चित्र-चरित्र

रॉय किणीकर
रॉय किणीकर
लेखक
५ सप्टेंबर १९७८

रघुनाथ रामचंद्र किणीकर हे सुप्रसिद्ध कवी, लेखक, पत्रकार व कलंदर कलावंत होते. रॉय किणीकर या नावाने ते प्रसिद्ध होते. ‘रात्र’ आणि ‘उत्तररात्र” हे काव्यसंग्रह, “खजिन्याची विहीर”, “येगं येगं विठाबाई” ही नाटके आणि अनेक ललितलेख त्यांनी लिहिले. किणीकर यांचे वडील वकील होते. रॉय किणीकरांनी आयुष्यातील बहुतांश काल कर्नाटकातील गुलबर्गा येथे घालवला. पुढचा काही काळ त्यांनी पुण्यात आणि औरंगाबादेत व्यतीत केला. रॉय किणीकर हे औरंगाबाद येथून प्रकाशित होणार्‍या दैनिक अजिंठाच्या रविवारच्या आवृत्तीचे संपादक होते. रविवार पुरवणीत ते काही ना काही ललित लेखन करीत असत. रॉय किणीकर यांनी काही नाटकांत भूमिका केल्या आहेत. औरंगाबाद येथील सरस्वती भुवन शाळेच्या मदतीसाठी झालेल्या आचार्य अत्रे यांच्या ’घराबाहेर’ नाटकात त्यांनी काम केले होते. त्यांनी औरंगाबाद नभोवाणीसाठी काही श्रुतिकाही लिहिल्या होत्या. त्यांच्या नाटकांचे रंगभूमीवर प्रयोग होत असत. रॉय किणीकरांच्या ’ये गं ये गं विठाबाई’ या नाटकाचे त्याकाळी १९ प्रयोग मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या नाट्य विभागाने केले होते. साहाय्यक नाट्यदिग्दर्शक म्हणून ते अभिनय, संवादफेक अशा गोष्टी सहजपणे समजावून सांगत. किणीकरांनी नाटक, एकांकिका, कथा, कादंबरी, चित्रपट लेखन, अनुवाद, बालसाहित्य अशा साहित्याच्या बहुतेक प्रत्येक क्षेत्रात लिखाण केले असले तरी रात्र आणि प्रामुख्याने उत्तररात्र ह्या दोन कवितासंग्रहांच्या माध्यमातून रॉय किणीकर हे जाणकारांना जास्त परिचीत आहेत. रॉय किणीकर हे त्यांच्या शैलीबद्ध "रुबायांसाठी" ओळखले जात. १९४४ मधील ‘पुंडलीक’ या चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद रॉय किणीकर यांनी लिहिले होते. त्यानंतर त्यांनी १९५५ मध्ये ‘शिर्डीचे साईबाबा’ आणि १९७० मध्ये ‘झाला महार पंढरीनाथ’ या चित्रपटाचे कथा-पटकथा-संवाद लिहिले होते.

-मंदार जोशीचित्र-चरित्र