मधुकर गोपाळ पाठक हे मूळचे आटपाडीचे. त्यांचे वडील आटपाडीच्या शाळेत शिक्षक होते. पाठकमास्तर म्हणून ते प्रसिद्ध होते. शिवाय औंधच्या राजपुत्रांना ते शिकवायलाही जात.
आटपाडीच्या व औंधच्या शाळेत मधू यांचे शिक्षण झाले. पुढे बी.एस्सी. करण्यासाठी ते पुण्याला आले. पुण्यात विद्यार्थ्यांसाठी ‘पंताचा गोट’ म्हणून औंधच्या संस्थानिकांची जागा होती, तेथे मधू राहायला लागले. ते स.प. महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. ‘पंताच्या गोटा’तील त्यांच्या खोलीत व्यंकटेश माडगूळकरही लवकरच राहायला आले. त्यामुळे अधूनमधून ग.दि. माडगूळकरही तेथे मुक्कामाला येत. दहा बाय दहाच्या त्या खोलीत पु.ल. देशपांडे, राम गबाले, सुधीर फडके, यशवंत पेठकर, बाळासाहेब पाठक, वामनराव कुलकर्णी, विष्णुपंत चव्हाण अशी चित्रपट क्षेत्रातील मंडळी जमत. तासन् तास त्यांची बैठक रंगे.
राम गबाले ‘मधू’ यांना ‘बाबा’ असे संबोधत आणि लवकरच ग. दि. माडगूळकरांसह सारे जण त्यांना ‘बाबा’ असे म्हणू लागले. तेथे येणारी ‘सत्यकथा’, ‘अभिरुची’ व ‘वसंत’ यासारखी मासिके वाचून व होणार्या साहित्यिक गप्पा ऐकून बाबांनाही साहित्यात गोडी वाटू लागली. एक दिवस त्यांनी ‘काकाचा हिर्या’ नावाची कथा ‘अभिरुची’ मासिकासाठी पाठवली आणि साहित्यिक म.गो. पाठक या लेखकाचा जन्म झाला.
बी. एस्सी.चा निकाल लागताच बाबांनी खडकीच्या ऍम्युनिशन फॅक्टरीत नोकरीसाठी अर्ज केला. त्याचे उत्तर आले नाही, पण नोकरीत रमेल असे बाबांचे मन नव्हते. ते अण्णा माडगूळकरांच्या मागेमागे धावत होते. साहित्य वा चित्रपट क्षेत्रात काहीतरी करावे, असे सारखे वाटत होते. माडगूळकरांचे ते १० वर्षे सहकारी होते.
बाबांवर ग. दि. माडगूळकरांमधल्या ‘साहित्यिका’ची छाप होती. माडगूळकर पटकथा-संवाद लिहीत, त्या वेळी त्यांचे साहाय्यक म्हणून बाबा कायम त्यांच्यासोबत असत. बाबांनी ‘झुंज’, ‘माणसाच्या मागावर’, ‘लागीर’, ‘अवलिया विजांची साखळी’ आणि ‘दिव्यांची आरास’ हे कथासंग्रह लिहिले. ते खूप गाजले. ‘बाबूरावांचे’ या नावाचा निवडक कथांचा संग्रह आहे. ‘गदिमांच्या सहवासात’ हे व्यक्तिचरित्रात्मक पुस्तक, तर ‘राजपुत्र’ व ‘लक्ष्मीबाई भ्रतार वासुदेव’ या कादंबर्या त्यांनी लिहिल्या. कथालेखक म्हणून नावलौकिक मिळविण्याची संधी असतानाही बाबांनी चित्रपटलेखन व दिग्दर्शन याकडेच आपला मोहरा वळवला. ग.दि. माडगूळकरांसारख्या सिद्धहस्त लेखकाचा त्यांना लाभलेला सहवासच या गोष्टीला कारणीभूत झाला!
बाबांनी ‘प्रपंच’, ‘नंदिनी’, ‘संत निवृत्ती ज्ञानदेव’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ‘संथ वाहते कृष्णामाई’, ‘मुक्काम पोस्ट ढेबेवाडी’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का?’ व ‘वारसा लक्ष्मीचा’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘गरिबाघरची लेक’, ‘जावई माझा भला’, ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘सखू आली पंढरपुरा’, ‘अशी ही सातार्याची तर्हा’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का?’ या चित्रपटांचे पटकथा-संवाद बाबांनीच लिहिले आहे. एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या बी.ए.च्या मराठीच्या अभ्यासक्रमात ‘लक्ष्मीबाई भ्रतार वासुदेव’ या त्यांच्या कादंबरीच्या काही भागाचा समावेश केला होता.
‘गदिमांच्या सहवासात’ या पुस्तकाला महाराष्ट्राला राज्य सरकारचा उत्तम साहित्याचा पुरस्कार मिळाला आहे. ‘गरिबाघरची लेक’ या चित्रपटाला उत्कृष्ट संवादाचे राज्य सरकारचे पारितोषिक मिळाले. ‘प्रपंच’ व ‘संथ वाहते कृष्णामाई’ या बाबांच्या चित्रपटांना राष्ट्रपती पारितोषिकांनी गौरवण्यात आले. ‘प्रपंच’ हा चित्रपट तर ‘व्हॅकूंव्हर चित्रपट महोत्सवा’त ‘बेस्ट रूरल ङ्गिल्म’ म्हणून गौरवण्यात आला. शिवाय ४५ भाषांत हा चित्रपट तयार केला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘दो चोर’, ‘इमान’, ‘नालायक’ या चित्रपटाची पटकथा, संवाद व सहदिग्दर्शनही त्यांनी केले.
‘संत निवृत्ती ज्ञानदेव’ला फिल्मफेअर ऍवॉर्ड मिळालेच, त्याशिवाय राष्ट्रीय पुरस्कारही लाभला. बाबा पाठक हे ग. दि. माडगूळकर पुरस्कार, दिग्दर्शनासाठी महाराष्ट्र राज्य सरकारचे सात पुरस्कार व व्ही. शांताराम पुरस्कार यांनी सन्मानित झाले होते.
बाबांनी आदिवासी मुलीच्या जीवनावर ‘कौशी’ नावाची कथा लिहिली होती. ती अप्रकाशित होती. पण त्यांच्या मृत्यूमुळे त्यावर चित्रपट काढायची त्यांची उत्कट इच्छा अपुरी राहिली आहे.
- मधू पोतदार