चित्र-चरित्र

आनंद मोडक
आनंद मोडक
संगीतकार
१३ मे १९५१ --- २३ मे २०१४

चित्रपट, नाटक, नृत्यनाटिका, सांगीतिका, मालिका अशा प्रांतात संगीतकार महणून मुशाफिरी करणारे आनंद मोडक यांची प्रयोगशील संगीतकार म्हणून संगीतसृष्टीत ओळख आहे. आनंद मोडक यांचा जन्म त्यांच्या मूळ गावी म्हणजे अकोल्याला झाला. वडील पी.डब्ल्यू.डी.मध्ये नोकरी करत होते. आई कुंदा मोडक यांच्याकडून लाभलेला संगीताचा वारसा आणि शकुंतला पळसेकर यांच्याकडे वर्षभर घेतलेले संगीतशिक्षण यामुळे आनंद यांची संगीत विषयाची गोडी वाढली. तेव्हाच्या शासकीय बहुउद्देशीय उच्च-माध्यमिक मुलांच्या शाळेमध्ये शिक्षण घेताना वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये गाणे गाण्यासाठी आणि नाटकांमध्ये त्यांचा आवर्जून सहभाग असे. ‘रेडिओ सिलोन’ हा त्यांची संगीतातील अभिरुची वाढवणारा मित्र होता.

१९७२पर्यंत आनंद मोडक यांचा मुक्काम अकोल्यात होता. त्यानंतर शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने ते पुण्यात स्थायिक झाले. याच काळात त्यांचा संगीताशी आणि निरनिराळ्या विषयांशी संबंध आला. संगीत विषयाची गोडी, वाचनाची आवड आणि कोणत्याही विषयाचा मागोवा घेण्याची वृत्ती यातूनच त्यांचा अभिरुचीसंपन्न प्रवास सुरू झाला. साहजिकच समविचारी कलाकारांबरोबर काहीतरी नवे करण्याच्या ऊर्मीतून ‘थिएटर ऍकॅडमी’ या नाट्यसंस्थेचा जन्म झाला. यापूर्वी ‘घाशीराम कोतवाल’या विजय तेंडुलकर लिखित नाटकात केलेल्या भूमिकेमुळे त्यांचा रंगमंचाशी जवळून परिचय झाला. या नाटकाच्या दौर्‍यामुळे अमेरिका, कॅनडा, हंगेरी, जर्मनी असा परदेशप्रवास त्यांना करता आला. १९७४ साली थिएटर ऍकॅडमीने सतीश आळेकर लिखित ‘महानिर्वाण’ नाटक बसवले. त्या सुमाराला भास्कर चंदावरकर जर्मनीला गेल्यामुळे एक ‘संधी’ म्हणून आनंद मोडक यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी आनंदाने स्वीकारली आणि संगीतकार म्हणून नाट्यक्षेत्रातील त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यानंतर ‘महापूर’ (१९७५), ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ (१९७८), ‘चाफा बोलेना’ (१९९२), ‘वाडा चिरेबंदी’, ‘युगांत’ (१९९३), ‘आंदोलन’ (२००७), ‘कोंडी’ (२०१२) अशा ऐतिहासिक, सामाजिक, कौटुंबिक नाटकांना त्यांनी पार्श्‍वसंगीत दिले. काही काळ भास्कर चंदावरकर यांचे साहाय्यक म्हणूनही मोडक यांनी काम केले. १९७६ पासून आकाशवाणी केंद्राशी आणि मुंबई दूरदर्शनशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. आकाशवाणीचे मान्यताप्राप्त संगीतकार म्हणून मोडक यांना ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. १९७६ साली ‘बदकाचे गुपित’ या बा. सी. मर्ढेकरांच्या ऑपेराला लोकप्रियता लाभली.

‘नक्षत्राचे देणे’ या आरती प्रभूंच्या कवितांवर आधारित कार्यक्रमासाठी संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे साहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. पु.ल. देशपांडे यांच्या ‘तीन पैशाचा तमाशा’ या नाटकातील गाण्यांना आनंद मोडक यांनी उपशास्त्रीय संगीत, लोकसंगीत, भावसंगीत, नाट्यसंगीत आणि पॉप संगीत यांचा औचित्यपूर्ण वापर करून चौफेर कामगिरी केली. ‘विठ्ठला’ (१९८५), ‘तुमचे आमचे गाणे’ (१९८५), ‘अफलातून’ (१९८५), ‘संगीत म्युनिसिपालटी’ (१९८७), अशा व्यावसायिक रंगभूमीवरील नाटकांना, तसेच ‘पडघम’(१९८५), ‘अलिबाबाची हीच गुहा’ (१९८९) या प्रायोगिक रंगभूमीवरील नाटकांनाही पार्श्‍वसंगीत दिले. आनंद मोडक यांनी ‘शब्दवेध’ या संस्थेच्या काही प्रकल्पांतर्गत जुन्या-नव्या काव्यरचनांवर आधारित ‘अमृतगाथा’, ‘प्रीतरंग’, ‘साजणवेळा’, ‘शेवंतीचं बन’, ‘आख्यान तुकोबाराय’ यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यात रसिकांना उत्तमोत्तम स्वररचना ऐकायला मिळाल्या. शास्त्रीय संगीत, लोकसंगतीचा बाज लीलया आपल्या संगीतरचनांमध्ये साकारणारे मोडक यांनी अभिजात संगीताप्रमाणे मराठी पॉप संगीताची ओळख करून दिली. नंदू भेंडे यांच्याबरोबर ‘तुमच्या आयुष्यात प्रेम येत’ ही पॉप मराठी गीतं आजही स्मरणात आहे.

संगीतसृष्टीमध्ये ४० वर्षांच्या कारकिर्दीत आनंद मोडक यांनी ५० चित्रपटांना संगीत दिले आहे. १९७९ साली प्रदर्शित झालेला चापेकर बंधूंच्या जीवनावरील ‘२२ जून १८९७’ हा चित्रपट आनंद मोडक यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट. त्यानंतर ‘नशीबवान’ (१९८८), ‘कळत नकळत’ (१९८९), ‘चौकट राजा’ (१९९१), ‘एक होता विदूषक’ (१९९२), ‘मुक्ता’ (१९९४), ‘आई’ (१९९५), ‘तू तिथं मी’ (१९९६), ‘सरकारनामा’ (१९९७), ‘थांग’ (२००६), ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ (२००८), ‘धूसर’ (२०१०), ‘म्हैस’ (२०१३), ‘यशवंतराव चव्हाण-बखर एका वादळाची’ (2014), ‘रमा माधव’ (2014), ‘एलिझाबेथ एकादशी’ (2014) अशा निरनिराळ्या विषयांवरील चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.

चित्रपटांना संगीत देताना चित्रपटांच्या मागणीनुसार लावणी, अंगाई, नृत्यगीत, प्रेमगीत, भक्तिगीत अशा गीतप्रकारांना संगीत देताना आनंद मोडक यांच्या शैलीचा ठसा दिसून येतो. मराठीशिवाय त्यांनी ‘दिशा’ (१९९०), ‘संवाद’ (१९९१), ‘जिंदगी झिंदाबाद’ (१९९७) या हिंदी चित्रपटांना आणि अमोल पालेकरांच्या ‘क्वेस्ट’ (२००६) या इंग्रजी चित्रपटालाही संगीत दिले आहे.

साहित्यावरही विशेष प्रेम असलेल्या आनंद मोडक यांना त्यांच्या प्रदीर्घ संगीतप्रवासामध्ये अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून ‘कळत नकळत’, ‘मुक्ता’, ‘दोघी’, ‘रावसाहेब’, ‘राजू’, ‘धूसर’ या चित्रपटांना राज्यशासनाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘मुक्ता’, ‘सरकारनामा’, ‘तू तिथं मी’ या चित्रपटांसाठी संगीतकार म्हणून त्यांना ‘फिल्मफेअर पुरस्काराने’ सन्मानित केले. ‘राजू’ या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनासाठी ‘म.टा. सन्मान’, आणि ‘अल्फा झी गौरव पुरस्कार’ प्राप्त झाला. आनंद मोडक यांनी नाटक, चित्रपट, नृत्यनाटिकांप्रमाणे मराठी आणि हिंदी दूरदर्शन मालिकांसाठीही संगीत दिग्दर्शन केले.

- नेहा वैशंपायनचित्र-चरित्र