सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयीचा ‘बाई’ हा पहिला चित्रपट. एका दलित स्त्रीचा जीवनसंघर्ष व्यक्त करणार्या ‘बाई’ला राष्ट्रपतींच्या रजत कमल पुरस्काराने गौरवले गेले आणि या पहिल्याच चित्रपटाने ‘संवेदनशील आणि सामाजिक भान जपणारे चित्रपटकर्ते’ म्हणून सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी भारतीय चित्रपट क्षेत्रामध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
चित्रपट क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी जवळजवळ वीस वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणार्या सुमित्रा भावे यांचा जन्म पुण्यातला. त्यांच्या वडिलांचे नाव केशव उमराणी आणि आईचे नाव कमल. त्यांचे शालेय शिक्षण आगरकर हायस्कूलमध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. पुणे विद्यापीठातून त्यांनी मराठी माध्यमातून समाजशास्त्रामध्ये आणि राज्यशास्त्रामध्ये पदवी संपादन केली आणि त्यानंतर मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून ‘मास्टर इन सोशल वर्क’ची पदवी घेतली.
त्यानंतर त्यांनी पुण्यातल्या कर्वे शिक्षण संस्थेत सामाजिक कार्य हा विषय दहा वर्षे शिकवला. या दरम्यान लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी प्रत्यक्ष काम करण्याची गरज त्यांना जाणवली आणि त्यांनी उरळीकांचन येथे एक अभिनव प्रयोग केला. शाळा सोडलेल्या ग्रामीण भागातल्या मुलांना मुक्त शिक्षण देणार्या मुक्त विद्यापीठाचा. त्यानंतर अविवाहित माता, महिला गुन्हेगारी, गांधी विचारप्रभावित महिला नेतृत्व, स्त्रीविषयक पुराणकथांचे पुनरावलोकन, अशा अनेक प्रकल्पांवर त्यांनी संशोधन केले आणि प्रबंध सादर केले.
स्त्रीवाणी संशोधन प्रकल्पाच्या संचालकपदावर दहा वर्षे काम करताना त्यांना जाणवले की, आतापर्यंत महिलाविषयक आणि सामाजिक संशोधनातून आलेले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि विशेषत: अशिक्षित समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सगळ्यात प्रभावी माध्यम आहे ते दृक-श्राव्य माध्यम, अर्थात चित्रपट माध्यम; आणि म्हणूनच सुमित्रा भावे यांच्या चित्रपटांमध्ये त्यांचा सामाजिक कार्यासंबंधीचा अभ्यास, संशोधन आणि कार्य याचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. त्यांना पुण्याच्या फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन संस्थेत दिग्दर्शनाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सुनील सुकथनकर यांची साथ लाभली. सुनील सुकथनकर आणि सुमित्रा भावे या दिग्दर्शकद्वयीने आतापर्यंत सामाजिक आशयाचे मनोरंजक चित्रपट तयार केले. चित्रपटाची मांडणी जर कलात्मक असेल, तर वास्तववादी पद्धतीने चांगल्या विचारातही प्रेक्षकांचे मन गुंतवून ठेवता येते, हे त्यांनी सिद्ध केले. ज्या परिसरात, ज्या काळात चित्रपटाची कथा घडते, त्या काळाची भाषा जपण्यासाठी संवादलेखन, त्या काळाचे अचूक वातावरण दाखवण्यासाठी त्या चित्रपटाचे कलादिग्दर्शन आणि वेषभूषा, हे भागही सुमित्रा भावे स्वत: सांभाळतात. तर बर्याच चित्रपटांत सुनील सुकथनकर समर्पक गीते लिहितात. लोकसंस्कृतीचे प्रदर्शन हे त्यांच्या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य. चित्रपट हे जरी आभासी माध्यम असले, तरी त्यातले संदेश वास्तववादी रूपात लोकांसमोर यावेत, यावर त्यांचा कटाक्ष असतो. त्यांच्या चित्रपटात कलाकारांना लौकिक अर्थाने रंगभूषा नसते, ती यामुळेच.
या दिग्दर्शकद्वयीचे चित्रपट जनसामान्यांमध्ये लोकप्रिय ठरले आणि या लोकप्रियतेवर सन्माननीय शासकीय पुरस्कारांचीही मोहोर उठली. ‘बाई’ - उत्कृष्ट सामाजिक कल्याण चित्रपट, ‘पाणी’ - उत्कृष्ट अभिप्रेरक चित्रपट आणि ‘दोघी’ - उत्कृष्ट कुटुंबकल्याण चित्रपट, या चित्रपटांना राष्ट्रपतींच्या रजत कमल पुरस्काराने गौरवले गेले.
त्यानंतर १९९४ साली या द्वयीने ‘दोघी’ हा खेड्यातल्या दोन तरुण मुलींनी अंधश्रद्धेविरुद्ध दिलेला लढा दाखवणारा, ‘जिंदगी जिंदाबाद’ (१९९६) हा भारतातील एड्स समस्येवर आधारित चित्रपट, ‘दहावी फ’ (२००२) हा पौगंडावस्थेतील हिंसकतेवर सकारात्मक उपाय सुचवणारा, ‘वास्तुपुरुष’ (२००५) हा जमीनदारीचा व जातिव्यवस्थेचा बीमोड आणि जागतिक स्तरावरचा नव्या सामाजिक दृष्टिकोन देणारा, ‘देवराई’ (२००४) हा देवराईच्या रूपालंकारात विश्लेषित केलेली स्किझोफोनिया रुग्णाच्या मानसिक अवस्था, ‘बाधा’ (२००४) हा भीती आणि श्रद्धा यांतला संघर्ष, ‘नितळ’ (२००६) हा श्वेत कोड असलेल्या तरुण महिला डॉक्टरची कथा, सुंदर असणे म्हणजे एकमेवाद्वितीय असणे, ‘बेवक्त बारीश’ (२००७) हा एड्सच्या छायेत फुलणारे तरल प्रेम दर्शवणारा, ‘घो मला असला हवा’ (२००९) हा खेड्यातल्या एका बंडखोर तरुणीची संगीतमय कथा सांगणारा, आणि ‘एक कप चाय’ हा माहितीचा अधिकार कायद्यावर आधारित सामान्य माणसाच्या आत्मसन्मानाच्या कथेवरचा चित्रपट, ‘मोर देखने जंगल में’ (२०१०) हा आदिवासी कल्याणासाठी काम करणार्या एका तरुण व्यवस्थापनशास्त्र पदवीधराचा स्वयंअनुभूतीचा प्रवास, ‘हा भारत माझा’ (२०११) अण्णा हजारेंच्या आंदोनाच्या पार्श्वभूमीवर स्वत:ची जीवनमूल्ये तपासून पाहणार्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा, ‘संहिता’ हा स्वातंत्र्यपूर्व काळातला संस्थानिक राजवटीचा काळ आणि आधुनिक काळ यांची सांगड घालणारी कथा, अशा चित्रपटांची निर्मिती केली.
अमेरिका, यू.के., जपान, इटली, ङ्ग्रान्स, स्पेन, नॉर्वे, कॅनडा, इजिप्त, रशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया येथील चित्रपट महोत्सवांमध्ये हे सर्व चित्रपट प्रदर्शित केले गेले. ‘दोघी’ या चित्रपटाला कथा-पटकथा-संवादलेखनासाठी आणि कला दिग्दर्शनासाठी सुमित्रा भावे यांना अकरा राज्य पुरस्कार मिळाले. शिवाय टोरीनो, इटली हे आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले.
व्ही. शांताराम पुरस्कार, अरविंदन पुरस्कार, फिल्मफेअर, कालनिर्णय आणि नानासाहेब सरपोतदार पुरस्कार असे राष्ट्रीय स्तरावरचे पाच पुरस्कारही त्यांना मिळाले. ‘दहावी फ’ या चित्रपटाला २००२-०३ मधील उत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासह पाच राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय पुरस्कार समित्यांवर परिक्षक म्हणून त्यांनी काम केले. प्रत्येकानेच जर मानवी स्वभावातील आणि परिस्थितीतील वैविध्य स्वीकारले आणि कोणीही कोणाचीही, कोणत्याही कारणाने पिळवणूक केली नाही, तर आपले आणि इतरांचेही जीवन सुंदर होईल, हा या दिग्दर्शकद्वयीचा जीवनविषयक दृष्टिकोन आहे आणि तोच त्यांच्या चित्रपटांत नेहमी व्यक्त झालेला दिसतो. 'वेलकम होम', 'कासव', 'दिठी' हे सुमित्रा भावे यांचे अलीकडचे काही उत्तम चित्रपट.
१९ एप्रिल २०२१ रोजी सुमित्रा भावे ह्यांचे निधन झाले. भावे ह्यांच्या कारकीर्दीवर आधारलेला संतोष पाठारे दिग्दर्शित लघुपट गेल्या वर्षी प्रदर्शीत झाला.
- इंद्रायणी चव्हाण