चित्र-चरित्र

महेश कोठारे
महेश कोठारे
निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता
२८ सप्टेंबर १९५७

बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेल्या व्यक्तीने पुढच्या आयुष्यात निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून यशस्वी कारकिर्द घडविल्याचा अनुभव विरळाच. महेश अंबर कोठारे यांनी मात्र आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ही कामगिरी करून दाखविली.

महेश कोठारे यांचे वडील अंबर आणि आई सरोज कोठारे हे नाट्य अभिनेते. प्रसिद्ध अभिनेते गजानन जागीरदार यांच्याशी त्यांची ओळख होती. एका भेटीदरम्यान जागीरदार यांनी छोट्या महेशना पाहिले. त्या वेळी ‘छोटा जवान’ या चित्रपटासाठी एक चुणचुणीत मुलगा हवा होता. चुणचुणीत आणि गोरेपान महेश त्यांना आवडले आणि त्यांनी चित्रपटासाठी महेश यांचे नाव सुचवले. महेश यांनी हे काम झोकात केले. त्या वेळी राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये बालकलाकारांसाठी वेगळा पुरस्कार नव्हता. तरीही महेश यांचे काम बघून त्यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर महेश यांना अनेक हिंदी चित्रपटांत भूमिका मिळाल्या. ‘मेरे लाल’साठी आंध्र सरकारचा पुरस्कार, ‘घर घर की कहानी’साठी राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन, असे मानसन्मानही त्यांना मिळाले. ‘राजा और रंक’ आणि ‘मेरे लाल’ या चित्रपटांत तर त्यांच्यासाठी खास भूमिका लिहिल्या गेल्या. त्याशिवाय रौप्यमहोत्सवी ‘छोटा भाई’, ‘सफर’ आदी चित्रपटही झाले. ‘संत निवृत्ती ज्ञानदेव’ या चित्रपटात त्यांनी ज्ञानेश्‍वराची भूमिका केली, चित्रपटात काम करतानाही शिक्षणाकडे दुर्लक्ष करायचे नाही, असा आईवडिलांचा दंडक होता. त्यामुळे महेश कोठारेंनी शिक्षण पूर्ण केले. नंतर कायद्याची पदवीही घेतली. तीन वर्षे यशस्वी वकिलीसुद्धा केली. दरम्यानच्या काळात ‘प्रीत तुझी माझी’ या चित्रपटांतून त्यांनी नायक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. प्रभाकर पेंढारकर (दिनेश) हे त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. त्यानंतर ‘चांदणे शिंपीत जा’, ‘गुपचूप गुपचूप’, ‘थोरली जाऊ’, ‘लेक चालली सासरला’ अशा चित्रपटांतही त्यांनी नायकाच्या भूमिका साकारल्या. ७-८ गुजराथी चित्रपटही त्यांनी केले.

स्वत: चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करण्याची इच्छा त्यांच्या मनात आधीपासूनच होती. अखेर १९८५ साली ‘धूमधडाका’मधून त्यांनी हे धाडस केले. त्या वेळी त्यांच्या आईवडिलांनीही पाठिंबा दिला होता. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने साडेसहा लाखांचे कर्ज दिल्यानंतर कोठारे यांना हुरूप आला. ‘प्यार किये जा’ या चित्रपटावरून प्रेरणा घेऊन त्याचे उत्तम मराठीकरण करण्यात महेश कोठारे आणि लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांना यश आले. त्याशिवाय कॅमेरामन सूर्यकांत लवंदे, संकलक एन.एस. वैद्य यांनीही माफक मानधन घेऊन काम करण्याची तयारी दाखवली होती. शरद तळवलकर, अशोक सराफ हे तेव्हा नावाजलेले कलाकार होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एका नाटकातील अभिनय बघून कोठारेंनी त्यांना एक रुपया लाक्षणिक रक्कम (टोकन) देऊन नव्या चित्रपटासाठी करारबद्ध करून टाकले होते. ‘धूमधडाका’मधून त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना पडद्यावर आणले आणि बेर्डे मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनले. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर त्याची दुसरी प्रत काढण्यासाठीही कोठारेंकडे पैसे नव्हते, पण ‘ऍडलॅब्ज’ या स्टुडिओचे मालक मनमोहन शेट्टी यांनी त्यांना आगाऊ पैसे न घेता प्रिंट उपलब्ध करून दिली. पुण्यात ‘विजय टॉकिज’ला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तुफान गाजला. त्यानंतर महेश कोठारेंनी ‘दे दणादण’, ‘थरथराट’, ‘धडाकेबाज’, ‘झपाटलेला’ अशा लोकप्रिय चित्रपटांचा धडाकाच लावला.

प्रत्येक चित्रपटात वेगळे प्रयोग करणे आणि नवनवीन तंत्रज्ञान आणणे, हेसुद्धा कोठारेंचे वैशिष्ट्य होते. त्यांनी ‘धडाकेबाज’मधून फँटसी मराठीत आणली, तसेच पहिला सिनेमास्कोप आणि फोर ट्रॅक साऊंडचा प्रयोग केला. ‘झपाटलेला’ हा हिंदी, गुजराथी भाषेत डब झालेला पहिला मराठी चित्रपट. त्यात त्यांनी बोलक्या बाहुल्यांच्या कलेला पडद्यावर स्थान मिळवून दिले. ‘चिमणी पाखरं’मधून डॉल्बी डिजिटल साऊंडचा प्रयोगही त्यांनी यशस्वीपणे केला, तर ‘पछाडलेला’मध्ये कॉंम्प्युटर ग्राफिक्स वापरून प्रेक्षकांचा थरकाप उडवला. ‘मासूम’ आणि ‘लो मैं आ गया’ असे दोन हिंदी चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केले. पाच अक्षरी शीर्षक, मनोरंजनाचा यशस्वी फॉर्म्युला, विचित्र नावांचे आणि लकबींचे खलनायक, ही कोठारेंच्या चित्रपटांची वैशिष्ट्ये. त्यांच्याच गाजलेल्या ‘झपाटलेला’मधील ‘तात्या विंचू’ या खलनायकावर बेतलेल्या ‘झपाटलेला २’ या मराठीतील पहिल्या ३ डी चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. हा चित्रपट विलक्षण लोकप्रिय ठरला. टीव्ही मालिका निर्मितीमध्येही त्यांनी चांगले यश मिळवले. ‘जय मल्हार’, ‘विठू माऊली’ ही कोठारे यांची निर्मिती असलेली मालिका अत्यंत लोकप्रिय ठरली.

अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती या क्षेत्रांमध्ये केवळ प्रवेश न करता, या माध्यमांच्या मुळाशी जाऊन, त्याचा अभ्यास करून त्यात प्रयोगशीलता आणण्याचे कौशल्य महेश कोठारे यांच्याकडे आहे, हे त्यांचे चित्रपट पाहताना सहज लक्षात येते. म्हणूनच त्यांचे मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेले हे योगदान महत्त्वपूर्ण ठरते.

- अभिजित पेंढारकर

महेश कोठारे हे अलीकडच्या काळात टीव्ही मालिकांच्या निर्मिती केली. 'जय मल्हार', 'सुख म्हंजे नक्की काय असतं', 'पाहिले न मी तुला' या त्यांनी निर्मिलेल्या काही मालिका.

श्री. कोठारे यांनी २०२२ मध्ये निर्मिलेल्या 'माझी माणसं' आणि 'पिंकीचा विजय असो' या दोन मालिकांनी चांगले यश मिळवले.

- मंदार जोशीचित्र-चरित्र