श्रीधर सुधीर फडके यांचा जन्म विख्यात गायक व संगीत दिग्दर्शक सुधीर फडके आणि विख्यात पार्श्वगायिका ललिता फडके यांच्या पोटी झाला. त्यामुळे श्रीधर फडके यांना घरातून संगीताचा वारसा मिळाला आणि त्यांच्यावर बालपणापासून संगीताचे उत्तम संस्कार झाले.
मुंबईतील बालमोहन विद्यामंदिरात त्यांचे शालेय शिक्षण झाले व रुपारेल महाविद्यालयातून एम.एस्सी. पदवी घेऊन पॉलिटेक्निक इन्सिट्यूट ऑफ न्यूयॉर्क येथून त्यांनी एम.एस. कॉम्प्यूटर पूर्ण केले आणि त्यात चांगले करिअरसुद्धा केले.
शिकत असताना त्यांनी भावगीतांची ध्वनिफीत काढली होती.संगीत क्षेत्रातील श्रीधर फडके यांची पहिली लक्षणीय कामगिरी म्हणजे त्यांनी संत ज्ञानदेव विरचित हरिपाठातील ‘देवाचिये द्वारी’ या अभंगाला लावलेली सुमधूर चाल या वेळी ते अमेरिकेत शिक्षण घेत होते.
‘लक्ष्मीची पावले’ हा श्रीधर फडके यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट होय. यातील ‘फिटे अंधाराचे जाळे’ हे गीत फारच गाजले.सुधीर फडके आणि आशा भोसले या दिग्गज कलाकरांनी हे गीत गायले होते. याला अमाप लोकप्रियता लाभल्यामुळे संगीत विश्वातील श्रीधर फडके यांचे स्थान भक्कम झाले.
‘ओंकार स्वरुपा, ’ ‘ऋतु हिरवा’ या ध्वनिफितींतील त्यांनी स्वरबद्ध केलेली गीते अत्यंत लोकप्रिय ठरली. ‘काही बोलायाचे आहे’ ही त्यांनी गायलेल्या गीतांची ध्वनिफीत, पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या सहगायनातील ‘हे गगना’, आरती अंकलीकर व सुरेश वाडकर यांनी गायलेली ‘तेजोमय नादब्रम्ह’ आणि ‘सुखरदा रामा’, ‘संगीत मनमोही रे’ इ. ध्वनिचकत्यांतील गीते लोकप्रिये झालेली आहेत. लोकप्रियतेच्या मानांकनासाठी त्यांच्या चार ध्वनिचकत्यांना ‘प्लॅटिनम डिस्क’ बहाल झाली आहे.
एअर इंडियातील वरिष्ठ पदावरुन ते निवृत्त झालेत.हा संगीतचा छंद, त्यांनी नोकरी सांभाळून जोपासला. निवृत्तीनंतर पूर्ण वेळ संगीतकार व गायक म्हणून त्यांची वाटचाल चालू आहे.
महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट पार्श्वगायक’ पुरस्कार 1997 (चित्रपट- विश्वविनायक) त्यांना प्राप्त झाला आहे. संगीत दिग्दर्शनासाठी ‘फिल्मफेअर’ पुरस्कार , ‘वारसा लक्ष्मीचा’ (1995) ‘पुत्रवती’ (1997) ‘लेकरु’ (1999) या तीन चित्रपटांसाठी त्यांना मिळाला. दूरदर्शनाचा ‘स्वरतीर्थ’ पुरस्कार,भारत गायन समाज, पुणे यांचा ‘वसुधरा पंडित’ पुस्कार त्यांच्या नावावर आहेत.
-रवींद्र आपटे