चित्र-चरित्र

दिग्पाल लांजेकर
दिग्पाल लांजेकर
अभिनेता-लेखक-दिग्दर्शक
२६ ऑगस्ट

फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनिखड’, ‘शेर शिवराज’ असे प्रेरणादायी आणि ऐतिहासिक चित्रपट देणारा दिग्दर्शक म्हणजे दिग्पाल लांजेकर.

शाळेत असल्यापासूनच आवडत असलेल्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आणि त्याच वेळी आलेली घरचा कर्ता होण्याची जबाबदारी यातून मार्ग काढत दिग्पालने त्याच्या या क्षेत्रातल्या करियरला आकार दिला आहे. गणपती उत्सवात लेखन करणं, एकांकिका करणं अशा गोष्टींमधून त्याची आवड निर्माण झाली आणि लेखन कौशल्यसुद्धा विकसित होत गेलं.

दिग्पाल मूळचे रत्नागिरीचे. वडील सुनील लांजेकर यांचा तिथं व्यवसाय होता. कालांतरानं व्यवसाय बुडाला. त्यानंतर आणखी एक दु:खाचा डोंगर लांजेकर कुटुंबीयांवर कोसळला तो सुनील यांच्या अपघाती निधनामुळे. दिग्पाल व त्यांचा भाऊ निखिल दोघेही तेव्हा लहान होते. आई स्मिता यांनी कुटुंब सांभाळलं.

पुढे दिग्पाल यांना शिक्षणासाठी आजोबांकडे पुण्याला पाठविण्यात आलं. दिग्पालची खऱ्या अर्थानं जडणघडण पुण्यातच झाली. शाळकरी वयातच त्याला नाटकांचं वेड लागलं. छत्रपती शिवरायांवर आधीपासूनच भक्ती. पुण्यातील पेठा, वाडे मनात इतिहासाची रुजवण करीत होते.

आजोबांसोबत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, जयसिंगराव पवार आदींच्या व्याख्यानांना जाता आलं. त्यातून प्रेरणा मिळत गेली. छत्रपती शिवराय व त्यांच्या सहकाऱ्यांच्या या कथा भव्य माध्यमातून समाजासमोर याव्यात, असं तिथंच वाटू लागलं होतं.

विद्यार्थीदशेत असतानाच त्यांनी अनेक एकांकिका गाजवल्या, पुरस्कारही मिळवले. विनय आपटे, स्मिता तळवलकर, संजय सूरकर अशा दिग्गजांकडे दिग्पाल लांजेकर यांना शिकण्याची संधी मिळाली.

अकरावी-बारावीत असताना विनय आपटेंना एका मालिकेसाठी असिस्ट करण्याची संधी मिळाली. संजय सूरकर, राजदत्त यांच्याकडेही त्यानं काम केलं. त्यामुळे अनुभव येत गेला. आपला मराठी इतिहास समाजासमोर यावा, हा ध्यास मात्र कायम होता.

यादरम्यान, ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘तू माझा सांगाती’ या मालिकांसाठी कामं केली. ‘सखी’ मालिकेत तो नायकाच्या भूमिकेत होता. काही काळ गेला. संदीप जाधव तेव्हा एक मालिका करीत होते. त्यांचा एक कलाकार आजारी पडला होता. त्यांनी दिग्पालला त्या भूमिकेसाठी विचारलं. मात्र, याच वाहिनीवरील एका मालिकेत त्यानं नायक साकारला होता. जाधव यांच्या मालिकेत नायिकेचा भाऊ साकारायचा होता.

“दीड महिन्याचंच काम आहे”, जाधव यांनी सांगितलं. त्यांचा शब्द टाळायचा नव्हता म्हणून दिग्पाल यांनी ही भूमिका स्वीकारली. त्यावेळी संदीप जाधव यांनाही निर्माता म्हणून पुढं यायचं होतं. “तुझ्याकडे काही आहे का”, असं त्यांनी विचारलं तेव्हा दिग्पालनं ‘फर्जंद’विषयी सांगितलं. ‘तू काळजी करू नकोस, काम सुरू करू’, असा विश्वास त्यांनी दिला. दिग्पाल यांनी बळ मिळालं होतं. शिवचरित्रात लपलेले खरेखुरे ‘हिरोज’ पुढं आणण्याचा ध्यास दिग्पाल यांनी घेतलाच होता. पहिली कथा डोक्यात आली ती ‘कोंडाजी फर्जंद’ यांची. ६० मावळ्यांना घेऊन अडीच हजार शत्रूंचा नि:पात करणं, ही साधी गोष्ट नव्हती. ती आधी लिहून काढायचं दिग्पालनं ठरवलं. त्यासाठी आधी खूप वाचन केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठेशाहीचा इतिहास साक्षात जगलेले निनाद बेडेकर यांच्याकडे जाऊन सात वर्षे गिरवलेले धडेही इथं कामी आले.

मालिका, नाटकं करत असताना त्यांना पाच महिन्यांचा ब्रेक मिळाला होता. दिग्पाल आपल्या दोन मित्रांना घेऊन रायगडातील टकमक टोकावर गेला. लॅपटॉप काढला. मात्र, काही विचार करून तो बाजूला ठेवला. बाजूच्या दुकानातून फुलस्केप कागद विकत आणले. टळटळीत उन्हात लिखाणाला सुरुवात केली. पाच तास झाले होते, तो सतत लिहित होता. शेवटचं वाक्य ‘जय भवानी जय शिवराय’ लिहूनच तो उठले.

दोन मित्रांनी सांगितलं, “अरे पाच तास तू नुसता लिहित होतास, डोकं वर करूनही पाहिलं नाहीस…” तेव्हा त्यांना कळलं. ‘फर्जंद’ कागदावर उतरला होता. डायलॉग व्हर्जनही लिहून झाले होते. हा दैवी चमत्कारच होता, पुढंही असे चमत्कार घडत गेले, असं दिग्पाल सांगतो. नंतर साहजिकच निर्मात्यांचा शोध सुरू झाला.

दीडशे-दोनशे जणांची भेट झाली होती. मात्र, हाती काही लागत नव्हतं. त्यामुळे काहीशी निराशाही येत होती. शेवटी संदीप जाधव पुढं आले. त्यांच्यासह अनिर्बण सरकार, उत्कर्ष जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार यांनी निर्मितीची धुरा सांभाळली. शिवमालिकेत पाच चित्रपट करायचं आधी ठरलं होतं. मात्र, नंतर अष्टक पुढं आलं.

कुठलीही कलाकृती साकारायची, तर जीवतोड मेहनत आलीच. ‘फर्जंद’साठी सात वर्षे लागली. दिग्पाल एवढ्यावरच थांबले नाही तर, इतिहासातील बऱ्याच गोष्टी ते शिकले. कित्येक शस्त्रांचं प्रशिक्षण त्यांनी घेतलंय. त्याचा उपयोग दिग्दर्शनादरम्यान होतो. कलावंतांना ते स्वत: शस्त्रांचं प्रशिक्षण देतात. एवढंच नाही तर १२ प्रकारचे फेटे त्यांना बांधता येतात. इतर ऐतिहासिक वेशभूषाही करता येते.

“चित्रपट बनवायला कोट्यवधी लागतात. मात्र, चित्रपटाची तयारी करायला कागद अन् पेन पुरेसा असतो”, असं त्याचं म्हणणं आहे. मात्र, त्यातही मेहनत आलीच. मराठी चित्रपट म्हटलं की बजेटअभावी खूप मर्यादा येतात. शंभर घोड्यांऐवजी वीसच घोडे दौडवावे लागतात. कमीतकमी बजेटमध्ये जास्तीत जास्त चांगला सिनेमा बनवण्याचं आव्हान असतं. कारण, निर्माता जगला पाहिजे, असं त्यांच मत आहे.

मराठीत बजेट योग्य हवं, अशी त्यांची अपेक्षा आहे. मराठीत ‘वेल कोरिओग्राफ्ड ॲक्शन’ आणल्याचं एक लेखक-दिग्दर्शक म्हणून त्याला समाधान आहे. आज जागतिक तोडीचे ऐतिहासिक चित्रपट ते देत आहेत, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब आहे.

प्रसिद्ध पटकथालेखक, ‘बाहुबली’चे लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी केलेलं कौतुक दिग्पालसाठी बळ ठरलंय. नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी दिग्पाल यांनी चेन्नईला जाऊन एक कोर्स केला आहे. दाक्षिणात्य चित्रपट एवढे प्रगत कसे, याचे बारकावे त्यांनी टिपले.

याच दरम्यान त्याची व्ही. विजयेंद्र प्रसाद यांच्याशी भेट झाली. त्यांनी दिग्पालचे ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ बघितले होते. त्याबाबत त्यांनी दिग्पालची स्तुतीही केली. एवढ्या कमी बजेटमध्ये हे चित्रपट बनले, यावर त्यांचा विश्वासच बसला नव्हता. इमोशन्स, कंटेंट या भरवशावर आपण आपली नौका पार करतोय, हे इथं सिद्ध झालं होतं.

गो. नी. दांडेकर यांच्या कादंबऱ्यांचा दिग्पाल यांच्यावर प्रभाव आहे. दिग्दर्शकांमध्ये मणिरत्नम, भालजी पेंढारकर, राजा परांजपे हे त्यांच्या विशेष आवडीचे. त्यातल्या त्यात मणिरत्नम यांची फोटोग्राफी, गोष्ट सांगण्याची त्यांची पद्धत, गुंतागुंतीचा स्क्रीनप्ले निर्माण करण्याची त्यांची हातोटी दिग्पाल यांना विशेष भावते.

“इतर विषय, प्रेमकथा वगैरे हाताळाव्याशा वाटत नाहीत का”, असं विचारताच ते म्हणतात, “शिवराय व त्यांच्या सहकाऱ्यांवर आधारित प्रसंगांचे अष्टक हे माझे ‘कमिटेड मिशन’ आहे. ते आधी पूर्ण होऊदेत. मग तिकडे वळेन कदाचित.”

करिअरपलीकडे जाऊन त्याला आपला इतिहास त्यांना समाजासमोर आणायचा आहे. त्यात ते यशस्वीही ठरलेत. या क्षेत्रात येणाऱ्यांना काय मार्गदर्शन करशील, या प्रश्नावर ते म्हणतात, “इथं फक्त मेहनतच तुम्हाला तारते. स्मिता तळवलकर एकदा मला म्हणाल्या होत्या, ‘हे क्षेत्र असं आहे जिथं ना आरक्षण लागत ना आपण कधी निवृत्त होत. बस्स फक्त जिद्द हवी.’ तेच मीही मानतो. मेहनतच तुम्हाला पुढं नेईल. मी आजही १६ ते १८ तास रोज काम करतो. यश मिळवल्यानंतर ते टिकविण्यासाठी तिप्पट मेहनत करावी लागते.”

दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटानंतर आता ‘श्री शिवराज अष्टका’तील पाचवा चित्रपट 'सुभेदार' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

संकलन*#संजीव_वेलणकर पुणे.*



चित्र-चरित्र