चित्र-चरित्र

राजेश देशपांडे
राजेश देशपांडे
दिग्दर्शक
४ ऑगस्ट

राजेश देशपांडे यांचे बालपण व दहावीपर्यंतचे शिक्षण कोकणात राजापूर तालुक्यातील येळवण गावी झाले. बालपणी त्यांच्यावर संस्कार झाले ते पुस्तकांचे. विद्यानिकेतन येळवण हायस्कूलच्या ग्रंथालयात असलेल्या पुस्तकांमुळे देशपांडे यांना वाचनाची गोडी लागली. जयवंत दळवी, जी.ए. कुलकर्णी, बाबूराव अर्नाळकर, पु. ल. देशपांडे अशा लेखकांचा त्यांच्यावर प्रभाव होता. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. अंधेरी येथील ‘एमव्हीयूएल’ या महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले.याच काळात त्यांना कविता वाचन तसेच लेखनाची आवड निर्माण झाली. याच काळात ते मुंबईतील विविध रंगकर्मी संस्थांशी जोडले गेले. राजेशचे वडील कलावंत. दादा कोंडके यांच्यासोबत त्यांनी कलापथकात कामं केली होती. परंतु, त्यांना फार पुढं जाता आलं नव्हतं. त्यामुळे आपल्या मुलानं या क्षेत्रात करिअर करावं असं त्यांचं स्वप्न होतं. ते कालांतरानं देशपांडे यांनी पूर्ण केलं. सुरुवातीच्या काळात मुंबईतील काही वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी नोकरी केली. पुढे ही नोकरी सोडून ‘मृण्मयी’ मालिकेचे ते सहदिग्दर्शक बनले. राजेशच्या कारकीर्दीला स्थैर्य दिलं ते ‘गंगूबाई नॉनमॅट्रिक’ या मालिकेने. तब्बल सहा वर्षं त्यानं ही मालिका केली. या मालिकेनंतर त्यानं ‘धुडगूस’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यानंतरचे त्यांचे महत्त्वाचे चित्रपट म्हणजे ‘कुणी घर देता का घर’, ‘कुमारी गंगूबाई नॉनमॅट्रिक’ आणि ‘शिकारी’. ‘सासू माझी ढासू’, ‘करून गेलो गाव’ हे त्यांचे रंगभूमीवरील उल्लेखनीय काम.
-मंदार जोशीचित्र-चरित्र