अतिथी कट्टा

दिनांक : ३०-०४-२०२१

दादासाहेब फाळकेंची शिस्त…


भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्याकडे काम करण्याची संधी दिवंगत अभिनेते वसंत शिंदे यांना मिळाली होती. दादासाहेबांच्या जन्मदिनानिमित्तानं वसंत शिंदे यांच्यावर मधु पोतदार यांनी लिहिलेल्या नि मंजुल प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘विनोदवृक्ष’ पुस्तकामधील काही भाग आम्ही संपादित स्वरूपात प्रसिद्ध करीत आहोत.

——

१९२४ सालच्या मे महिन्यातल्या एके दिवशी मी, माझा आत्येभाऊ प्रभाकर यांच्याबरोबर पायीच फाळक्यांच्या स्टुडिओत म्हणजे ‘हिंदुस्थान फिल्म कंपनी’त जाण्यासाठी निघालो. फाळके म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद तथा दादासाहेब फाळके!

आमच्या घरापासून स्टुडिओ बराच लांब होता. आम्ही त्या वेळी तांबट आळीत राहात होतो. तर फाळक्यांची हिंदुस्थान फिल्म कंपनी दिल्ली दरवाजाजवळ गवत बाजार म्हणून जो भाग होता, त्या ठिकाणी होती. माझा आत्येभाऊ त्या वेळी कंपनीचे प्रमुख कॅमेरामन अण्णासाहेब साळुंखे यांच्या हाताखाली दुय्यम कॅमेरामन म्हणून होता. अण्णासाहेब फाळक्यांकडे ‘राजा हरिश्चंद्र’पासून असल्यामुळे जुने व जाणते म्हणून फाळक्यांकडे त्यांचं चांगलं वजन होतं. त्यांच्यामार्फत माझी फाळक्यांकडे वर्णी लागली.

मला पहिल्या दिवशी फाळक्यांसमोर उभं केलं. त्यांनी मला न्याहाळलं. मी दिसायला बुटका, गिड्डा व साधासुधाच होतो. त्यांनी माझी ‘सुतार खात्या’त रवानगी केली. मी सुतार खात्यात गेलो. त्या वेळी सुतार खात्याचे प्रमुख होते, माधव मिस्त्री. हिंदुस्थान फिल्म कंपनीचे मॅनेजर म्हणून मिरजेचे अप्पासाहेब पटवर्धन काम करीत. त्यांच्या हाताखाली परमाणे म्हणून असिस्टंट मॅनेजर होते. हा स्टुडिओ जरी फाळक्यांचा स्टुडिओ म्हणून ओळखला जात असला तरी फाळके हे तिथले पगारी नोकर होते. खरे मालक वेगळेच होते.

मुंबईच्या कोहिनूर मिलचे मालक वामनराव श्रीधर आपटे हे हिंदुस्थान फिल्म कंपनीचे मालक होते. दादासाहेब फाळके जरी नोकर म्हणून हिंदुस्थान फिल्म कंपनीत होते तरी नोकरवर्ग त्यांना मालकाचाच मान द्यायचा. त्यांना हजेरीपुस्तकावर सही करावी लागत नसे. त्यांच्यावर इतर नोकरांप्रमाणे कसलेही बंधन नव्हते. इतकंच काय पण त्यांच्या तैनातीसाठी घोडा-गाडीचीही सोय कंपनीने करून दिली होती.

दादासाहेब फाळक्यांना त्या वेळी दरमहा एक हजार रुपये पगार होता. हिंदुस्थान फिल्म कंपनीचे आवार अवाढव्य होतं. त्यामध्ये एक प्रचंड बंगला, बंगल्यात मोठमोठे हॉल होते. पुढे तीन तोट्या असलेला मोठा हौद, स्टुडिओ भोवती तारेचं कुंपण लावलेलं होतं. या बंगल्याला ‘ हौदाचा बंगला’ म्हणत.

हिंदुस्थान फिल्म कंपनीत त्या वेळी अनेक ‘डिपार्टमेंटस्’ होती. आमचं सुतार खातं – याचे मुख्य होते माधवराव मिस्त्री व यांच्या हाताखाली अनेक माणसं होती. कॅमेरा डिपार्टमेंट – अण्णासाहेब साळुखे इथले मुख्य होते. त्यांच्या हाताखाली माझा आत्येभाऊ प्रभाकर चव्हाण व माधव जोशी होते. जॉईनिंग खाते – त्या वेळी ‘एडिटिंग’ला ‘जॉईनिंग’ म्हणत. त्यात बचू पवार व श्रीपाद शेळके होते. स्टोअररूम – वामनराव भटांच्या ताब्यात होती. प्रिंटिंग आणि डेव्हलपिंग – इथं क्षीरसागर, कामत आणि विष्णुपंत सोनार(पहिलवान) होते. शिवणकाम – इथल्या मंडळींची नावे आठवत नाहीत. पेंटिंग खाते – इथे गोखले, लेले व पळनीटकर ही मंडळी होती. कपडेपट / रंगपट – हा सहदेव तपकीरे व ब्रह्मदेव शंकर देव (स्त्री-पार्टी) यांच्या ताब्यात होता. मेकअप मास्तर होते- भाऊराव दातार व कृष्णराव चव्हाण, भाऊरावांकडून मी मिशा करायला शिकलो. त्यांचा माझ्यावर शेवटपर्यंत लोभ होता. वायरिंग, यंत्रकाम, प्रोजेक्टर चालवायचे काम शिंदेमामा करीत. हे शिंदेमामा भंडारी असून अष्टपैलू नट होते. विश्वनाथ तेलंग व त्यांचे बंधू दत्तात्रय तेलंग हे दोघे ‘आर्ट डायरेक्टर’ होते. गंमत म्हणजे कंपनीचा एक छापखानाही होता. मूकपटाला लागणारी ‘टायटल्स्’ इथं तयार होत. या कारखान्याचं काम भालेराव, गयाप्रसाद व विष्णुशास्त्री हे बघत. छापखान्यातले मामा निरंतर हे भटजीचं पेटंट काम करायचे. तिथेच अंबादास लोणकरही (स्त्री-पार्टी) होते. ‘जॉइनिंग’मधले माधवराव खैरे ( स्त्री- पार्टी) होते. त्यांनी संत जनाबाईंचं काम केलं होतं. ते गवळी होते. भद्रकालीच्या वर गवळी आळीत त्यांचा गोठा होता. तर बाबुराव मगर हे घोडा सांभाळत व बग्गीही चालवत. कंपनीत स्त्री- पार्टी करणारे अनेक नट होते. त्यात प्रामुख्याने शिंदेमामा, विष्णु चव्हाण, अण्णा साळुखे, सखाराम न्हावी इत्यादी होते.

दादासाहेबांनी १९१३ साली निर्माण केलेल्या ‘हरिश्चंद्र तारामती’ या पहिल्या चित्रपटात ‘तारामतीची’ भूमिका अण्णा (कृष्णा हरि) साळुखे यांनीच केली होती. यावेळी एक गंमतच झाली. त्या वेळी अण्णाचे वडील जिवंत असल्यामुळे रंगभूषेच्यावेळी ते मिशा काढायला तयार नव्हते. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर दादासाहेबांनी अण्णांची व त्याच्या वडिलांची समजूत घालून तारामतीच्या ( अण्णांच्या) मिशांना चाट दिली होती आणि सखाराम न्हाव्यावर तर ‘स्त्री-पार्ट’मुळे असा काही प्रसंग गुदरला होता की, विचारता सोय नाही!

स्टुडिओत सकाळी ९ वाजता आम्ही सगळेजण जमत असू. ‘प्रार्थने’ने सुरुवात होत असे. त्या वेळी काशिनाथ भराडी हे संगीतमास्तर होते. ते पेटीवादन करायचे. श्री. करमरकर (तिरळ्या डोळ्यांचे) हे गायचे, पेटी वाजवायचे. विष्णुपंत भोसले तबल्यावर असायचे. सकाळची नांदी, नमन व प्रार्थना भराडी व भोसले दोघे मिळून म्हणत. आम्ही सगळेजण त्यांच्या आवाजात आवाज मिसळत असू!

आमची कामाची वेळ ९ ते ६ अशी होती. मध्ये १ ते १|| या वेळात घरून आणलेले डबे खात असू. खाण्याची जागा अशी निश्चित नव्हती. आम्ही कुठेही झाडाखाली बसत असू. संध्याकाळी ६ वाजल्यानंतर लहान मुलांना एक तास व्यायामशाळेत घालवावा लागे. आम्हां लहान मुलांना शिकवायला दोन पंजाबी पैलवान होते. जोर, बैठका, सिंगलबार, डबलबार, जोडी करेल इत्यादी व्यायामप्रकार करावे लागत. त्यानंतर प्रत्येकाला एक पेलभर दूध मिळे. हे सारे होईपर्यंत संध्याकाळचे सात वाजलेले असत.

हिंदुस्थान फिल्म कंपनीचे मालक आपटे हे नाशिकात राहात नसत. ते मुंबईलाच राहात असत. पण महिन्यातून केव्हातरी एकदा त्यांची मुंबईहून चक्कर होत असे. त्यांच्या मोटारचा ड्रायव्हर शेलार हाही उत्तमपैकी पैलवान होता. वेळप्रसंगी तोही मूकपटात काम करायचा.

कंपनीतले भाऊराव दातार, विष्णुपंत सोनार यांच्याबरोबर शेलारही विजयानंद थेटरजवळच्या मोहन मास्तरांच्या तालमीत जात. या तालमीत मीही जात असे. आपट्यांचं एक वैशिष्ट्य होतं, ते नाशिकास आले की, त्यांच्या पंगतीला त्यांना आम्ही सारी मुलं हवी असायचो. ‘पोरं पंगतीला पाहिजेत’, असे ते म्हणत. आंब्याच्या सिझनमध्ये तर त्यांचा जास्त मुक्काम असे. रोज आमरसाच्या पार्ट्या होत. कंपनीतली १०-१२ मुले त्यांच्या पंगतीला असत. मी मे महिन्यातच कंपनीत आल्यामुळे माझी सुरुवातच आमरसाच्या पाटर्यांनी झाली! त्यामुळे मालक मंडळी मुंबईहून येणार असली की, आम्ही मुले एकदम खूष होऊन जात असू!

कंपनीच्या आवारात एक पांढराशुभ्र घोडा, घोडागाडी, बग्गी, बैलगाडी, गाई, म्हशी इत्यादी असत. रोज व्यायामानंतर मिळणाऱ्या दुधामुळे मूळची उत्तम असलेली माझी शरीर प्रकृती आता एकदम ‘गुटगुटीत’ झाली होती!

हिंदुस्थान फिल्म कंपनीच्या शिरस्त्याप्रमाणे प्रत्येकाला प्रत्येक खात्यात काम करावं लागे. शिस्त अतिशय कडक होती पण कौतुकही तेवढंच होई. आपल्याकडे काम करणाऱ्याला सर्व काही यायला हवं, असा दादासाहेबांचा दंडक असे. त्यासाठी कंपनीत नाच, गाणं, अभिनय इत्यादी शिकवण्याची सोय केली होती. मूकपट असला तरी तालासुराची आवश्यकता असेच ! कंपनीतील सानेमामा हे सर्वांना अभिनय शिकवित. मला चित्रकलेची लहानपणापासून आवड होती व थोडीफार अवगतही होती. दादासाहेबांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी माझी रवानगी पेंटिंग खात्यात केली. तिथे आमचे प्रमुख होते कलादिग्दर्शक विश्वनाथराव पळणीटकर. गोखले व लेले तिथे साहाय्यक होते. पेंटिंग खात्यात काम नसे तेव्हा मग इतर खात्यांतही काम करावे लागे.

फाळक्यांच्या पूर्वीच्या सिनेमात माझ्या थोरल्या बंधूंनी, शांताराम यांनी काम केलं होतं. ‘कालियामर्दन’मध्ये कृष्णाचे सवंगडी (गोप), तर ‘लंकादहन ‘मध्ये माकडाचे व ऋषिकुमाराचे अशी कामे त्यांनी केली. पडल्यास स्त्री- पार्टही ते करीत. हे सर्व सांगायचं कारण म्हणजे लवकरच मलाही मूकपटात काम करायची संधी मिळाली.

– वसंत शिंदे

(शब्दांकन – मधु पोतदार)

सौजन्य – मंजुल प्रकाशन

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया