अतिथी कट्टा

दिनांक : ३०-०७-२०२०

सुलोचना : चित्रसृष्टीचे एक अनमोल लेणे !



ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचा आज ९२वा वाढदिवस. त्यानिमित्तानं सुलोचनादीदी यांच्यावर दिवंगत लेखक-पत्रकार वसंत भालेकर यांनी लिहिलेल्या ‘सुलोचना’ या पुस्तकामधील पं. हृदयनाथ मंगेशकर यांची प्रस्तावना आम्ही संपादित स्वरूपात प्रसिद्ध करीत आहोत.

——

इतकी वर्षे उलटून गेली तरी अजूनही मला आठवते, ते एकोणीसशे त्रेचाळीस साल होते. त्यावेळी कोल्हापूरात सुलोचनाबाईंना मी प्रथम पाहिले. शिडशिडीत, उंच, सुंदर, सावळी अशी ती नम्र विनयशील मूर्ती अजूनही जशीच्या तशी डोळ्यापुढे उभी आहे. कोल्हापूरातच आम्ही तेव्हा राहात होतो. चित्रसृष्टीत नुकतेच पदार्पण केलेल्या सुलोचनाबाई त्यावेळी अनेकदा आमच्या घरी येत. माईशी गप्पा मारीत. आम्हा भावंडांशी मोकळ्या स्नेहभावनेने वागत. साधा निगर्वी स्वभाव. जबाबदारीची जाणीव. ज्या कला क्षेत्रात पाऊल टाकले आहे तेथे सतत काही नवे शिकून घेण्याची उत्सुकता आणि कलेशी राखलेले अविचल इमान – ज्या गुणांनी सुलोचनाबाईंना आज मराठी चित्रसृष्टीत सर्वोच्च मानाचे स्थान मिळवून दिले आहे ते सारे गुण बीज रूपाने त्यावेळी देखील त्यांच्या अंगी वास करीत होते. आमच्या घराशी तेव्हा जो सुलोचनाबाईंचा स्नेह जडला तो नंतरच्या साऱ्या वर्षांतून आजही अखंड टिकून राहिला आहे.

व्यावसायिक क्षेत्रात सुलोचनाबाईंशी माझा संपर्क आला तो नंतर साठ साली. “भाव

तेथे देव’ हा चित्रपट मी काढला होता. निर्माता मी होतो. मनात हौस होती, उमेद होती.

चित्रपट जास्तीत जास्त चांगला व्हावा ही धडपड होती. त्यासाठीच सारी कलात्मक अंगे उत्तम झाली पाहिजेत असे मला वाटत होते. म्हणूनच माझ्या या चित्रपटातल्या एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी मी सुलोचनाबाईंची निवड केली.

कामासाठी शब्द टाकण्याचा अवकाश, सुलोचनाबाई ताबडतोब आल्या आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी ती भूमिका उत्तमरीतीने, पूर्ण कलात्मकतेने वठविली. काम करताना कधी दिरंगाई नाही. कधी आढेवेढे घेणे किंवा निर्मात्याला अडवून नाचवणे नाही. कधी स्वत:च्या लहरीखातर इतरांना उपद्रव देणेही नाही. खऱ्या कलावंताला साजेसे सहकार्य त्यावेळी सुलोचनाबाईंनी आम्हा साऱ्यांना दिले. पण त्याहीपेक्षा कलावंत म्हणून ही अभिनेत्री किती मोठी आहे याची साक्ष मला नंतर पटली. आमचा हा चित्रपट लोकांच्या पसंतीला उतरला नाही. तो साफ पडला. पैशाच्या दृष्टीने मी पुरताच तोट्यात आलो. चित्रपटाचे व्यावहारिक अपयश सुलोचनाबाईंना कळलेच होते. त्यांनी मनाचा मोठेपणा इथेही दाखवला. ‘भाव तेथे देव’ या चित्रपटातल्या आपल्या कामाबद्दल त्यांनी मजकडून पै देखील घेतली नाही. कलाकार म्हणून नव्हे तर माणूस म्हणूनही किती दुर्मिळ गुण त्यांच्या अंगी आहेत याची जाणीव करून देणारा हा प्रसंग. तो मी अजूनही विसरलो नाही. कधी विसरणार नाही.

साठ वर्षांपूर्वी मराठी चित्रसृष्टीला सुलोचनाबाईंचा लाभ झाला. त्यांच्या कलागुणांमुळे

आणि सौजन्य सद्भावनेमुळे या क्षेत्रात त्या झपाट्याने पुढे आल्या. या गुणी अभिनेत्रीला संधी मिळत गेली. त्या प्रत्येक संधीचा फायदा घेऊन तिने आपले कलात्मक व्यक्तिमत्व सतत समृद्ध केले. मूळचा हिरा अस्सल असला तरी त्यालाही घासून पुसून घ्यावे लागते. पैलू पाडावे लागतात. तरच त्याचे तेज पूर्णाशाने प्रकट होते. तो झळझळू लागतो. त्याच्या तेजाने डोळे दिपून जातात. सुलोचनाबाईंच्या कलेचा असाच विकास होत गेला आहे.

रूढ अर्थानं अशिक्षित असलेल्या या अभिनेत्रीने स्वत:ची भाषा शुद्ध करून घेण्यापासून

तो अभिनयातले अनेक लहान मोठे बारकावे जाणून ते आत्मसात करण्यापर्यंत सर्वत्र सारखे श्रम घेतले आहेत. स्वत:वर जागरूकपणे पहारा ठेवून कलेची जोपासना केली आहे. आत्मसंतुष्टता हा कलावंताचा सर्वात मोठा शत्रू आहे. या शत्रूपासून सुलोचनाबाईंनी आपला कटाक्षाने बचाव केला आहे. आजही नवे शिकण्यासाठी, नवे जाणून घेण्यासाठी त्या नवशिक्या कलाकाराच्या उत्सुकतेने तयार असतात.

कलावंताचा दुसरा शत्रू म्हणजे अहंकार. त्या अहंभावनेचा वाराही सुलोचनाबाईंनी

स्वत:ला लागू दिला नाही. पूर्वी होत्या तशाच आजही त्या निगर्वी, मनमोकळ्या राहिल्या

आहेत. म्हणूनच मराठी चित्रसृष्टीतल्या तंत्रज्ञ कलाकारापासून तो साध्या मराठी रसिकांपर्यंत प्रत्येक जण त्यांच्याकडे मानाने, आदराने बघतो.

नव्या कलावंतांना प्रोत्साहन देणे, त्यांना आर्थिक मदत करणे, त्यांच्या अडचणी जाणून

घेऊन त्या दूर करण्यासाठी झटणे हे सारे सुलोचनाबाई अगदी मन:पूर्वक करतात. म्हणून साऱ्या मराठी चित्रसृष्टीच्या त्या आज ‘दीदी झाल्या आहेत. त्यांना मिळालेले ‘दीदी’ हे संबोधन मराठी कलाकारांच्या मनातल्या त्यांच्याबद्दलच्या आदर भावनेचे, जिव्हाळ्याचे प्रतिक आहे. ते विशेषण त्यांना खऱ्या अर्थाने शोभते, साजून दिसते.

सुलोचनाबाईंचा मी एक निस्सीम चाहता आहे. त्यांचे सारे चित्रपट मी न चुकता पाहिले आहेत. व्यक्ति म्हणून जसा त्यांच्या विषयी मला जिव्हाळा वाटतो तसा कलाकार म्हणून त्यांच्याविषयी मला आदर वाटतो. त्यांनी साकार केलेल्या अनेक भूमिका ही त्यांच्या समृद्ध कलागुणांची समर्थ प्रतीके आहेत. कलेच्या मार्गावरचा एक सुजाण, विकासशील आणि सतत पूर्णत्वाकडे जाऊ बघणारा प्रवास तेथे मला नेहमीच जाणवत आला आहे.

या प्रवासातल्याच एका महत्त्वाच्या टप्प्यावर सुलोचनाबाई आज उभ्या आहेत. चित्रपटसृष्टीतल्या आपल्या यशस्वी कारकीर्दीची साठ वर्षे त्यांनी पूर्ण केली आहेत. चित्रसृष्टीसारख्या लहरी, क्षणोक्षणी बदलणाऱ्या, आर्थिक कारणांनी रंग पालटणाऱ्या आणि यशापयशाच्या चढउताराने अवघड झालेल्या क्षेत्रात इतकी वर्षे नुसते टिकून राहणे ही गोष्ट देखील सोपी नाही. मग सातत्याने अधिकाधिक यश मिळवून मनाने, इभ्रतीने येथे इतके दिवस काढणे हे मोठेच श्रेय म्हटले पाहिजे. ते श्रेय सुलोचनाबाईंनी संपादन केले आहे. हे पाहून त्यांच्या असंख्य चाहत्यांना माझ्याप्रमाणेच आनंद वाटेल याबद्दल मला संशय नाही.

माझे मित्र श्री. वसंत भालेकर यांनी या निमित्ताने ‘सुलोचना’ हा ग्रंथ लिहिला आहे ही

आनंदाची गोष्ट आहे. भालेकर हे मराठी वाचकांना अपरिचित नाहीत. त्यांनी लिहिलेली

पुस्तके, रेखाटलेली कलावंतांची विविध व्यक्तिचित्रे मराठी वाचकांच्या केव्हाच पसंतीला

उतरली आहेत. भालेकर रसिक आहेत. सहृदय आहेत. कलाकारांबद्दल त्यांना प्रामाणिक जिव्हाळा आहे. त्याबरोबर कलाकाराच्या कलेमागे उभे असलेले त्यांचे व्यक्तित्व; त्यांच्या कलात्मक प्रेरणा, त्याची सुखदुःखे जाणून घेणे हा त्यांचा एक छंद आहे. गेली अनेक वर्षे या छंदाची जपणूक त्यांनी केली आहे. त्यासाठी आवश्यक ते परिश्रम घेतले आहेत.

कलावंत हा कलेच्याद्वारा रसिकांना परिचित होत असतोच पण त्याचे व्यक्तिगत जीवन जाणून घ्यायलाही ते तेवढेच उत्सुक असतात. आणि हे कुतुहल कोणी पुरवले तर त्यात त्यांना निर्मळ आनंद लाभतो. कलावंत हाही आपल्या सारखाच हाडामासाचा, जिवंत, आनंदाने पुलकित होणारा आणि दुःखाने व्याकुळणारा एक माणूस आहे ही साक्ष पटली म्हणजे माणूसकीच्या एका जवळच्या नात्याने आपणही त्या कलाकाराशी निगडीत झाल्याचे समाधान त्यांना मिळते.

प्रत्येक सामान्य माणसात जसा एक कलाकार दडलेला असतो तसा प्रत्येक असामान्य

कलाकारातही एक ‘माणूस’ लपलेला असतो. भालेकर कलावंतातला हा माणूस शोधून

त्याचे दर्शन रसिकांना घडवतात. आवडते कलावंत आणि त्यांच्यावर प्रेम करणारे रसिक यांच्या मधला जिव्हाळ्याचा दुवा जोडण्याचे हे मोठे मोलाचे कार्य भालेकर करीत आहेत.

‘सुलोचना’ हा ग्रंथ लिहून भालेकरांनी हेच महत्त्वाचे कार्य पुन्हा एकदा केले आहे.

सुलोचना ही काही ललित कलाकृति नव्हे. ते निकष या ग्रंथाला लावता येणार नाहीत. त्याचे कारणही नाही. एका कलावतीच्या जीवनाचा आणि तिच्या कला मार्गावरील प्रवासाचा हा आहे. तो आपल्या डोळ्यासमोर उलगडत जाताना अनेक भावनांची आंदोलने मनाला मिळतात. मला हा ग्रंथ आवडला. वाचकांनाही तो आवडेल अशी मला खात्री आहे. हे काम जिकीरीचे असते, कष्टाचे असते. त्यासाठी वेळ खर्चावा लागतो आणि श्रमही ध्यावे लागतात. भालेकरांनी हे श्रम हौसेने घेतले आहेत. सुलोचनाबाईंबद्दल वाटणाऱ्या प्रेमामुळे, आदरामुळे हे काम त्यांनी केले आहे. त्याबद्दल मजप्रमाणेच प्रत्येक मराठी माणूस त्यांना धन्यवाद देईल. मी ही प्रस्तावना लिहिली ती याच भावनेने.

हृदयनाथ मंगेशकर

पुस्तक – सुलोचना

लेखक – वसंत भालेकर

प्रस्तावना – पं. हृदयनाथ भालेकर

सौजन्य – अनघा प्रकाशन, ठाणे

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया