चित्र-चरित्र

मास्टर विनायक
मास्टर विनायक
अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता
१९ जानेवारी १९०६ --- १९ ऑगस्ट १९४७

मा. विनायक उर्फ विनायक दामोदर कर्नाटकी यांचा जन्म कोल्हापूरला झाला. स्वत: शिकत असतानाच त्यांनी कोल्हापूरच्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये मुलांना शिकवायला सुरुवात केली. त्या काळात ते राष्ट्रप्रेमाने भारलेले होते. कोल्हापुरात ‘तपोवन’ या गावाबाहेर असलेल्या आश्रमात ते राहत असत. त्या काळात गजानन जागीरदारही तेथे राहत, त्यामुळे मा. विनायक आणि गजानन जागीरदार यांच्यात गाढ मैत्री निर्माण झाली.

प्रभात फिल्म कंपनीने १९३१ साली ‘अयोध्येचा राजा’ हा बोलपट काढला. या बोलपटातील इंद्राच्या दरबारात नारदाच्या भूमिकेसाठी व्ही. शांताराम यांनी मा. विनायक यांची निवड केली. त्यांनी जीव ओतून ही छोटीशी भूमिका केली. या चित्रपटात ‘आदि पुरुष नारायण’ हे गाणे त्यांनी गायले होते. त्यांचा आवाजही चांगलाच होता. त्यामुळे गाणे चालले आणि प्रेक्षकांनाही आवडले. त्यानंतर त्यांनी व्ही. शांताराम यांचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामाला सुरुवात केली. प्रभात फिल्म कंपनीत ‘अयोध्येचा राजा’नंतर ‘अग्निकंकण’ चित्रपटात नायक राजपुत्र, ‘मायामच्छिंद्र’मध्ये गोरखनाथ, ‘सैरंध्री’त कंचुकी आणि ‘सिंहगड’मध्ये जगतसिंह अशा भूमिका केल्या. ‘सैरंध्री’ चित्रपटात कंचुकीच्या भूमिकेत मा. विनायक यांनी त्यांच्या चालणे, बोलणे, पाहणे, मान हलवण्याची लकब या हालचालीतून, तरुण असतानाच वृद्धत्वाचा भास निर्माण केला. प्रेक्षकांना ही भूमिका आवडली.

‘सैरंध्री’नंतर प्रभात फिल्म कंपनीने पुण्याला स्थलांतर केले. पण मा. विनायक पुण्याला गेले नाहीत. कोल्हापुरातच भालजी पेंढारकर, बाबूराव पेंढारकर, मा. विनायक आणि वासुदेव एकत्र आले. राजाराम महाराजांनी ‘कोल्हापूर सिनेटोन’ या चित्र कंपनीची सुरुवात करून चित्रपट निर्मितीला सुरुवात केली होती. ‘कोल्हापूर सिनेटोन’ने श्रीकृष्णचरित्रावर आधारित ‘आकाशवाणी’ हा चित्रपट प्रदर्शित केला. या चित्रपटासह ‘भिकारन’ या चित्रपटातही मा. विनायकांनी नायकाची भूमिका केली. त्यानंतरच्या ‘विलासी ईश्‍वर’ चित्रपटात ते नायक आणि दिग्दर्शकही होते. संपूर्ण लांबी असणारा मराठी भाषेतला हा पहिला सामाजिक चित्रपट होता. मामा वरेरकर यांची कथा होती. अनौरस संतती हा चित्रपटाचा विषय होता आणि नायिका होत्या शोभना समर्थ. ‘डान्स ऑफ आर्ट’ या नृत्याची रंगतदार सुरुवात या चित्रपटात केली होती. पुढे ‘कोल्हापूर सिनेटोन’मधून बाहेर पडून मा. विनायक, कॅमेरामन पांडुरंग नाईक आणि बाबूराव पेंढारकर यांनी एकत्र येऊन ‘हंस पिक्चर्स’ची स्थापना केली आणि ‘छाया’ हा बोलपट काढला. वि.स. खांडेकर यांनी या चित्रपटासाठी कुमारी माता या विषयावर कथा लिहिली होती. सामाजिक समस्येला हात घालणारा मराठीतला हा पहिला गंभीर शोकान्त चित्रपट ठरतो. हा चित्रपट उत्तम चालला. कलकत्ता प्रेस असोसिएशनकडून चित्रपटाच्या कथेला ‘गोहर’ सुवर्णपदकही मिळाले. ‘छाया’ चित्रपटाने त्या काळात चांगलीच खळबळ उडवून दिली होती.

‘छाया’नंतर मा. विनायक यांनी ‘धर्मवीर’ हा चित्रपट केला. ‘पिलर्स ऑफ सोसायटी’ या इब्सेनच्या नाटकावरून आचार्य अत्रे यांनी या चित्रपटाची कथा लिहिली होती. त्यानंतर ‘प्रेमवीर’ हा विनोदी चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटात वेषांतर करणार्‍या ‘जगदीश’ या नायकाच्या भूमिकेत मा. विनायकरावांनी काम केले. नंतर ‘ज्वाला’ चित्रपटात मात्र नायक होते चंद्रमोहन. त्यानंतर ‘हंस पिक्चर्स’ने ‘ब्रह्मचारी’ हा चित्रपट प्रदर्शित केला. या चित्रपटाने नवा इतिहास घडवला आणि ‘हंस’ला नवजीवन मिळाले. अत्रे यांची प्रभावी लेखनशैली आणि मा. विनायक यांचे कलात्मक दिग्दर्शन यांच्या प्रभावी मिश्रणामुळे ब्रह्मचारी यशस्वी ठरला. त्यानंतर त्यांनी ‘ब्रँडीची बाटली’, ‘देवता’, ‘सुखाचा शोध’ आणि ‘अर्धांगी’ असे यशस्वी चित्रपट काढले. पुढे ‘हंस चित्र’ संस्था बंद झाली आणि हंसचे मालक, आचार्य अत्रे, राजगुरू यांनी पुण्यात ‘नवयुग चित्रपट लिमिटेड’ ही संस्था स्थापन केली आणि ‘लपंडाव’ हा बोलपट प्रदर्शित केला. यामध्ये मा. विनायक यांनी अप्रतिम भूमिका केली होती. त्यांच्यासोबत नायिका होत्या वनमाला.

या चित्रपटानंतर ‘नवयुग’मध्ये मतभेद झाल्याने आचार्य अत्रे, बाबूराव पेंढारकर आणि पांडुरंग नाईक बाहेर पडले. नवयुगचे ‘अमृत’, ‘लग्न पहावे करून’, ‘सरकारी पाहुणे’, ‘संगम’ हे चित्रपट मा. विनायकरावांनी दिग्दर्शित केले आणि ‘नवयुग फिल्म कंपनी’तून बाहेर पडले. नंतर त्यांनी ‘प्रफुल्ल चित्र’ ही स्वत:ची संस्था स्थापन केली आणि ‘चिमुकला संसार’ हा चित्रपट निर्माण केला. दिग्दर्शक होते वसंत जोगळेकर. मा. विनायक यांच्यासह मीनाक्षी, दादा साळवी, दामूअण्णा मालवणकर आणि लता मंगेशकर अशा दिग्गजांच्या या चित्रपटात भूमिका होत्या. ‘साहेबबानू लाटकर’ या अभिनेत्रीवर कॅमेरा रोखून या चित्रपटाची सुरुवात केली. याच साहेबबानू लटकर मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री ठरल्या. त्या पुढे ‘सुलोचना’ या नावाने प्रसिद्धीस आल्या.

‘चिमुकला संसार’नंतर मा. विनायक यांनी ‘माझं बाळ’ हा गंभीर प्रवृत्तीचा चित्रपट केला. प्रेक्षकांनी गंभीर आशयाच्या या चित्रपटाचे चांगलेच स्वागत केले, त्याचे महत्त्वाचे कारण मा. विनायक यांचे नाव मराठी प्रेक्षकांत लोकप्रिय झालेले होते. त्यानंतर मा. विनायक यांनी ‘गजाभाऊ’ या युद्धप्रचारक चित्रपटाची निर्मिती केली होती. सर्जनशील वृत्तीच्या या दिग्दर्शकाचा मुंबई येथे मृत्यू झाला.

- द. भा. सामंत



चित्र-चरित्र