चित्र-चरित्र

वसंत कानेटकर
वसंत कानेटकर
नाट्यलेखक
२० मार्च १९२० --- ३१ जानेवारी २०००

कानेटकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर ह्या गावी.`रविकिरण मंडळा'तील एक कवी गिरीश (शं. के. कानेटकर) ह्यांचे ते पुत्र होते. फलटण, पुणे आणि सांगली येथे शिक्षण. एम्‌. ए. झाल्यानंतर १९४६ पासून नाशिकच्या `हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालया`त मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काही काळ काम केले. कानेटकर यांनी सुरुवातीच्या काळात कथा-कादंबऱ्या लिहिल्या. त्यानंतर नाटकाकडे वळले. घर (१९५१), पंख (१९५३) आणि पोरका (१९५६) या त्यांच्या कादंबऱ्यांतही विषयवैचित्र्य,नाट्यात्मता, तंत्रात्मक सफाई, संवादचातुर्य व सूक्ष्म मानसचित्रण या गुणांचा आढळ होतो. या गुणांचाच विकास पुढे त्यांच्या वेगवान नाट्यनिर्मितीत घडून आला व आज नाटककार म्हणूनच ते विशेष प्रसिद्ध आहेत. वेड्याचं घर उन्हांत (१९५७) हे त्यांचे पहिले नाटक त्यानंतर त्यांनी एकूण १४ नाटके लिहिली. त्यांपैकी प्रेमा, तुझा रंग कसा? (१९६१), रायगडाला जेव्हा जाग येते (१९६१), मत्स्यगंधा (१९६४), अश्रूंची झाली फुले (१९६६), लेकुरे उदंड जाली (१९६६), मला काही सांगायचंय! (१९७०) आणि हिमालयाची सावली (१९७२) ही विशेष उल्लेखनीय नाटके होत. व्यासांचा कायाकल्प (१९६७)आणि मद्राशीने केला मराठी भ्रतार (१९६९) हे त्यांचे एकांकिका संग्रह. वेड्याचं घर उन्हात या नाटकास `महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवा'त लेखनाचे पारितोषिक मिळाले (१९५८). रायगडाला जेव्हा जाग येते ह्या नाटकास `संगीत नाट्य अकादमी' चे पारितोषिक मिळाले (१९६४). व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘इये मराठीचिये नगरी’ या चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद आणि गीते कानेटकर यांनी लिहिली होती.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र