आहे.

तसेच त्यांनी ‘ताक धिना धिन’, ‘वहिनीसाहेब’, ‘बिनधास्त’, ‘अशी ही माहेरची साडी’, ‘झेप’, ‘जिवलगा’ या मालिकांसाठी गीतलेखन केले आहे. कवी म्हणून संदीप खरे यांचे ‘कॅलिडोस्कोप’, ‘कधीतरी वेड्यागत’, ‘आयुष्यावर बोलू काही’, ‘अग्गोबाई ढग्गोबाई’, ‘कधी हे कधी ते’, ‘नामंजूर’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’, ‘सांग सख्या रे’, ‘संधिप्रकाश’, ‘हृदयामधले गाणे’ आदी अल्बम तसेच रंगमंचीय कार्यक्रमही लोकप्रिय आहेत. त्यांचे ‘मौनाची भाषांतरे’, ‘नेणिवेची अक्षरे’ आणि ‘तुझ्यावरच्या कविता’ हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. झी टी.व्ही. गौरव पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत. ‘बायोस्कोप’ या चित्रपटामधील ‘मित्रा’ कथेत एक महत्त्वाची भूमिका साकारीत संदीप खरे यांनी अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले. ‘दमलेल्या बाबांची कहाणी’ हा त्यांचा २०१६ मध्ये अभिनेता म्हणून आलेला दुसरा चित्रपट.

संदीप खरे यांनी 'हिरकणी' (२०१९) चित्रपटासाठी गीतलेखनही केलेलं आहे.

- जयश्री बोकील
(मजकूर लेखन सौजन्य : विवेक मासिक, आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण, शिल्पकार चरित्रकोश)

संदीप खरे यांनी २०२२ मधील 'अथांग' या वेब सिरीजमध्ये अभिनय केला होता. तसेच 'एकदा काय झालं' या चित्रपटासाठी गाणी लिहिली होती.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र