चित्र-चरित्र

ना. सी. फडके
ना. सी. फडके
लेखक, पटकथाकार
४ ऑगस्ट १८९४ --- २२ ऑक्टोबर १९७८

साहित्यिक म्हणून ना. सी. फडके महाराष्ट्रात लोकमान्य झाले, पण चित्रपटकथा लेखनाच्या प्रांतात त्यांच्या हातून खास नावाजण्यासारखी कृती झाली नाही, ही गोष्ट आश्चर्य वाटण्यासारखी आहे.

छाया’या बोलपटाने खांडेकरांना तर ‘धर्मवीर’या बोलपटाने अत्रे यांना लोकपियता मिळवून दिली. ते दोघेही पुढे पटकथाकार म्हणून गाजले. त्यांचे समकालीन असणारे ना. सी. फडके मात्र चित्रपटाच्या जगतात यशस्वी ठरू शकले नाहीत. तसे म्हटले तर फडके यांचा चित्रपटाशी संबंध अत्रे-खांडेकरांच्या अगोदरचा. फडके कोल्हापुरास १९२६ साली आले. त्यावेळेस ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ जोमात होती. फडके यांनी सर्वप्रथम बाबुराव पेंटर यांच्याशी परिचय करून घेतला. ‘सिंहगड’या बाबुरावांच्या चित्रपटाच्या पब्लिसिटीचे काम त्यांनीच केले होते, पण ते त्यांनी बाबुराव पेंढारकरांच्या आग्रहास्तव केले होते. पुढे बाबुराव पेंटरांशी परिचय झाल्यावर त्यांच्या स्नेहापायी फडके ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’च्या मूकपटांच्या टायटल्स लिहीत, त्यांच्या या टायटल्सची विशेष वाहवा होत असे. १९३१ साली चित्रपट बोलका झाला आणि अनेक साहित्यिक चित्रपट माध्यमाकडे आकृष्ट झाले. फडके यांनी हॉलिवूडच्या पामर इन्स्टिट्यूट या संस्थेचा चित्रपटविषयक शिक्षणक्रम पूर्ण करून डिप्लोमा मिळवला. त्याच सुमारास मुंबईचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक नारायणराव देव्हारे हे त्यांच्याकडे चित्रपटासाठी पटकथा लिहिण्याचा प्रस्ताव घेऊन आले. ‘संत तुलसीदास’या विषयावर देव्हारे यांचा चित्रपट निघणार होता. संत तुलसीदासचे कथानक रचणे हा फडके यांच्या लेखणीचा बाज नव्हता. पण केवळ अनुभव घेण्यासाठी त्यांनी काम हाती घेतले. तशात देव्हारे त्यांचे स्नेहीही होते.

हे काम स्वीकारताना त्यांनी आर्थिक फायद्याचा हेतू मनाशी धरला नव्हता, तरी पर्यायाने होणाऱ्या दुसऱ्या एका फायद्याची आशा त्यांनी मनाशी ठेवली होती. बोलक्या चित्रपटांचे युग नुकतेच सुरू झाले होते. पूर्वी चित्रपटात भाषेचा काही संबंध नसे, पण आता ती चित्रपटाचे प्रमुख अंग बनली होती. त्यामुळे चित्रपटकलेच्या वैशिष्ट्याचा नीट अभ्यास करण्याची संधी व अनुभव घ्यावा हा त्यांचा उद्देश होता. मर्यादित भांडवलावर उभी राहिलेली देव्हाऱ्याची संस्था चित्रपटाच्या दर्जापेक्षा कोणत्या युत्तऱ्यांनी सामान्य प्रेक्षकांना चित्रपट आवडेल यांचा विचार करीत होती. त्यामुळे कथानकाची मांडणी वारंवार बदलण्यासाठी देव्हारे फडक्यांच्या पाठीशी लागत. या प्रकाराला वैतागून त्यांनी देव्हाऱ्याना सांगितले, ‘तुम्ही जाणे आणि तुमचे कथानक जाणे! माझे नावदेखील चित्रपटावर घालू नका.’ यापैकी शेवटची गोष्ट देव्हाऱ्यांनी मानली नाही. फडके अनुभव घ्यायला गेले एक आणि मिळाला निराळाच! मिस मेयोच्या ‘मदर इंडिया’या पुस्तकामुळे जगभर भारताची आणि विशेषत: भारतीय स्त्रियांची बदनामी झाली होती. त्याला उत्तर म्हणून झांशीची राणी लक्ष्मीबाई हिच्यावर एक इंग्रजी चित्रपट हॉलीवूडच्या चित्रपट कंपनीकडून काढून घ्यावा असे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या राणीसाहेब चिमणाबाई यांच्या मनात आले. त्यांनी फडक्यांना बोलावून घेतले आणि चित्रपटासाठी कथानक लिहिण्यास सांगितले. ह्या कामातून काही तरी विशेष चांगले घडेल या विचाराने फडके यांनी हे काम स्वीकारले. तीन महिन्यांत इंग्रजीत पटकथा लिहून दिली. राणीसाहेबांना ती आवडली. त्यांनी ही पटकथा ‘रेन्स केम’ह्या कादंबरीचे नावाजलेले लेखक लुई ब्रॉमफिल्ड यांना वाचावयास दिली. त्यांनीही चित्रपटकथेची अतिशय प्रशंसा केली. पुढे राणीसाहेब युरोप-अमेरिकेच्या सफारीवर गेल्या व चार महिन्यांनी परत आल्यावर त्यांनी फडक्यांना सांगितले, ‘चित्रपट काढायचा म्हणजे पैसे फार लागतात. इतके पैसे कोठून आणायचे?’ पटकथा लेखनाचा मेहनताना म्हणून त्यांनी फडक्यांना तीन हजारांचा चेक दिला.

१९३६ साली क्वेट्टा येथे मोठा भूकंप झाला होता. त्या दुर्दैवी घटनेचा संदर्भ घेऊन फडक्यांनी ‘काश्मिरी गुलाब’ ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी सागर मुव्हीटोनचे मालक चिमणभाई देसाई यांच्या मनात भरली. बाबुराव पटेलांमार्फत त्यांनी फडक्यांना बोलावून घेतले. करारपत्र होऊन मोबदल्याच्या तीन हजारांपैकी पाचशे रुपये रोख फडक्यांना दिले. मराठी लेखकाला पूर्वी कधी कुणाला दिला नव्हता एवढा मोबदला देऊन त्याचे कथानक पडद्यावर आणावे ही गोष्ट कंपनीतल्या सल्लागार मंडळींना शल्यासारखी बोचत होती. त्यांनी चित्रपट गारद केला. सल्लागारांची मसलत न ऐकण्याचा कणखरपणा चिमणभार्इंच्या अंगी नव्हता. त्यामुळे ‘काश्मिरी गुलाब’ पडद्यावर फुललाच नाही.

‘माणूस’ चित्रपट गाजला. त्यानंतर शांतारामबापू खुद्द फडक्यांना भेटले व त्यांच्याकडे त्यांनी कथेची मागणी केली. पुढे शांतारामबापू आणि फडके यांच्या बैठका होऊन कथेची मूळ कल्पना नक्की करण्यात आली. मुंबई ते गोवा बसने प्रवास करत असलेल्या पण वेगवेगळ्या भाषा असलेल्या प्रवाशांच्या मनुष्यस्वभावाचे निरनिराळ्या पैलूंचे होणारे दर्शन या कथेमध्ये मजेदार पद्धतीने रंगविले होते. शांतारामबापू कथेवर बेहद्द खूश झाले. त्यांनी तात्काळ बावीस हजार रुपयांच्या दोन मोटारी विकत घेतल्या आणि शूटिंगच्या सोयीसाठी त्यामधे बदल करून शूटिंगसाठी तयार ठेवल्या. दरम्यान शांतारामबापू प्रभात कंपनीबाहेर पडले, पण फडक्यांच्या कथेचे हक्क मात्र त्यांनी स्वत:कडेच ठेवले. पुढे हा चित्रपट ‘जीवनयात्रा’ह्या नावाने ‘राजकमल’च्या बॅनरखाली निघाला. कथानक उपरोधात्मक असल्यामुळे दिग्दर्शनाची सूत्रे शांतारामबापूंनी मास्टर विनायक यांच्या हातात ठेवली. चित्रपटाची भट्टी फारशी जमली नव्हती. त्यावेळी इंग्रज सरकारच्या वृत्तचित्र निर्मितीचे प्रमुख सल्लागार व संयोजक म्हणून शांतारामबापू काम पाहत असत. भारतातील स्वातंत्र्य चळवळ थांबविण्यासाठी ‘क्रिप्स मिशन’भारतात येणार होते. क्रिप्स यांच्या भेटीवर शांतारामबापू एक वार्तापट तयार करणार होते. पटकथेच्या लेखनासाठी व बोलण्यासाठी त्यांनी फडके यांना बोलावून घेतले. वार्तापटासाठी लिहिणे आणि बोलणे ही फडक्यांची कसोटी ठरणार होती. हा वार्तापट इंग्लंड, अमेरिकेतही दाखविला जाणार होता. अतिशय चतुराईने फडक्यांनी पटकथा लेखन केले. ‘ए गॅलंट एफर्ट’या नावाने हा वार्तापट प्रदर्शित झाला. परदेशातही ह्या वार्तापटाचे मोठे कौतुक झाले. मात्र पुढल्या काळात फडक्यांनी चित्रपट लेखनासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यांच्या ‘कलंक शोभा’या कादंबरीवर १९६१ सालात त्याच नावाचा मराठी चित्रपट निघाला. मात्र मूळ कादंबरी लेखनाखेरीज फडक्यांचा त्या चित्रपटाशी काहीही संबंध नव्हता. साहित्यिक म्हणून ना. सी. फडके महाराष्ट्रात लोकमान्य झाले, पण चित्रपटकथा लेखनाच्या प्रांतात त्यांच्या हातून खास नावाजण्यासारखी कृती झाली नाही, ही गोष्ट आश्चर्य वाटण्यासारखी आहे.

संदर्भ - चंदेरी स्मृतिचित्रे



चित्र-चरित्र