चित्र-चरित्र

अरुण साधू
अरुण साधू
पत्रकार, साहित्यिक
१७ जून १९४१ --- २५ सप्टेंबर २०१७

पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू. मराठी साहित्य विश्वात राजकीय कादंब-या फारशा नसताना अरुण साधू यांनी आपल्या कादंब-यांमधून राजकीय विषय अत्यंत कुशलतेने हाताळले. ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सुमारे ३० वर्षे पत्रकारितेत काम केल्यानंतर साधू यांनी कुठच्याही वृत्तपत्रात नोकरी न करता मुक्त लेखन आणि मुक्त पत्रकारितेलाच वाहून घेतले. ‘केसरी’, ‘माणूस’, ‘इंडियन एक्स्प्रेस’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘फ्री प्रेस जर्नल’ अशी विविध वृत्तपत्रे व साप्ताहिकांतून पत्रकारिता केली होती. 
‘सिंहासन’, ‘झिपऱ्या’, ‘मुंबई दिनांक’ अशा एकाहून एक सरस कलाकृतींनी मराठी साहित्यविश्वात स्वत:चे अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि पत्रकार अरुण साधू होते . त्यांच्या ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या दोन कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वात प्रचंड लोकप्रिय ठरल्या. यावर आधारित ‘सिंहासन’ हा चित्रपटही अजराअमर ठरला.
या सिनेमातील ‘दिगू टिपणीस’ हे अभिनेते निळू फुले यांनी साकारलेले पात्र अरूण साधू यांच्यावरच बेतलेले होते, अशीही चर्चा त्यावेळी झाली. ‘सिंहासन’ या सिनेमात अरूण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले, मधुकर तोरडमल, मोहन आगाशे, दत्ता भट, सतीष दुभाषी, रिमा लागू, लालन सारंग, जयराम हर्डीकर, नाना पाटेकर या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या. मराठी सिनेसृष्टीतला ‘मास्टरपीस’ म्हणून या सिनेमाकडे आजही पाहिले जाते. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांवर साधू यांची पकड होती. अरुण साधू यांचे ‘एक माणूस उडतो त्याची गोष्ट’, ‘कथा युगभानाची’, ‘बिनपावसाचा दिवस’ हे त्यांचे कथासंग्रही गाजले. ‘पडघम’ या नाटकाचेही लिखाण त्यांनी केले. ‘अक्षांश रेखांश’, ‘तिसरी क्रांती’, ‘सभापर्व’ यांसारखे त्यांचे ललित लेखनही वाचकांनी डोक्यावर घेतले. १९९५ ते २००१ पर्यंत त्यांनी पुणे वृत्तपत्रविद्या विभागात विभागप्रमुख म्हणूनही काम केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान व अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
मंदार जोशीचित्र-चरित्र