चित्र-चरित्र

श्रीनिवास खळे
श्रीनिवास खळे
संगीतकार
३० एप्रिल १९२६ --- २ सप्टेंबर २०११

श्रीनिवास विनायक ख‌ळे हे मराठीतील प्रथितयश संगीतकार होते. त्यांनी आपल्या कर्णमधुर आणि भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांना सहा दशकांहून अधिक काळ मोहिनी घातली होती. हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली आदी भाषांमधील गीतांना खळे यांनी संगीत दिले असले तरी भावगीतांना त्यांनी दिलेले संगीत रसिकांना विशेष भावले. भावगीतांखेरीज‘बोलकी बाहुली’, जिव्हाळा’, ‘पोरकी’, ‘पळसाला पाने तीन’ अशा काही निवडक मराठी चित्रपटांना खळे यांनी संगीत दिले होते. लता मंगेशकर आणि पं. भीमसेन जोशी ह्या दिग्गजांना घेऊन त्यांनी ‘रामश्याम गुणगान’ या अल्बमला संगीत दिले होते.

खळे यांचा जन्म बडोदा येथे झाला. बडोद्यातील सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसूदन जोशी यांच्याकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. कालांतराने अता हुसेन खाँ, निसार हुसेन खाँ आणि फैयाज हुसेन खाँ यांच्यासारख्या दिग्गजांकडून ते शास्त्रीय संगीत शिकले. बडोदा आकाशवाणीत काही काळ त्यांनी संगीतकार म्हणूनही काम केले. त्यानंतर त्यांचे मुंबईत आगमन झाले. मुंबईतच त्यांचा के. दत्ता (दत्ता कोरगावकर) ह्या संगीतकाराशी परिचय झाला. त्यानंतर कोरगावकर यांचे साहाय्यक संगीतकार म्हणून काम करायला खळे यांनी सुरुवात केली. ह्याच काळात काही चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाच्या स्वतंत्र संधी त्यांच्याकडे चालून आल्या, मात्र ते चित्रपट कधीच पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे खळे निराश झाले होते. पण अशा वेळी त्यांच्या पत्नीने त्यांना धीर दिला. खूप कष्ट केल्यानंतर १९५२ साली त्यांचे ‘गोरी गोरी पान’ आणि ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ अशी दोन पहिला अल्बम प्रकाशित झाला. आशा भोसले यांची आवाजातील ही गीते तेव्हा खूप लोकप्रिय झाली. ह्या दोन्ही रचना ग. दि. माडगूळकर ह्यांनी ‘लक्ष्मीपूजन’ ह्या चित्रपटासाठी रचल्या होत्या. पण ऐन वेळी हा चित्रपट मूळ निर्मात्याऐवजी दुसर्‍याच एका निर्मात्याने बनवून त्यात संगीतकार म्हणून खळ्यांना घेतलेच नाही. पण खळ्यांनी लावलेल्या ह्या गीतांच्या चाली गदिमांना इतक्या आवडल्या होत्या की त्यांनी त्यांची एचएमव्हीकडून एक वेगळा अल्बम बनवून घेतला. ह्या दोन्ही गाण्यांनी खळ्यांना खर्‍या अर्थाने प्रसिद्धी दिली आणि मग खळे एक संगीतकार म्हणून मान्यता पावले.

खळे यांनी फारच थोड्या चित्रपटांना संगीत दिले आहे. त्याचे कारण म्हणजे तडजोड करणे त्यांच्या स्वभावात नाही. ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘बोलकी बाहुली’, ‘जिव्हाळा’, ‘पोरकी’, ‘सोबती ’, ‘पळसाला पाने तीन’ अशा काही मोजक्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. ह्या चित्रपटांतील गाजलेली गाणी म्हणजे.. सांग मला रे सांग मला, आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला (बोलकी बाहुली), देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला; लळा जिव्हाळा शब्दच खोटे, प्रिया तुज काय दिसे स्वप्नात, या चिमण्यांनो परत फिरा रे, चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी ही गाणी खूप गाजली.श्रीनिवास खळे यांनी फारशा चित्रपटांना संगीत दिलेले नसले तरी भावगीत-भक्तिगीत हे प्रकार भरपूर हाताळले आहेत. त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जवळजवळ १०० हून जास्त गायक गायिकांनी गाणी गायलेली आहेत. पं. भीमसेन जोशी, सुधीर फडके, वसंतराव देशपांडे, लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माणिक वर्मा, सुलोचना चव्हाण पासून ते हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अरुण दाते, सुधा मल्होत्रा, सुरेश वाडकर, देवकी पंडित, कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन ते अगदी लिटिल चॅम्प आर्या आंबेकर यांच्यापर्यंत कैक नामवंतांनी खळेसाहेबांच्या दिग्दर्शनाखाली गाणी गायलेली आहेत. त्यांची गाजलेली गाणी : ‘भेटी लागी जीवा’, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’, ‘नीज माझ्या नंदलाला’, ‘श्रावणात घननीळा बरसला’, ‘सावळे सुंदर रूप मनोहर’, ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’, ‘बगळ्यांची माळ फुले’, ‘राहिले ओठातल्या ओठात वेडे’, ‘वेगवेगळी फुले उमलली’, ‘लाजून हासणे अन’, ‘शुक्रतारा मंद वारा’. २०१० साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ ह्या नागरी पुरस्काराने सन्मानित केले.

-मंदार जोशीचित्र-चरित्र