साहित्य सौदामिनी – माधवी देसाई
चित्रपटसृष्टीतील नामवंत माता, पिता तसेच साहित्य जगातील प्रतिभाशाली नामवंत लेखक पती रणजीत देसाई अशा उत्तुंग व्यक्तीमत्वांच्या सावलीत झाकोळून न जाता स्वयंतेजाने तळपणारी साहित्य सौदामिनी तसेच गोवा – कोवाड-बेळगावच्या समाजजीवनात चिरस्मरणीय योगदान देणाऱ्या सामान्य, मातृहृदयी, धीरोदत्त, साहित्य सौदामिनी श्रीमती माधवी देसाई. २३ जुलै १९३३ ला माधवीताईंचा कोल्हापुरात जन्म झाला. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर आणि प्रख्यात अभिनेत्री लीलाबाई पेंढारकर यांच्या त्या कन्या. त्यांचं मूळ नाव सुलोचना आणि घरगुती नाव ‘आबी’.
भालजींच्या कडक शिस्तीत, साधी राहणी अन उच्च विचारसरणीत त्यांचं बालपण गेलं. बाबा त्यांना जयप्रभा स्टुडीओत लाठी आणि पन्हाळ्यात पिस्तुल चालवायला शिकवत. बलवान होण्याचे धडे घेत असतानाच तपोवनात सत्य, अहिंसा, सेवा, भक्ती, दया, त्याग ही तत्वे शिकवली जात होती. त्यामुळे त्यांचं मन कधी म्हणे, ‘सोसावं’ तर कधी म्हणे, ‘लढावं’. व्ही. शांताराम, मास्टर विनायक हे त्यांचे मावस काका तर प्रसिध्द खलनायक बाबूराव पेंढारकर त्यांचे काका. चित्रपटसृष्टीतील लता मंगेशकर, सुलोचना, सुधीर फडके, राजा परांजपे, दत्ता धर्माधिकारी अशा अनेक थोर व्यक्तींचा सहवास त्यांना लाभला. घरी चित्रपटसृष्टी आणि तपोवनात सर्वोदयी संस्कार असं त्यांचं विरोधाभासातलं जीवन सुरु झालं.
आबीचं अवघ्या १८ व्या वर्षीच लग्न होऊन ती सौ. माधवी नरेंद्र काटकर झाली. तपोवनात साध्या राहणीत राहणाऱ्या माधवीताई गोव्याच्या बांदोड्यात अत्यंत खानदानी श्रीमंत काटकर कुटुंबात संसार करू लागल्या. गोवा मुक्ती संग्रामातील सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगातही गेल्या. जिद्दीने बी. ए., बी. एड. पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून त्यांनी हायस्कूलमध्ये मराठीच्या शिक्षिका म्हणून डोंबिवलीत सोळा वर्षे नोकरी केली. पण नियतीनं पुन्हा त्यांचा मांडलेला डाव उधळला. तरुण वयात पती निधनाचं दु:ख पदरी आलं. तीन मुलींना त्यांनी धैर्यानं सारं बळ एकवटून वाढवलं.
काही काळानंतर १९७५ ला ‘स्वामी’ कार रणजीत देसाई या नामवंत लेखकाशी पुनर्विवाह करून त्या कोवाडची इनामदारीण झाल्या. देसाईंच्या दोन व स्वत:च्या तीन अशा पंचकन्यांची माता होऊन कोवाड संस्थानच्या वाड्यात त्यांनी चौदा वर्षे संसार केला. पण पुन्हा नियतीची लहर फिरली. पुन्हा या संसाराचाही वणवा पेटला. रणजीत देसाईंशी त्यांचा घटस्फोट झाला. पुन्हा त्या बेळगावात परतल्या. तिथंच ‘नाच गं घुमा’ चा जन्म झाला अन अखेर १९९२ ला त्या माधवी नरेंद्र काटकरांच्या बांदोड्याला ‘नर्मदा निवास’ स्थानी महालक्ष्मीच्या आवारात कायमच्या वास्तव्याला आल्या. त्यांचं आयुष्य जगावेगळ्या संस्थानात, घरात,नात्यात गेलं. पटावरचे प्यादे इकडून तिकडे सरकवावे अशा सहजतेने घडलेला त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास स्तिमित करणारा आहे. संघर्ष स्त्रीच्या पाचवीला पुजलेला असतो. काही जणी त्यात मोडून पडतात तर काही जणी जिद्दीनं सर्व अडचणींवर मात करतात. त्यातल्या एक सौदामिनी म्हणजे माधवीताई. स्थैर्याचा क्षणभंगुर अनुभव जिच्या वाट्याला सदैव आला तिच्या जीवनसंघर्षाची चितरकथा समोर आली ती ‘नाच गं घुमा’ या आत्मकथनातून. हे आत्मलेखन संथ पाण्यासारखं आहे. त्या पाण्यावर दु:खाचे तरंग आहेत पण संतापाचा, रागाचा कुठेही खळखळाट नाही.
साहित्यिक चळवळ, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातलं त्यांचं योगदान भरीव आहे. कोवाडच्या सामाजिक जीवनात त्यांनी संस्कार वर्ग, बालवाडी, भजनीमंडळ, नाटके, कथाकथनासारखे उपक्रम राबविले. कागद कारखाना, रणजीतनगर वसाहत या कल्पना राबवल्या. त्या वेळी माधवीताईंचा ग्रामीण जीवन आणि स्त्रियांच्या वेदनेशी जवळचा संबंध आला अन त्या लिहित्या झाल्या. हे सर्व करताना वृद्धाश्रम, अनाथाश्रम,
त्यांच्या ओजस्वी वाणीच्या प्रवाहात श्रोत्यांना, वाचकांना विचारमग्न करण्याची ताकद होती. त्यांचं व्यक्तिमत्व शांतपणे तेवणाऱ्या निश्चल समईसारखं होतं. इतकी कर्तुत्ववान स्त्री, पण डोळ्यांत निगर्वता, चेहऱ्यावर निर्मळ हासू, डोक्यावरून पदर, पांढरी साडी असं त्यांचं संपूर्ण धवल व्यक्तिमत्व होतं. त्यांचं व्यक्तिमत्व कस्तुरीगंधासारखं होतं याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे.
पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक चित्रपटातून खलनायक म्हणून गाजलेले, रंगभूमीवर नट तसेच दिग्दर्शक म्हणून यशस्वी झालेले आणि भालजी पेंढारकरांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून वावरलेले माझे वडील कै. नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांचे आत्मचरित्र ‘हिरवी चादर रुपेरी पडदा’ चे मी स्वत: संकलन व शब्दांकन केले. ३ सप्टेंबर, १९९९ ला ते प्रकाशित झाले. तेव्हा व्यासपीठावर साहित्यकार शं. ना. नवरे तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून साहित्य सौदामिनी माधवी देसाई हजर होत्या. त्यांचे मनोगत म्हणजे आठवणींचा हळवा प्रवाह होता. या प्रवाहातील काही वेचक व वेधक मोती …..
प्रत्येक पुस्तकाचा जन्म होण्याची एक वेळ ठरलेली असते. या कलावंताचं चरित्र उत्तम योगायोगावर प्रकाशित होतंय. मी या कोल्हापूरची माहेरवाशीण आहे. जिथं महालक्ष्मीचं वास्तव्य आहे अशा, श्रावणातल्या सरत्या शुक्रवारी त्यांच्या कन्येनं हे पुस्तक सादर केलंय यासारखा दुसरा योगायोग असूच शकत नाही. रामायणात म्हटलंय, ‘कुश लव रामायण गाती’ आणि स्वयं रामचंद्रांनी ते ऐकलं तेव्हा सर्वांचे डोळे पाणावले. तशी या काळातली ही सुकन्या. दानवे हे खलनायक म्हणून स्टुडीओत वावरताना पाहिले तसेच संसारात कौटुंबिक भूमिका बजावतानाही पाहिले. दानवेकाका जर मुंबईत गेले असते तर प्राणची छुट्टी झाली असती आणि प्रेम चोप्रा जन्मालाच आला नसता. परंतु ते कोल्हापुरात राहिले म्हणून अनेक कलाकार-शिष्य निर्माण झाले….
जीवनाचे चढउतार पार करताना ८० व्या वर्षी त्यांची दृष्टी हरपली तरी त्या खंबीर होत्या. १५ जुलै, २०१३ ला बेळगावातच या साहित्य सौदामिनीनं आपला अखेरचा श्वास घेतला आणि नियतीचं हे चक्र खऱ्या अर्थानं पूर्ण झालं. संस्कार शालीनतेच्या पदराआडच्या लवचिक, काटक तन-मन असलेल्या माधवीताई…. नावाप्रमाणे मधाळ. गोड आवाजाची देणगी लाभलेल्या माधवीताई…. निसर्ग-संगीत-चित्रं आणि माणसं यांच्यावर भरभरून मनस्वी प्रेम करणाऱ्या माधवीताई. साहित्य क्षेत्रात सौदामिनी असलेल्या पण अंतरी स्निग्ध, शांत, सौम्य समईप्रमाणे कायम तेवत राहणाऱ्या माधवीताईबद्दल म्हणावंसं वाटतं…
“समईतील मंद वात, अजूनी अंतरात ….”
जयश्री जयशंकर दानवे
एम.ए.(हिंदी),संगीत विशारद
ज्येष्ठ लेखिका, चित्रपट-नाट्य अभ्यासक
कोल्हापूर.
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया