चित्र-चरित्र

बाबूराव पेंटर
बाबूराव पेंटर
दिग्दर्शक, निर्माता, कलादिग्दर्शक
३ जून १८९० --- १६ जानेवारी १९५४

हाडाचे चित्रकार असलेल्या बाबूराव कृष्णराव मिस्त्री यांना लोक ‘बाबूराव पेंटर’ या नावाने ओळखत असत. त्यांचे शिक्षण अवघे मराठी ४-५ इयत्ता झाले होते, पण लहानपणीच वडिलांकडून हस्तिदंती कोरीवकाम, चित्रकला, सुतारकाम, यंत्रविद्या यांचे उपयुक्त शिक्षण त्यांना मिळत गेले. बाबूरावांचे मावसभाऊ आनंदराव पेंटर यांच्या सहवासामुळे चित्रकलेबरोबरच छायाचित्रणामध्येही बाबूरावांचा रस वाढू लागला. ललित कलादर्श नाटक मंडळीचे मालक नटवर्य केशवराव भोसले हे मूळचे कोल्हापूरचे होते. त्यांनी १९०९ साली या पेंटरबंधूंना नाटकाचे पडदे रंगवायला मुंबईत बोलावले. मुंबईत आल्यावर या बंधूंनी अनेक मूकपट पाहिले आणि कोल्हापूरला परत जाताना, ‘आपण मूकपट काढायचा’, असा ठाम निश्‍चय केला.

मूकपट काढण्यासाठी आनंदरावांनी स्वतः कॅमेरा बनवायला घेतला. तसेच चित्रपटगृहही चालवायला घेतले, तर चित्रपट निर्मितीसाठी पैसा उभा राहील असे वाटल्यामुळे पेंटर बंधूंनी कोल्हापुरात ‘डेक्कन’ चित्रपटगृह चालवायला घेतले. पण तसे घडले नाही व कॅमेराही पूर्ण झाला नाही. आनंदरावांच्या अकाली निधनाने कॅमेरा पूर्ण करण्याचे काम बाबूरावांनी करायचे ठरवले. आपल्या निश्‍चयाचा विसर पडू नये, म्हणून वयाच्या २३व्या वर्षी त्यांनी दाढी राखली ती शेवटपर्यंत.

दादा मेस्त्री यांच्या साहाय्याने लेथ मशीनवर अनेक प्रयोग करून स्वदेशी बनावटीचा कॅमेरा तयार करायला बाबूरावांना दोन वर्षे लागली. या स्वदेशी कॅमेर्‍याने त्यांनी अनेक दृश्ये चित्रित केली. कोल्हापूरच्या रंकाळा तलावात पोहण्यासाठी उड्या मारणारी मुले, पंचगंगेच्या घाटावर कपडे धुणार्‍या बायका, अशा चाचणी दृश्यांची चित्रे त्यांनी चित्रित केली. पण १-२ मिनिटांच्या स्ट्रिप्स धुण्यासाठी कोल्हापुरात रसायनशाळा नव्हती. ती रसायनशाळा व प्रिंटिंग मशीनही बाबूरावांनी तयार केले आणि थिएटरमध्ये जाऊन त्या सार्‍या स्ट्रिप्स पाहिल्या, तेव्हा आनंदराव पेंटरांचे कॅमेरा निर्मितीचे स्वप्न साकार केल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर विलसत होता.

कॅमेरा सज्ज झाला, पण चित्रपट निर्मितीसाठी भांडवलाचा प्रश्‍न उभा राहिला. कलावंतांची अडचण कलावंतालाच कळते, या न्यायाने कोल्हापूरच्या विख्यात गायिका तानीबाई कागलकर यांनी बाबूरावांना आर्थिक साहाय्य केले. भांडवल मिळताच १० डिसेंबर १९१७ रोजी आजचे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या (जुन्या पॅलेस थिएटरच्या) जागेवर महाराष्ट्र फिल्म कंपनीचा स्टुडिओ उभारला. येथे एक गोष्ट नमूद करायला हवी, ती म्हणजे नाशिकला दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेल्या फिल्म कंपनीचे नाव होते, ‘हिंदुस्थान फिल्म कंपनी’, तर बाबूरावांनी छत्रपतींच्या राजधानीत फिल्म कंपनी काढताना ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ हे नाव दिले. स्थापनेच्या वेळी बाबूरावांसोबत विष्णुपंत दामले, साहेबमामा फत्तेलाल, लेखक नानासाहेब सरपोतदार आणि बाबूराव पेंढारकर ही तरुण मंडळी होती.

या कंपनीच्या स्थापनेनंतर १९१८ साली बाबूराव पेंटर यांनी मुंबईत भरलेल्या कॉंग्रेस अधिवेशनावर लघुपट तयार केला आणि कीचकवध कथानकावर ‘सैरन्ध्री’ चित्रपट करायला घेतला. त्याआधी २/४ वर्षे खाडिलकरांचे ‘कीचकवध’ हे नाटक रंगभूमीवर गाजले होते. त्यातून बाबूरावांना प्रेरणा मिळाली असावी.

चित्रपटात स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनीच कराव्या हा बाबूरावांचा आग्रह होता, यातून कॅमेरा माध्यमाची त्यांची जाण अभिव्यक्त होते. त्या काळी मराठी रंगभूमीवर पुरुष स्त्रीपार्ट करायचे. फाळके यांनीही आपल्या पहिल्या चित्रपटात तारामतीची भूमिका साळुंके नावाच्या पुरुषालाच दिली होती. मूकपटांच्या काळात काम करायला स्त्रिया मिळणे अवघड होते. बाबूरावांनी अनेक प्रयत्नानंतर ‘सैरंध्री’ व ‘सुदेष्ण’ यांच्या भूमिकांसाठी गुलाबबाई व अनसूयाबाई यांना राजी केले. ‘भीम’ बाळासाहेब यादव आणि ‘कीचक’ झुंझारराव पवार.

‘सैरन्ध्री’ ७ फेब्रुवारी १९२० रोजी पुण्यात ‘आर्यन’ थिएटरमध्ये प्रकाशित झाला. लोकमान्य टिळकांनी हा चित्रपट पाहिला आणि ‘फिल्म केसरी’ ही पदवी व सुवर्णपदक देऊन बाबूरावांचा सत्कार केला. चित्रपट हलक्या लोकांची करमणूक मानले जाणार्‍या त्या काळात लोकमान्यांनी केलेला गौरव जनमानसात चित्रपटाची प्रतिष्ठा उंचावणारा ठरला. ‘सैरन्ध्री’ या चित्रपटामुळे मूकपटाच्या जमान्यातही मराठी चित्रपटाची ‘कले’कडे वाटचाल सुरू झाली. बाबूराव स्वतः उत्तम चित्रकार असल्याने ‘सैरन्ध्री’ चित्रपटाचे कलादिग्दर्शन अप्रतिम होते. ‘सैरन्ध्री’पाठोपाठ ‘सुरेखाहरण’ या दुसर्‍या मूकपटानेही ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ला चांगलाच आर्थिक फायदा झाला. तेव्हा बाबूरावांनी ‘बेल ऍण्ड हॉवेल’ हा त्या काळातला उत्कृष्ट कॅमेरा खरेदी केला. तिसर्‍या ‘मार्कण्डेय’ मूकपटाचे चित्रीकरण सुरू असताना स्टुडिओतील वेस्ट फिल्म स्टॉकला आग लागून त्यात स्टुडिओ भस्मसात झालाच, पण त्याबरोबरच ‘सैरन्ध्री’, ‘सुरेखाहरण’ अर्धा चित्रित झालेला ‘मार्कण्डेय’ आणि बाबूरावांनी बनवलेला स्वदेशी कॅमेरा आगीचे भक्ष्य ठरला. फक्त बेल ऍण्ड हॉवेल कॅमेरा बचावला. या संकटातून सरदार नेसरीकरांनी १२ हजार रुपये भांडवल देऊन महाराष्ट्र फिल्म कंपनी वाचवली. त्यामुळे नेसरीकर कंपनीचे तिसरे भागीदार झाले.

पुनश्‍च सुरुवात करताना बाबूराव पौराणिक कथानकाकडून ऐतिहासिक कथानकाकडे वळले. ‘भक्त दामाजी’ व ‘सिंहगड’ हे दोन मूकपट त्यांनी तयार केले. ‘सिंहगड’ने कंपनीला एकदम सुस्थितीत नेऊन ठेवले. ‘मायाबाजार’, ‘कल्याण खजिना’, ‘सती पद्मिनी’, ‘श्रीकृष्णावतार’ असे ऐतिहासिक व पौराणिक मूकपट दिल्यानंतर बाबूराव ‘सावकारी पाश’ (१९२५) द्वारा सामाजिक चित्रपटाकडे वळले. त्यातले वातावरण कमालीचे वास्तव होते. त्याचीही प्रिंट आज उपलब्ध नाही. ‘सावकारी पाश’ उत्तम मूकपट असूनही चांगलाच कोसळला. त्यामुळे बाबूराव पुन्हा ऐतिहासिक व पौराणिक कथानकांकडे वळले.

याच काळात कंपनीत कुरबुरी सुरू झाल्या. त्याला कंटाळून बाबूराव महाराष्ट्र फिल्म कंपनीतून राजीनामा देऊन बाहेर पडले. १९२० ते १९३१ या अवघ्या ११ वर्षांत बाबूरावांनी मराठी चित्रपटाच्या जडणघडणीत मोलाची कामगिरी बजावली. ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ने कोल्हापुरात मराठी चित्रपटसृष्टीची पायाभरणी केली. आजही कोल्हापूर हे मराठी चित्रपटाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. बाबूरावांचे तरुण सहकारी व्ही. शांताराम, दामले, फत्तेलाल व धायबर ही बाबूरावांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेली मौलिक देणगी. याच त्यांच्या साहाय्यकांनी एकत्र ‘प्रभात’ फिल्म कंपनी स्थापन करून मराठी चित्रपटाचे नाव भारतभर केले.

महाराष्ट्र फिल्म कंपनीतून १९३१ साली बाबूराव बाहेर पडले, त्याच वेळी भारतीय चित्रपटात ध्वनी आला. चित्रपटाने जणू कात टाकली. चित्रपटाचा हा नवा अवतार मूकपटांचा जमाना गाजवणार्‍या बाबूरावांना नीट आत्मसात करता आला नाही.

बोलपटयुगात त्यांनी ‘उषा’, ‘सावकारी पाश’, ‘प्रतिभा’ हे चित्रपट दिग्दर्शित केले, पण त्यांना लोकप्रियता लाभली नाही. नंतर १९४७ साली तमाशाप्रधान ‘राम जोशी’ हा चित्रपट ‘राजकमल’साठी दिग्दर्शित केला, पण तो पूर्ण करावा लागला व्ही. शांताराम यांना. १९५१ साली मुंबईत ‘विश्वामित्र’ चित्रपट दिग्दर्शित केला तो साफ कोसळला, तेव्हा चित्रपटसंन्यास घेऊन बाबूराव कोल्हापूरला परतले. तेथेच त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.

बाबूराव मराठी चित्रपटसृष्टीचे विश्वकर्मा होते. त्यांना यंत्राविषयी विलक्षण कुतूहल. घड्याळ, कॅमेरा अशी कोणतीही यांत्रिक वस्तू त्यांच्या हाती गवसली की ती खोलून पुन्हा होती तशी जुळवण्यात त्यांचा हातखंडा होता. यंत्राविषयी कुतूहल असणारे बाबूराव मनाने सरंजामशाही युगातच वावरत होते. यंत्रयुगातील जीवनमूल्यांशी त्यांचे कधीच जुळले नाही. त्यामुळे चित्रपटातला ‘व्यवसाय’ त्यांना कधीच उमजला नाही.

बाबूराव श्रेष्ठ चित्रकार होते, शिल्पकार होते, उत्तम कलादिग्दर्शक होते, यंत्रविशारद होते, मूकपट निर्माते, दिग्दर्शक होते. त्यांच्या निधनानंतर ना. सी. फडके यांनी आपल्या ‘अंजली’ मासिकाचा संपूर्ण अंक बाबूरावांचे अष्टपैलू कलागुण चितारण्यासाठी काढला. या अंकात ‘कलामहर्षी’ असा त्यांचा गौरव केला. तीच उपाधी मरणोत्तर बाबूरावांच्या नावामागे लागली.

चित्रपट हे पश्चिमेकडून आयात केलेले ‘कला’माध्यम मराठी मातीत रुजवण्याची अनमोल कामगिरी बाबूरावांनी केली.

- सुधीर नांदगावकर



चित्र-चरित्र