रवी जाधव यांची पहिल्या टप्प्यामधील कारकीर्द ही जाहिरात क्षेत्रामधील होती. ‘नटरंग’ या २०१० मधील चित्रपटाद्वारे ते चित्रपट दिग्दर्शनाकडे वळले. या चित्रपटाला मोठे व्यावसायिक यश मिळाले. तसेच त्यावर राष्ट्रीय पुरस्कारांसह इतर पुरस्कारांचाही वर्षाव झाला. त्यानंतर गेल्या दशकभरात रवी जाधव यांची गाडी सुसाट धावत आहे. या कालावधीत त्यांनी ‘बालगंधर्व’, ‘बालक पालक’, ‘टाईमपास’, ‘टाईमपास २’, ‘बायोस्कोप’, ‘न्यूड’ यासारख्या वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट दिग्दर्शित केले. ‘बालक पालक’ हा चित्रपट पौगंडावस्थेतील मुलांवर आधारला होता. ‘टाईमपास’ या चित्रपटात प्रेमकहाणी हाताळण्यात आली होती. जाधव यांच्या बहुतेक सर्व चित्रपटांचा विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरव झाला आहे. चित्रपट निर्मितीबरोबर श्री. जाधव यांनी ‘रेगे’, ‘कॉफी आणि बरंच काही’ हे चित्रपट प्रेझेंट केले आहेत.
-मंदार जोशी