बहुरंगी आणि बहुढंगी अशा मिष्कील व्यक्तिमत्त्वाच्या मोतीराम गजानन रांगणेकर उर्फ मो.ग.रांगणेकर यांची १९२४ साली संपादक या नात्याने कारकीर्द सुरू झाली. वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी एक कवडी नसतानाही स्वत:चे साप्ताहिक काढले. ‘तुतारी’, ‘वसुंधरा’, ‘चित्रा’, ‘आशा’ ही त्यांची गाजलेली साप्ताहिके, त्याचप्रमाणे ‘अरुण’, ‘सत्यकथा’, ‘नाट्यभूमी’ ही त्यांची गाजलेली मासिके होत. संपादक या नात्याने नाना प्रकारचा मजकूर लिहिणे, व्यवस्थापक म्हणून जाहिराती मिळवणे, साप्ताहिकाचा प्रसार करण्यासाठी निरनिराळे मार्ग शोधणे यासाठी त्यांनी अफाट मेहनत घेतली. प्रत्येक अंकात काहीतरी नावीन्यपूर्ण, आकर्षक लेख असावेत यासाठी त्यांची धडपड असे. साप्ताहिकांसाठी बातम्या मिळविण्यासाठी नाटक कंपन्यांमधून फेरफटका मारत असल्याने रांगणेकरांनी झालेल्या ओळखींचा उपयोग करून नाटक कंपनी काढण्याचा विचार पक्का केला आणि ‘नाट्यनिकेतन’ या संस्थेची स्थापना केली. १९४० साली पहिले नाटक लिहिले त्याचे नाव ‘आशीर्वाद’. या नाटकाच्या निर्मितीच्या वेळी केशवराव दाते यांच्याशी मतभेद झाल्याने रांगणेकर नाटककाराबरोबर दिग्दर्शक म्हणूनही मान्यता पावले. ‘आशीर्वाद’, ‘कुलवधू’, ‘नंदनवन’, ‘अलंकार’, ‘माझे घर’, ‘वहिनी’, ‘एक होता म्हातारा’, ‘कोणे एके काळी’, ‘मोहर’ इ. नाटके रांगणेकरांनी लिहिली आणि दिग्दर्शितही केली. याखेरीज ‘भटाला दिली ओसरी’ हे विनोदी नाटक तसेच ‘सीमोल्लंघन’ आणि ‘कलंकशोभा’ या कादंबऱ्याही लिहिल्या. ‘औटघटकेचा राजा’, ‘भक्त प्रल्हाद’ या चित्रपटाची कथा लिहिली. ‘सुवर्णमंदिर’ हा संगीत बोलपट तयार केला. ग्रामोफोन रेकॉर्डस्च्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले. ते उत्तम चित्रकारही होते. चित्रकार हळदणकरांकडे त्यांचे चित्रकलेचे शिक्षण झाले होते. वयाच्या १५-१६ व्या वर्षी त्यांनी चित्ता फाइट म्हणून काढलेले चित्र पूर्वीच्या काड्यापेटीवर येत असे. रांगणेकरांचे बहुरंगी व्यक्तिमत्त्व होते. नाट्यनिकेतन या संस्थेलाही नाट्यक्षेत्रात महत्त्वाचे स्थान निर्माण झाले होते. नट निर्माण करण्याचे एक पीठ अशी नाट्यनिकेतनची ख्याती होती. नाट्यनिकेतनच्या नाटकात काम करून अनेक नटनट्यांनी लौकिक संपादन केला होता. सध्या लोकप्रिय असलेला एकांकिका हा नाट्यप्रकार १९४७ सालीच रांगणेकरांनी नाट्यनिकेतनतर्फे प्रेक्षकांची अभिरुची वाढविण्यासाठी तीन एकांकिका सादर करून केला. १९६८ साली ४९ व्या नाट्यसंमेलनाचे मो. ग. रांगणेकर हे अध्यक्ष होते. ‘संत जनाबाई’ या चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद रांगणेकरांचे होते. १९४७ मध्ये त्यांनी ‘कुबेर’ हा चित्रपट लिहिला तसेच दिग्दर्शितही केला होता.
-मंदार जोशी