चित्र-चरित्र

दत्ता डावजेकर
दत्ता डावजेकर
संगीतकार
१५ नोव्हेंबर १९१५ --- ११ नोव्हेंबर २००७

दत्तात्रेय शंकर डावजेकर हे पुण्याजवळील ‘केंढूर’ या गावचे होते. लहानपणीच त्यांचे मातृसुख हरपले, पण आजीने मोठ्या जिव्हाळ्याने त्यांचे पालनपोषण केले. त्यांचे वडील उत्तम तबलजी होते. त्या काळच्या प्रसिद्ध थिएटर मंडळींबरोबर तबल्याची साथ करण्यासाठी ते महिनोन् महिने दौर्‍यावर असत. नंतर वडिलांनी तबल्याचे वर्ग सुरू केले; पण दत्ता काही त्यांच्याकडे तबला शिकले नाहीत, मात्र गाणे-बजावणे कानावरून गेल्यामुळे दत्ता यांच्यावर संगीताचे संस्कार झाले.

संगीताची आवड निर्माण झाल्यावर दत्ता यांनी भातखंडे यांच्या ‘हिंदुस्तानी संगीत पद्धती’ या पुस्तकाचा कसून अभ्यास केला. तबला, दिलरुबा, पियानो वाजवण्यात उत्तम प्रगती केली. दत्तोपंत मंगळवेढेकर यांच्याकडे ते जलतरंगही शिकले.

दत्ता पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात मॅट्रिकपर्यंत शिकले. पुस्तकी ज्ञानाबरोबरच चित्रकला, मातीकाम अशा ललित कलांमध्येही त्यांना उत्तम गती होती. लवकरच ‘शांता आपटे कन्सर्न्स’ या संस्थेत साथीदार म्हणून ते दाखल झाले. १९३५च्या सुमारास ‘नंदकुमार’ या चित्रपटाचे संगीतकार सुरेशबाबू माने यांच्यांकडे ते साहाय्यक म्हणून भरती झाले. तिथे त्यांना अनेक गोष्टी शिकता आल्या. पण ही कंपनी लवकरच बंद पडली. ‘सवंगडी’ या चित्रपटाच्या वेळी संगीत विभागात साहाय्यक म्हणून दत्तांची नेमणूक झाली. सर्व जण त्यांना ‘डीडी’ म्हणत. ‘सवंगडी’ (मराठी) व ‘साथी’ (हिंदी) या चित्रपटांची गाणी डीडींनीच बसवून ध्वनिमुद्रित केली. त्या वेळी एच.एम.व्ही.चे वरिष्ठ अधिकारी जी.एन. जोशी यांनी डीडींना एच.एम.व्ही.त नोकरी दिली, पण नोकरीत बांधून घेणे त्यांना मानवले नाही.

सोहराब मोदींच्या मिनर्व्हा मुव्हीटोनमध्ये संगीत दिग्दर्शक मीरसाहेब यांचे साहाय्यक म्हणून दत्ता काम करू लागले. इथेच ते गाण्यांचे नोटेशन भरभर लिहावयास शिकले. वादक व संगीत साहाय्यक म्हणून स्थिरावल्यावर त्यांचे मित्र कोष्टी यांच्या ‘म्युनिसिपालिटी’ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करण्याची संधी त्यांना मिळाली. १९४१ सालचा ‘म्युनिसिपालिटी’ हा त्यांनी स्वतंत्रपणे संगीत दिलेला पहिला चित्रपट. या चित्रपटातूनच वसंतराव देशपांडे प्रथमच पार्श्वगायक म्हणून आले. डीडींना मेळ्यात गाणी लिहायची सवय असल्यामुळे ‘म्युनिसिपालिटी’ चित्रपटात त्यांनी ‘हळूहळू या सजणा’ व ‘तू माझ्या जवळी यावे’ ही दोन गाणी लिहिली. पुढे नवयुग कंपनीच्या ‘सरकारी पाहुणे’साठी त्यांना बोलवणे आले. त्यानंतर मा. विनायक यांच्या ‘प्रफुल्ल पिक्चर्स’चे ‘माझे बाळ’, ‘चिमुकला संसार’ व ‘गजाभाऊ’ हे तीन चित्रपट केले. डीडी हेच लता मंगेशकर यांना मा.विनायकांकडे घेऊन गेले. त्यांच्या ‘आपकी सेवा में’ या चित्रपटातील ‘पालागूकर जोरीरे’ ही पिलू रागातील ठुमरी म्हणजे लता मंगेशकरांचे पहिले हिंदी गाणे.

१९४५ मध्ये जी.एन. जोशींच्या ओळखीने एच.एम.व्ही.मध्ये असताना त्यांनी ‘तुज स्वप्नी पाहिले गोपाळा’, ‘कुणी बाई गुणगुणले’ ही गाणी लिहून संगीत देऊन ध्वनिमुद्रित केली. डीडींनी अनिल विश्‍वास, सुरेशबाबू माने, चित्रगुप्त, एस.एन. त्रिपाठी, प्रेमधन रोशन आणि सी.रामचंद्र यांच्याकडे साहाय्यक म्हणून काम केले. आयुष्यभर त्यांनी इलेक्ट्रॉनिक्सच्या छंदाची जोपासना केली. इलेक्ट्रॉनिक सूरपेटी (१९७०) व इलेक्ट्रॉनिक तंबोरा (१९७१) ची त्यांनी निर्मिती केली. अनेक मराठी नाटकांना, ५० मराठी चित्रपटांना व २ हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. लता मंगेशकरांच्या परदेशदौर्‍यात त्यांच्याबरोबर प्रमुख वादक म्हणून डीडींनी काम केले. ‘रंगल्या रात्री अशा’ (१९६२), ‘पाठलाग’ (१९६४), ‘संथ वाहते कृष्णामाई’ (१९६७) व ‘धरतीची लेकरं’ (१९७०) या चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार, तर ‘यशोदा’ (१९७४) या चित्रपटाला शास्त्रीय संगीताचा सूरसिंगार पुरस्कार मिळाला आहे. १९९५ सालचा महाराष्ट्र राज्य सरकारचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार त्यांना मिळाला. त्यांची मुलगी रेखा (डॉ. अपर्णा मयेकर) वैद्यकीय क्षेत्रात असूनही उत्तम गायिका आहे. तर धाकटा मुलगा विनय हा बांधकाम व्यावसायिक असून त्याला संगीताची आवड आहे. कोल्हापूरला आपल्या वडिलांच्या नावे त्याने ‘संगीतकार दत्ता डावजेकर प्रतिष्ठान’ची स्थापना केली असून या प्रतिष्ठानतर्फे दर वर्षी संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

- मधू पोतदारचित्र-चरित्र