नागराज पोपटराव मंजुळे यांचा जन्म सोलापूर जिल्हयातील, करमाळा तालुक्यातील जेऊर गावचा. त्यांचा जन्म वडार समाजात झाला. वडार समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी, तरीही नागराज यांना शिक्षणाची आतून ओढ वाटायची. गावातल्या टुरिंग टॉकींजमधला चित्रपट पहायला त्यांना आवडायचे. व्हिडीओवरही एक रूपया देऊन चित्रपट पाहायला मिळायचे. शाळा बुडवून ते चित्रपट पाहायला जात असत. त्यांना अमिताभ बच्चनचे चित्रपट आवडायचे. चित्रपटाचे वेड तिथूनच सुरू झाले. खरेतर नागराज यांना गोष्ट ऐकायला खूप आवडायचे. त्यांची मोठी आत्या, आई गोष्टी सांगायच्या, त्या ऐकताना नागराज त्या गोष्टीच्या जगात रमून जायचे. नागराज यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण जेऊर येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते पुणे विद्यापीठात शिकायला आले. मराठी विषयात एम.ए. करताना त्यांना केशवसुत, मर्ढेकर, अरूण कोल्हटकर, नामदेव ढसाळ नव्याने भेटत गेले. अधिक जवळचे वाटत गेले. एम.फिल करत चित्रपटाचे विचार डोक्यात घट्ट बसलेले होते. अहमदनगर येथील कॉलेजात त्यांनी चित्रपट माध्यमाचे प्रशिक्षण घेतले. समाजातल्या सामाजिक भेदभाव आणि परिणामी आर्थिक अडचणींवर आधारलेला ‘पिस्तुल्या’ हा त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार विजेता लघुपट आहे. नागराज यांचा ‘फँड्री’ हा पहिला चित्रपट फेब्रुवारी 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचे भरपूर कौतुक झाले. त्यानंतर मंजुळे यांच्या प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ चित्रपटानं इतिहास घडवला. १०० कोटींपर्यंत मजल मारणारा हा पहिला मराठी चित्रपट. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील उत्पन्नांचे सर्व विक्रम मोडीत काढले. 66 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाची वाखाणणी झाले. या चित्रपटाला अजय-अतुल यांनी दिलेले संगीत घराघरात पोचले. याच वर्षी ‘सैराट’वर आधारलेला ‘धडक’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला.
नागराज मंजुळे केवळ एक दिग्दर्शक नसून ते एक उत्तम कवीसुद्धा आहेत. त्यांच्या ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ या कवितासंग्रहाला दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय २०१४ मध्ये नारायण सुर्वे काव्य प्रतिभा पुरस्कार आणि दया पवार स्मृती पुरस्कार मिळाले आहेत. मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पावसाचा निबंध’ या लघुपटालाही २०१७ मधील राष्ट्रीय पुरस्कारांद्वारे गौरविले गेले होते.
खासदार नरेंद्र जाधव म्हणतात की, “नागराज मंजुळे हे २१व्या शतकातील सत्यजित राय आहेत. अस्सल आणि वास्तववादी समाजचित्रण तर ते करतातच, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ते सामाजिक संदेश देऊन जातात.
-मंदार जोशी