चित्र-चरित्र

विष्णूपंत दामले
विष्णूपंत दामले
कलादिग्दर्शक, ध्वनिमुद्रक, निर्माता, दिग्दर्शक
१४ ऑक्टोबर १८९२ --- ५ जुलै १९४५

विष्णू गोविंद दामले यांचा जन्म पेण येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यामुळे दामले यांना फारसे शिक्षणही घेता आले नाही. परंतु त्यांना जन्मजातच असलेल्या चित्रकलेच्या आवडीमुळे त्यांच्या वडिलांनी दामले यांना चित्रकलेचे शिक्षण द्यायचे ठरवले. चित्रकलेच्या विषयांत हातखंडा असलेले विष्णुपंत दामले त्या परिक्षेत नापास झाले, तेव्हा वडिलांनी बाबूराव पेंटर आणि आनंदराव पेंटर यांच्या हाताखाली चित्रकलेचे धडे गिरवण्यासाठी दामले यांना कोल्हापूरला पाठवले. त्या वेळेस पेंटर बंधू नाटकाचे पडदे रंगवत आणि दामले त्यांना मदत करत.

पुढे बाबूरावांनी कोल्हापुरात महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली, त्या प्रसंगी दामले महाराष्ट्र फिल्म कंपनीत मदतनीस म्हणून दाखल झाले. तेथे त्यांनी फत्तेलाल यांच्याबरोबरीने बाबूराव पेंटरांच्या १९ चित्रपटांचे छायाचित्रण पार पाडले. त्याच वेळेस १९१९ ते १९२९ या काळात बाबूरावांनी दामले आणि फत्तेलाल यांना स्वतंत्रपणे दिग्दर्शन करण्याची संधी दिली. त्या चित्रपटाचे नाव होते ‘महारथी कर्ण’ (१९२८). हा मूकपट होता. सर्व भारतभर त्याची प्रशंसा झाली आणि हॉलिवूडच्या ‘बेन हर’ या चित्रपटाबरोबर त्याची तुलना केली गेली. या चित्रपटाच्या दिग्दर्शनामुळे दामले यांचा आत्मविश्‍वास वाढला आणि ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’त काही भवितव्य नाही, हे जाणून दामलेंनी फत्तेलाल यांच्यासोबत फिल्म कंपनी काढायचे ठरवले. तेव्हा कोल्हापुरातील एक सराफ सीतारामपंत कुलकर्णी यांनी त्यासाठी भांडवल द्यायचे कबूल केले. १ जून १९२९ रोजी दामले, फत्तेलाल, शांतारामबापू आणि केशवराव धायबर यांनी एकत्रितपणे ‘प्रभात फिल्म कंपनी’ची स्थापना केली. तेव्हा शांताराम दिग्दर्शन व संकलन यांची, तर दामले व फत्तेलाल अन्य जबाबदार्‍या पार पाडत. ‘प्रभात’चे पहिले सहा मूकपट आणि काही बोलपट कोल्हापुरातच तयार झाले. दामले यांनीच ‘अयोध्येचा राजा’ या ‘प्रभात’च्या पहिल्या बोलपटाचे ध्वनिमुद्रण पार पाडले. प्रभात १९३३ मध्ये पुण्यात स्थलांतरित झाली. दामले यांनी पुण्यातला स्टुडिओ उभारण्याचे काम केले.

दामले आणि फत्तेलाल यांनी मिळून १९३६ मध्ये ‘संत तुकाराम’ हा बोलपट दिग्दर्शित केला. सर्व भारतभर हा बोलपट झळकला व या बोलपटाने नाव कमावले. हा बोलपट मराठी भाषेत असला तरी भाषेची अडचण कुठेही न येता भारतातील सर्वभाषिक प्रेक्षकांनी त्याला उत्तम दाद दिली. ‘संत तुकाराम’नंतर दामले-फत्तेलाल यांनी ‘संत ज्ञानेश्वर’ (१९४०), ‘गोपाळकृष्ण’ (१९४०) आणि ‘संत सखू’ (१९४१) असे चित्रपट दिग्दर्शित केले. ‘संत तुकाराम’ हा चित्रपट व्हेनिस फिल्म फेस्टिवलला पाठवला होता. त्या प्रसंगी तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असा त्याचा सन्मान झाला. ‘संत ज्ञानेश्वर’ला इंग्लिश भाषेतील उपशीर्षक टाकून न्यूयॉर्कमध्ये त्याचे प्रदर्शन करण्यात आले. फ्रॅन्क काप्रासारख्या दिग्गज दिग्दर्शकाने त्या चित्रपटाचे तोंड भरून कौतुक केले.

शांतारामबापू ‘प्रभात’ सोडून बाहेर पडले, त्या प्रसंगी दामले आणि शेख फत्तेलाल हे ‘प्रभात’चे स्थान टिकवण्यासाठी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी राजा नेने यांना दिग्दर्शनाची संधी देऊन ‘दहा वाजता’ ह हलकाफुलका चित्रपट निर्माण केला. त्यानंतर दामले यांची प्रकृती खालावत गेली. तथापि तशाही परिस्थितीत त्यांनी ‘रामशास्त्री’ या भव्य आणि दिव्य चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवून राजा नेने यांच्यावर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी टाकली. राजा नेने यांच्याकडून ‘रामशास्त्री’चे दिग्दर्शन ठरावीक वेळेत पुरे होणार नाही, हे ध्यानात येताच दामले आणि फत्तेलाल यांनी राजा नेने यांच्याबरोबर विश्राम बेडेकरांवर हा चित्रपट पूर्ण करण्याची जबाबदारी दिली. विश्राम बेडेकरांनी ‘रामशास्त्री’ राजा नेनेंच्या साथीत पूर्ण केला. ‘रामशास्त्री’चे चित्रीकरण चालू असतानाच दामले यांची प्रकृती फारच खालावत गेली, पण अशा परिस्थितीत ‘रामशास्त्री’च्या निर्मितीत त्यांनी लक्ष ठेवले. वयाच्या ५२व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि ‘प्रभात’चा आधारस्तंभ हरपला.

- द. भा. सामंत
(मजकूर लेखन सौजन्य : विवेक मासिक, आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण, शिल्पकार चरित्रकोश)चित्र-चरित्र