चित्र-चरित्र

सुधीर मोघे
सुधीर मोघे
संगीतकार
८ फेब्रुवारी १९३९ --- १५ मार्च २०१४

जन्म ८ फेब्रुवारी १९३९ रोजी सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे.

शब्दांचे जादूगार, अंधारावर ममत्वाचा अधिकार गाजवणारे आणि कवितेला "सखी' म्हणून आपल्या अस्तित्वातच सामावून घेणारे कवी म्हणजे मा.सुधीर मोघे. खरे म्हणजे ते एक कवीच पण आपल्या कवितेची अभिव्यक्ती इतर माध्यमातून करायला देखील मागे राहिले नाहीत आणि म्हणूनच त्यांनी गीतकार, संगीतकार, लेखक, चित्रकार, लघुपट निर्माते, दिग्दर्शक अशा अनेक भूमिकातून आपले कवित्व मांडले. मा.सुधीर मोघे यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कविता लेखनास सुरुवात केली. १९७२ मध्ये ते पुण्यात कायमच्या वास्तव्यास आले. तेव्हा त्यांनी ‘स्वरानंद प्रतिष्ठान’च्या ‘आपली ओळख’ या कार्यक्रमातून निवेदनास सुरुवात केली. स्वरानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून भावगीतांचा कोश तयार करण्याचे काम मा.मोघे यांनी हाती घेतले होते. कोश जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गवर होता. आपल्या निवेदन शैलीतून त्यांनी निवेदनाचा मापदंड उभा केला. दरम्यान, त्यांचे ‘नक्षत्रांचे देणे’ व ‘स्मरणयात्रा’ हे दोन कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाले. प्रत्येक वर्षी किमान एक चित्रपट करावा अशी त्यांची अपेक्षा होती.

चित्रपट गीतलेखन, संगीत दिग्दर्शन, ललित लेखन, पटकथा व संवाद लेखन, रंगमंचीय आविष्कार अशा अनेक प्रांतांत आपला ठसा उमटवला. सहजसुंदर शब्दरचना करणारे कवी-गीतकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे ‘आत्मरंग’, ‘गाण्याची वही’, ‘पक्ष्यांचे ठसे’, ‘लय’, ‘शब्द धून’, ‘स्वतंत्रते भगवती’ असे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांसाठी गीतलेखन केले. तसेच त्यांनी अनेक गाण्यांना संगीतही दिले. दूरदर्शन व आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले. फिटे अंधाराचे जाळे, सांज ये गोकुळी, एकाच या जन्मी जणू, रंगुनी रंगात सा-या, गोमू संगतीनं, आला आला वारा अशी एकापेक्षा एक सरस गीते त्यांनी लिहिली.

साहित्य व संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांनी तब्बल चार वेळा पटकावला होता. नाट्य‌अभिनेते मा.श्रीकांत मोघे हे सुधीर मोघे यांचे थोरले बंधू.
*मा.सुधीर मोघे* यांचे निधन १५ मार्च २०१४ रोजी झाले.

*मा.सुधीर मोघे यांच्या* *कविता संग्रह*:
‘आत्मरंग’, ‘गाण्याची वही’, ‘पक्ष्यांचे ठसे’ - ३ हून अधिक
आवृत्त्या, ‘लय’ - एकाहून अधिक आवृत्त्या, ‘शब्द धून’, ‘स्वतंत्रते भगवती.’
गद्य : ‘अनुबंध’, ‘गाणारी वाट’, ‘निरांकुशाची रोजनिशी.’

*मा.सुधीर मोघे यांची चित्रपट गीते*
‘आत्मविश्‍वास’, ‘एक डाव भुताचा’, ‘कळत-नकळत’,
‘चौकट राजा’, ‘जानकी’, ‘पुढचं पाऊल’, ‘राजू’, ‘लपंडाव’, ‘शापित’, ‘सूर्योदय’,
‘हा खेळ सावल्यांचा.’ संगीत दिलेली गीते : ‘अज्ञात तीर्थयात्रा’, ‘भन्नाट
रानवारा मस्तीत शीळ’, ‘भेटशील केव्हा माझिया जीवलगा’, ‘माझे मन तुझे झाले’,
‘रंगुनी रंगात सार्‍या.

*मा.सुधीर मोघे यांचे संगीत दिग्दर्शन*
‘कशासाठी प्रेमासाठी’ (मराठी चित्रपट), ‘सूत्रधार’ (हिंदी चित्रपट), ‘स्वामी’, ‘अधांतरी’, ‘नाजुका’ (मराठी मालिका), ‘हसरतें’, ‘डॉलर बहू’, ‘शरारते’ (हिंदी मालिका).
-*संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट



चित्र-चरित्र