अतिथी कट्टा

दिनांक : १५-०६-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‌स्वप्निल जोशी ‘मोगरा फुलला’ची जान




‘लपंडाव’, ‘सरकारनामा’, ‘लेकरू’ यासारखे मराठी चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या श्रावणी देवधर बऱ्याच काळानंतर ‘मोगरा फुलला’ या चित्रपटानिमित्तानं दिग्दर्शनात उतरल्या आहेत. त्यानिमित्तानं या चित्रपटातील मुख्य कलाकार नीना कुलकर्णी आणि स्वप्निल जोशी यांचं हे मनोनगत

——

नीना कुलकर्णी –

स्वप्निलला खूप वर्षांपासून मी ओळखते. त्याचं काम मी जवळून पाहिलंय. किंबहुना काही वर्षांपूर्वी आम्ही दोघांनी एकत्रही काम केलंय. बऱ्याच कालावधीनंतर आम्ही पुन्हा या चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर एकत्र दिसलो आहोत. या चित्रपटात स्वप्निलनं साकारलेली सुनील कुलकर्णीची निरागस भूमिका तेवढीच लोभस आहे. ही भूमिका स्वप्निलनं खूप छानपणे पेलली आहे. आपल्यातला निरागसपणा, गोडवा त्यानं कुठंही हरवू दिलेला नाही. तो या चित्रपटाची जान आहे. त्यानं साकारलेला सुनील कुलकर्णी आजच्या तरुण पिढीतील बहुतांशी मुलांशी रिलेट करणारा आहे. ही मुलं साधी, सरळ असतात. आजच्या वेगवान जगात आपण पडायचं नाही असं त्यांनीच ठरवलेलं असतं. आपल्या आयुष्यात कसलीही गुंतागुंत करायची नाही, असं त्यांनी ठरवलेलं असतं. परंतु, अशाप्रकारची गुंतागुंत जेव्हा तयार होते, ते आयुष्याला कसं सामोरे जातात, हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. स्वप्निल मराठीतला सध्या मोठा स्टार आहे. असं असूनही तो मराठीत काहीतरी वेगळं करण्याची इच्छा दाखवतो आहे. केवळ इच्छा न दाखवता ते साकारण्याचं वेगळं बळ कलाकारात असतं. ते स्वप्निलकडे आहे. त्यामुळे या चित्रपटाचं शूटिंग कधी सुरू झालं नि कधी संपलं ते मला कळलंच नाही. मी आजवर अनेक चित्रपट केलेत. परंतु, हा चित्रपट खूप सहजगत्या पार पडला. त्यात सर्वाधिक श्रेय हे दिग्दर्शिका श्रावणी देवधरचं आहे. चंद्रकांत कुलकर्णी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांमध्ये मी काम केलं आहे. त्यामुळे ह्यांच्याबरोबर पुन्हा काम करायला मजा आली. ‘मोगरा फुलाला’ ही एक सुंदर,संवेदनशील कथा आहे. या कथेमधील माझं पात्र साकारताना मला खूप समाधान मिळालं.

स्वप्निल जोशी –

आजवर अनेकांनी मला तू चांगला अभिनेता आहेस अशी पोचपावती दिली आहे. परंतु, नीना कुलकर्णींसारख्या मोठ्या अभिनेत्रीनं तू चांगला अभिनेता आहेस, असं म्हणणं ही माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. नीना कुलकर्णी हे अभिनयातलं एक संस्थान आहे. तरीसुद्धा ही अभिनेत्री प्रेक्षकांना प्रत्येक चित्रपटामधून काहीतरी नवीन दाखवत असते. प्रत्येक चित्रपटात ती वेगळी दिसते, तिचा आवाज वेगळा लागतो, तिचे डोळे वेगळे दिसतात. त्यातले भाव वेगळे असतात. तिची देहबोली बदलते. मी अशी अपेक्षा करतो, असं स्कील एके दिवशी माझ्यातही यावं. श्रावणी देवधर या चित्रपटाची हीरो आहे. कारण तिच्या डोक्यातून आलेली ही कथा. तिच्या हृदयातून आलेली ही कथा आहे. श्रावणीताईनंही गेल्या अनेक वर्षांमध्ये अतिशय उत्तम काम केलं आहे. तिलाही आता नव्यानं काही सिद्ध करण्याची गरज नाही. नीनाताई आणि श्रावणीताई यांच्यामधील एक समान दुवा म्हणजे पॅशन. दोघींनाही सतत काहीतरी नवीन करायचं असतं. भलेही त्या कधी धडपडतील. परंतु, त्या परत उठतील. काहीतरी चांगलं आणि वेगळं करण्याची दोघींमध्येही भूक आहे. ती मला त्यांच्याकडून शिकायला मिळाली. हा चित्रपट सचिन मोटेनी खूप छान लिहिलाय. त्याच्या लेखनाला श्रावणीताईच्या व्हिजननी खूप छान साथ दिलीय. या चित्रपटामधील सगळ्या व्यक्तिरेखा खऱ्या आहेत. त्याचं मोठं श्रेय सचिन आणि श्रावणीताईला जातं.

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया